काही गडकोट त्याच्या इतिहासापेक्षा त्याच्या आकाराने लक्ष वेधून घेतात. सातारा जिल्हय़ातील वैराटगड नावाचा कातळदुर्गही असाच. त्याच्या रांगडय़ा रूपाने आकर्षित करतो.

पुण्याहून साताऱ्याला जाताना पाचवड नावाचा थांबा लागतो. या पाचवडच्या जवळ आलो, की उजव्या हाताला एक कातळ रचनेचा डोंगर खुणावायला लागतो. जाणत्याला उमगते तर नवख्याचे कुतूहल चाळवते. काय असेल तिथे; त्या उंच जागी? कुणीतरी ओळख करून देते आणि मग गोष्ट सुरू होते वैराटगडाची!
वाई परिसरातील हा किल्ला. पाचवडच्या तर अगदी उशाशी. पाचवडमध्ये आलो, की असे वाटते असेच चढायला सुरुवात करावी. या गडावर जायला दोन वाटा. पहिली उत्तरेकडून पाचवड-व्याजवाडी गावातून तर दुसरी गडाच्या दक्षिणेकडील सरताळे-गणेशवाडीतून. गड खडय़ा चढणीचा पण यातही दक्षिण बाजू थोडीशी सुकर. या वाटेने गडावर चढावे आणि व्याजवाडीकडून उतरावे. म्हणजे दोन्हीकडचा प्रदेश पाहून होतो.
सरताळे गावात येताच वैराटगड त्याचे ते विशाल बाहू पसरवून बोलावू लागतो. ‘शंभू महादेव’ या सह्याद्रीच्या उपरांगेवर हा वैराटगड. उंची १२०० मीटर किंवा ४००० फूट. पण या आकडय़ांपेक्षाही त्याची उंची अधिक वाटते. बहुधा ते त्याचे कातळ रूप पाहून. गडाच्या खांद्यापर्यंतचा भाग हा अन्य डोंगराप्रमाणे, तर त्यावरचा शिरोभाग म्हणजे या भूमीतून उसळी मारून वर आलेला एखादा कातळ कडाच. त्याच्या या रूपाचीच धडकी सुरुवातीला भरते.
राकट, उग्र देहाचा हा वैराटगड. पाऊसकाळ सोडून एरवी कधीही आलो, की तो रूक्ष -रखरखीत वाटतो. यामुळे वैराटगडाच्या भटकंतीसाठी हे ओले-हळवे दिवस छान वाटतात. या दिवसांत या डोंगरालाही कोमलता येते. कातळालाही पाझर फुटतात. सारा डोंगर हिरवाईत आणि त्याचे कातळ रूप ढग-धुक्यात बुडून जाते. वैराटगडाचे या दिवसांतील हेच सर्जन रूप अनुभवत गडावर निघावे.
मळलेली वाट पावलांना ओला स्पर्श देत हिरवाईतून वर निघते. भोवतीने सर्वत्र गवताची ती नव्हाळी सुखावत असते. नजर थोडी स्थिरावली, की तिच्या अंगावरील ते चमचमते डोळेही खुणावू लागतात. तेरडा, सोनकी, कवल्या, नभाळी, आभाळी, केणा, फुलकाडी, गेंद, पंद असे हे असंख्य लुकलुकणारे डोळे. नाना रंग-रूपाची ही लडिवाळ बाळे. साऱ्या वाटेवरच आपल्याशी बोलत असतात. निसर्गाच्या या सुंदर पऱ्यांचे सौंदर्य पितच आपण गडाच्या खांद्यापर्यंत पोहोचतो.
वाट एका कडय़ाला भिडते. एवढय़ा वेळेचा गवतमातीचा तो मृदुपणा नाहीसा होत कातळाचे रांगडे रूप पुढय़ात येते. शंभरएक फूट उंचीचा हा कातळ. त्याच्या डोईवरच तो वैराटगड. या कातळालाच वळसा घालत वाट गडाकडे निघते. या वाटेवरून चालत असतानाच कातळाला लगडलेली पोळी दिसतात. मधाने ओतप्रोत भरलेली. विस्मयाने त्याकडे पाहावे तो तळाशीही अशी काही पोळी दिसतात. कातळात खोदलेली आणि ‘अमृता’ने भरलेली. अगदी काठोकाठ! लहान मूल होत जमिनीलगत आडवे व्हावे आणि चार घोट घ्यावेत! माधुर्याचे!!
टाक्यांची ही माळ गड सुरू झाल्याची खूण. पुढे लगोलग पायऱ्या सुरू होतात. गडाला एकापाठीएक असे दोन दरवाजे. त्यांच्या कमानी कधीच ढासळलेल्या. पण भोवतीच्या भिंती, उंबरा, अलंगांनी मात्र अजून घट्ट पाय रोवलेले. निष्ठेच्या या शिळाच गडपण जागवत आत बोलवतात.
आत शिरताच एवढा वेळ कोंडलेला तो वारा अंगाशी झटू लागतो. खालून एखाद्या चिंचोळय़ा पट्टीसारखा वाटणारा हा गड वर आल्यावर मात्र एखाद्या गवताळ मैदानाप्रमाणे पुढय़ात येतो. जणू एखाद्या उत्तुंग स्थळी साकारलेले अवकाशयात्रींचे स्थानक!
या पठारावरच मग एकेक वास्तू खुणावत पुढे येते. सदर, वाडे, शिबंदीची घरे अशा अनेक बांधकामांचे हे ढिगारे. या ढिगाऱ्यामध्येच उजव्या हाताला मारुतीरायाचे छोटेखानी मंदिर! मंदिराच्या आत आणि बाहेर अशा दोन ठिकाणी हनुमंताच्या प्रतिमा. त्याच्या त्या शेंदूरलेपातून या उद्ध्वस्त ढिगाऱ्यांमध्येही चैतन्य संचारते.
दूरवर आणखी एक शिखर खुणावत असते. गडदेवता वैराटेश्वराचे हे राऊळ. जीर्णोद्धार झालेल्या या राऊळाची सभामंडप, गाभारा अशी रचना. खोलवर असलेल्या गाभाऱ्यातील महादेवाचे दर्शन घेत सभामंडपात आलो, की इथे उभे केलेले एक शिल्प दिसते. वीरगळ असे त्याचे नाव. एखाद्या चांगल्या कारणासाठी कुणाला वीरमरण आल्यास त्याचे पूर्वी स्मारक उभे केले जायचे. या स्मारकास वीरगळ म्हणतात. या वीराच्या या पराक्रमाची माहिती शिल्पपटातून त्यावर कोरलेली असते. इथला हा वीरगळ यादव काळातील. मग त्याचा शोध घेतानाच वैराटगडाचेही उत्खनन सुरू होते.
शिलाहार राजा भोजने हा गड ११७८ ते ९३ या काळात बांधला. प्राचीन वैराट ऊर्फ विराटनगरी म्हणजेच आजच्या वाई शहराचा पाठीराखा म्हणून याचे नाव वैराटगड. शिवकाळातील क वींद्र परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत या संस्कृत काव्यग्रंथात या वैराटनगरीचा उल्लेख आला आहे. शिलाहारानंतर यादव, आदिलशाही, शिवशाही, मुघल पुन्हा मराठे आणि शेवटी इंग्रज असे हे इतिहासातील थांबे या गडाने अनुभवले. औरंगजेबाने इसवी सन १६९९ मध्ये हा गड जिंकून घेतला. या काळातच गडाचे कधीतरी सर्जागड असेही नामकरण झाल्याचेही इतिहास सांगतो.
इतिहासाची ही वलये सोडवून झाली, की गडफेरीला निघावे. या गडाचा घेर मोठा. थोडासा पूर्व-पश्चिम असा आडवा. जिथे गरज आहे तिथे तटबंदीचे तोरण लावलेले आहे. सातारा जिल्हा गॅझेटिअरमध्ये हा तट १७ फूट उंच आणि चांगलाच जाडजूड असल्याची नोंद आहे. १८९६ मध्ये लिहिलेल्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ या पुस्तकातही या तटाचे उल्लेख आले आहेत. आज ढासळला असला तरी त्याची एकेकाळीची भव्यता लक्षात येते.
सर्पाकार फिरणाऱ्या या तटावर जागोजागी बुरूज, मारगिरीच्या जागा, ढालकाठीची रचना, शोचकुपांची योजना. या तटातूनच पश्चिम अंगाने एक चोरवाट चोरपावलांनी खाली उतरते. पाण्याच्या खोदलेल्या टाक्या, तळी, शिबंदीची घरे असे बरेच काही दिसत असते. खरेतर हे सारे उद्ध्वस्त अवशेषांचे ढिगारे. पण त्यांच्याकडे पाहिले, की असे वाटते या चिऱ्यांनाही काही सांगायचे आहे. त्यांनी खूप काही साठवून ठेवले आहे. अवशेषांच्या या सडय़ाभोवतीच असंख्य रानफुले उमललेली असतात. या इतिहासाला आदरांजली वाहात.
तटावरची ही फेरी मारतानाच दूरदूरवरचा प्रदेश खुणावत असतो. कृष्णा-वेण्णा नद्यांची ही खोरी. निळे-जांभळे डोंगर. त्यावरची ती पांडवगड, मांढरदेव, केंजळगड, रायरेश्वर, खंबाटकी, चंदन-वंदन, नांदगिरी, जरंडेश्वर, मेरूलिंग अशी विविध गिरिशिखरे. यातील काही दुर्गशिल्पं. या डोंगरांच्या आश्रयानेच वसलेली छोटी छोटी गावे, भोवतीची शेती-वाडी, झाडांची हिरवाई, नद्यांचे प्रवाह आणि रस्त्यांच्या ओळी असे बरेच काही खुणावत असते. दुर्गभ्रमंतीतील ही सर्वात छान वेळ. मन रमवणारी.
हे सारे पाहातच पुन्हा दरवाजाजवळ यावे तो एक गोलाकार तळे लक्ष वेधून घेते. नितळ पाण्याने भरलेले. त्याच्या त्या नितळ पटलावर अवकाशाची सारी निळाई उतरलेली. काठावर असंख्य रानफुले उमललेली. खुणावणाऱ्या या तळय़ावर आमच्या आधीच एक झाड येऊन थांबलेले असते. त्या पाण्यात स्वत:चे प्रतिबिंब न्याहाळत. हे तळे, त्याच्या काठावरची ती रानफुले आणि शांतपणे पहुडलेले ते झाड यापैकी कुणालाही कळू न देता तिथे काठावर यायचे. ..हिरवाईच्या पटावरचे ते एक सुंदर दृश्य. चराचरातील सारे सौंदर्य त्याच्या हृदयी साठवलेले. त्याच्या याच सौंदर्याचा स्पर्श आपणही अनुभवायचा आणि चित्त शुद्ध करत गड उतरू लागायचे.
अभिजित बेल्हेकर abhijit.belhekar@expressindia.com

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
Pune, Hinjewadi IT Park, Leopard Sighted, cub Rescued, Sugarcane Field, forest department, marathi news,
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर नवजात बछड्या ताब्यात
Pune Police, Arrest Thieves, mumbai, House Break, Stolen Items, Rs 20 Lakh, Recover, crime news, marathi news,
पुण्यात घरफोड्या करणारे मुंबईतील चोरटे गजाआड