गणपती पुळय़ाला अनेक जण जातात. पण या पुळय़ाच्या परिघातच अनेक आडवाटेवरची प्रेक्षणीय स्थळे दडलेली आहेत. यातीलच जयगड परिसरातील स्थळांची ही सफर ..
रस्त्याच्या उजव्या बाजूला लालसर जांभ्या दगडाचे कातळ, डाव्या बाजूला हाताच्या अंतरावर अथांग पसरलेला शब्दश: निळाशार समुद्र, किनाऱ्यावरची हिरवीगार दाट झाडी, त्यातून मधूनच डोकावणारे उतरत्या कौलारू लाल छपरांचे पुंजके, समुद्रातील पाण्याला समतल उडणारे पांढरे शुभ्र सी-गल्स आणि या ‘लाइव्ह’ निसर्गचित्राचा ‘गेटअप’ वाढवणारे काळेभोर गुळगुळीत नागमोडी रस्ते. अगदी बरोबर ओळखलत, हे सारे वर्णन आहे आपल्या कोकणाचे आहे.
गेल्याच आठवडय़ात धावत पळत केलेल्या कोकणभेटीत याहूनही कितीतरी अनुपम निसर्गसौंदर्य आमची साथ करीत होते. श्रीगणपती-पुळे आणि रत्नागिरी टापूतील ठरावीक प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यावर आम्ही काही हटके ठिकाणांकडे मोर्चा वळविला होता. यातच काही हाताशी गवसली.
जयगडची ओळख खरेतर आपल्याला शालेय पुस्तकांतच झालेली आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या इतिहासापासूनच आम्ही हे नाव वाचत आलो आहोत. प्रसिद्ध देवस्थान असलेल्या गणपती पुळय़ापासून हे ठिकाण अवघे अठरा ते वीस किलोमीटरवर. शास्त्री नदी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते अशा खाडीकाठावर हा जयगड उभा आहे.
जवळ येताच त्याची तटबंदी खुणावू लागते. त्याची भक्कम तटबंदी आजही शाबूत आहे. आत शिरताच त्याचे ते वास्तुवैभव भुरळ पाडू लागते. सभोवती उंच तटबंदी, त्यावर वर-खाली करण्यासाठी बांधलेले उंच दगडी जिने अजूनही उत्तम अवस्थेत आहेत. तटबंदीवरून टेहाळणी करण्यासाठी बांधले गेलेले झरोके, बुरूज सुस्थितीत आहेत. तटावरून फिरताना गडाभोवतालच्या तीनही बाजूंस पसरलेला समुद्र, वाळूचा किनारा, नारळाच्या झाडांची दाटी हे सारे ‘दिल खुश’ करून टाकते.
किल्ल्यात मध्यभागी हनुमान आणि गणपतीचे मंदिर आहे. जवळच एक पडका वाडाही आहे. ही वाडय़ाची वास्तू मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांची असल्याचे सांगितले जाते. या गडाचे बांधकाम अंदाजे सतराव्या शतकात, आदिलशाही राजवटीत झाले. पुढे हा किल्ला मराठा आरमारात सामील झाला आणि शेवटी सन १८१८ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला असे इतिहास सांगतो.
या किल्ल्याच्या नावाबद्दलही एक आख्यायिका इथे सांगितली जाते. किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना, कामात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून नरबळी देण्याचे ठरले. यासाठी ‘जयबा मल्हार’ नावाच्या व्यक्तीने स्वेच्छेने प्राणार्पण केले. यामुळे त्यांच्या सन्मानार्थ गडाचे नाव ‘जयगड’ असे निश्चित झाले.
तसा विचार केला तर पाहणाऱ्याला जयगड ही एखादी पडकी वास्तू वाटेल. पण आपल्या मराठी मनांसाठी मात्र अशा वास्तू केवळ इमारती नसतात. तिथे पाय ठेवता क्षणीच आपल्यातील इतिहास जागा होतो. कधी काळी या मातीला झालेला शिवरायांचा पदस्पर्श, इथे घुमलेले त्या पराक्रमी मावळ्यांचे ‘हर हर महादेव’चे नारे हे सारे आठवू लागते. हा सारा थरार अनुभवण्यासाठी तरी आपण जयगड किल्ला पाहायला हवा.
या किल्ल्यापासून जवळच असलेले, लाल-पांढऱ्या रंगातील ब्रिटिशकालीन जयगडचा दीपस्तंभही पाहाण्यासारखा आहे. सन १९३२ मध्ये ब्रिटिशांनी याची रचना व बांधकाम केले. अजस्त्र महाकाय लोखंडी पाया असलेल्या या दीपगृहाचा वरील भाग पितळेचा आहे. साधारण ८२ वर्षांपूर्वी उभारलेल्या या ‘लाइट हाउस’ची तत्कालीन रचना व यंत्रणा इतकी अद्ययावत आहे, की आजही ती कार्यरत आहे. हे दीपगृह पर्यटकांना पाहण्यासाठी खुले आहे. कोकण किनारपट्टीवरील समुद्री पर्यटनस्थळांना एक वेगळे वैशिष्टय़ प्राप्त करून देणाऱ्या या दीपगृहांची रचना व कार्य अभ्यासणे हे जिज्ञासू पर्यटकांना निश्चितच रोचक वाटू शकेल.
जयगड गावापासून चारपाच किलोमीटर अंतरावर असलेले कऱ्हाटेश्वर शिवमंदिर देखील पाहण्यासारखे आहे. हे पूर्णपणे लाकडी बांधकामाचे देऊळ एका तुटक्या कडय़ावर असल्यासारखे भासते. मुख्य म्हणजे मंदिरामागे असलेल्या साठसत्तर पायऱ्या उतरून गेल्यावर दिसणारा काळा दगडी कातळ, समोरचा निळा फेसाळणारा समुद्र, नारळीची झाडे, तिथे मिळणारा शांत एकांत, हवेचा प्रसन्न ताजेपणा हे सारे फक्त अनुभवण्यासारखेच आहे.