तुम्हाला मराठीच्या पुस्तकातील विसरभोळा गोकुळचा धडा आठवतोय? गोकुळ गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपल्या कपड्यांना गाठी बांधून ठेवायचा. असाच काही प्रकार उद्यपूरमधल्या आदीवासी महिलेने केला आहे. पण या महिलेने आपल्या साडीला गाठी बांधल्या नाहीत पण, आपल्या जवळच्या व्यक्तीचे मोबाईल क्रमांक लक्षात राहावे यासाठी या महिलेने आपल्या पदरावर मोबाईल क्रमांकच दो-याने विणून घेतले आहेत.

राजस्थान पत्रिकेच्या वृत्तानुसार ही महिला सुदूर कोटडा भागातील आदीवासी पाड्यात राहणा-या महिलांपैकी एक आहे. जसे जग बदलले तसे त्यांनीही आपल्या जीवनशैलीत बदल केले आहेत. एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी तेथिल लोकही मोबाईल फोन वापरू लागले आहेत. पण आपल्या जवळच्या व्यक्तींचे मोबाईल क्रमांक विसरू नये म्हणून या पाड्यातील अनेक महिला आपल्या साड्यांवर मोबाईल क्रमांकाची नक्षी कोरुन घेत असल्याचे म्हटले आहे. यातल्या एका वृद्ध महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोबाईलचे दहा क्रमांक लक्षात ठेवणे कठीण जात असल्यांनी त्यांनी ही शक्कल लढवली आहे. यातल्या अनेक महिलांकडे मोबाईल फोन आहेत पण ते कसे वापरावे हे त्यांना माहित नाही. म्हणूनच, गरजेच्या वेळेला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली आहे.