मीरा-भाईंदरच्या रहिवाशांची नाराजी; कमी पाणी असतानाही खिशाला भरुदड

मीरा-भाईंदरमध्ये ३० टक्के पाणीकपात लागू झाल्यानंतर महापालिकेकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या जलदेयकाची रक्कमही तुलनेने कमी येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र अनेक रहिवासी सोसायटय़ांना नेहमीप्रमाणेच देयके आल्याने नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मीरा-भाईंदरमध्ये तीस टक्के पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पाठविण्यात येणाऱ्या देयकांची रक्कम साधारणपणे तीस टक्क्य़ांनी कमी येणे अपेक्षित होते. मात्र सध्या गृहनिर्माण सोसायटय़ांना महापालिकेकडून पाठविण्यात येणाऱ्या देयकाची रक्कम व पाणीकपात लागू होण्यापूर्वीची देयकाची रक्कम यात फारसा फरक नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे नळाला पाणी येत नसतानाही त्या बदल्यात पैसे मोजण्याचा भरुदड नागरिकांना सोसावा लागत आहे.

नादुरुस्त मीटर

बहुतांश गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये बसविण्यात आलेली पाण्याची मीटर नादुरुस्त आहेत.अशावेळी महापालिका संबंधित सोसायटय़ांना सरासरी देयक आकारात असते. महापालिकेने काही वर्षांपूर्वी मीटर दुरुस्ती कार्यशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव संमत केला होता. मात्र महापालिकेने ती अद्याप सुरू केलेली नाही. परिणामी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मीटर दुरुस्तीसाठी मुंबई गाठावी लागते. रोजच्या धावपळीत हे शक्य होत नसल्याने मीटर दुरुस्ती होत नाही. त्यामुळे महापालिका सरासरी देयक आकारते. आता तीस टक्के पाणीकपात लागू झाल्यानंतर सरासरी देयकाची रक्कमही त्या प्रमाणात कमी होणे आवश्यक होते. मात्र देयके कमी झालेली नाहीत.

आश्वासन कागदावरच

विशेष म्हणजे पाणीकपात सुरू झाली त्याचवेळी माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया यांनी महापालिकेला लेखी पत्र दिले होते. ज्या प्रमाणात पाणीकपात सुरू आहे, त्याचप्रमाणात सरासरी देयकांची रक्कम आकारण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे केली होती. त्यावेळी आसपासच्या मीटर सुरू असलेल्या इमारतींना मिळणाऱ्या पाण्याच्या मोजमापानुसारच सरासरी देयकांची रक्कम आकारण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन कागदावरच राहिले असून सरासरी देयकांमध्ये किरकोळ तफावत आहे, असे  गाडोदिया यांनी सांगितले.