सकाळी ऑफिसला जायची घाईची वेळ…त्यात रस्त्यात ट्रॅफिक असलं तर आपण फारच वैतागतो… मग स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी असेल तरी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असलो तरीही आपली चिडचिड होत राहते. मग अनेकदा ‘मी एव्हाना चालत वेळेत पोहोचलो असतो.’ असे आपण अगदी सहज म्हणूनही जातो. आता ऑफिसला उशीर होत असेल तर एखादवेळी काही अंतर चालत गेलेले ठिक आहे. पण ऑफिससाठी कोणी पोहत गेलेलं तुम्ही कधी ऐकलंय? नाही ना…पण ही घटना प्रत्यक्षात घडली आहे, तिही जर्मनीमध्ये.

आता तुम्ही म्हणाल जर्मनीसारख्या देशात कसं काय ट्रॅफिक झालं? भारताची लोकसंख्या जास्त असल्याने आणि योग्य त्या सुविधा नसल्याने इथे जवळपास सर्वच शहरात गर्दीच्या वेळेला ट्रॅफिक होते. मात्र इतर देशातही अशी ट्रॅफिक होऊ शकते. जर्मनीतही ट्रॅफिक आणि गर्दीला वैतागलेला एक व्यक्ती थेट पोहत ऑफिसला गेला. या व्यक्तीने इसार नदीचे दोन किलोमीटर इतके अंतर पोहत पार केले.

बेजामिन डेव्हीड असे या व्यक्तीचे नाव असून त्याने आपले कपडे, शूज आणि लॅपटॉप एका वॉटरप्रूफ बॅगेत भरले आणि ते पोटावर धरत बॅकस्ट्रोक करत तो पोहत गेला असे बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. बाहेरच्या वातावरणामुळे त्याने रबरी सँडल आणि स्विमिंगला चालू शकेल अशी शॉर्टस घातली होती. त्याच्या या वागण्यावर त्याला पाहणारे अनेक जण हसतात. मात्र ट्रॅफिकमध्ये अडकून राहण्यापेक्षा अशाप्रकारे वेगाने आणि आरामात जाणे केव्हाही चांगले असे ते म्हणतात.