‘आई.. भूक..’ लहानगं पुन्हा कुरकुरलं तेव्हा आपल्यालाही भूक लागली आहे, याची जाणीव त्याला पुन्हा झाली. ‘जायचं हा थोडय़ा वेळानं’, त्यानं पोराला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा बायकोनं त्याच्याकडे अशा काही नजरेनं पाहिलं, की त्यानं नजर चुकवलीच. ‘तरी सांगत होते. आज नको. गर्दी असते खूप. त्यात त्या व्हॅलेंटाइन डेची भर. त्यानं गर्दी आणखीनच वाढलीये. कॉलेजची पोरंपोरी..’ बायको करवादली. त्यानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. ‘आई.. पाय दुखतायत..’ लहानगा कुरकुरला. ‘बस तुझ्या बाबांच्या कडेवर’, म्हणत आईनं हातातील फुलांचं, नारळाचं ताट सांभाळत त्याला पुढे दामटलं. उसनं हसू चेहऱ्यावर आणत त्यानं मुलाला कडेवर घेतलं. त्यानं पुन्हा एकदा मागे उभ्या असलेल्या आजोबांकडे पाहिलं. आजोबांच्या डोळ्यांत व्याकूळ भाव होते. ‘दर्शनाची आस लागलीये बहुधा’, असा विचार त्याच्या मनात तरळला तेवढय़ात आजोबांसोबतच्या आजीनं चढा स्वर लावला. ‘काही बिघडत नाहीये एक दिवस हास्य क्लबला नाही गेलात तर. तिकडे खी.. खी.. करीत बसण्यापेक्षा आज जरा रांगेत उभे राहून दर्शन घ्या..’ ‘पाय दुखायला लागलेत..’ आजोबांनी तक्रारीचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही परिणाम आजींवर झाला नाही. रांग पुढे सरकून शेवटच्या टप्प्यात आली आणि वर्दीतला एक सुरक्षारक्षक आला. ‘ओ.. म्यॅडम, आजी.. हातातलं ताट ठेवा बाजूला. नारळपण नाही नेता येणार आत तुम्हाला’, त्यानं फर्मान सोडलं. ‘अरे.. का पण?’ ‘सिक्युरेटीचा इश्यूये’, त्यानं सांगितलं. ‘अरे, पण बाहेर ताट विकत घेताना बोललं नाही कुणी आम्हाला’, बायको त्याला दरडावून म्हणाली. ‘ते काय आम्हाला माहीत नाही. आम्हाला वरून ऑर्डरे..’ असं म्हणत त्यानं रांगेतल्या लोकांच्या हातांतील फुलानारळांची ताटं काढूनच घेतली. बायको कमालीची करवादली. ती आणखी काही बोलू नये, म्हणून त्यानं कडेवरच्या लहानग्याकडे हसून पाहिलं आणि त्याच्याशी खेळतोय असा आव आणला. तेवढय़ात, ‘चला.. चला..’ असा सुरक्षारक्षकाचा आवाज घुमला. त्यासरशी त्याचं सगळं कुटुंब, मागचे आजीआजोबा व इतर लोक पुढे सरकले. थोडी रेटारेटी करीत उंबरा ओलांडून आत शिरल्यानंतर सगळ्यांची डोकी धरून मूर्तीसमोर टेकवण्यासाठी नेमलेला मनुष्य आपलं काम इमानेइतबारे करीत होता. त्याच्या हाती आपलं डोकं सोपवून झाल्यानंतर तो किंचित मागे सरकला आणि त्या रेटारेटीतच पटकन मोबाइल काढून त्याने मूर्तीसोबत सेल्फी काढून घेतला. त्याच्या मागेच असलेली बायको त्याच्यावर ओरडली.. ‘इथेही सेल्फीचं वेड जात नाही तुमचं.’ त्यानं त्याही कल्लोळात तिला उत्तर दिलं.. ‘एरवी नारळ फोडून प्रसाद नेतो ना घरी आपण. आता नारळ नाही फोडता आला. तर ही सेल्फी म्हणजेच प्रसाद समजू या.’ त्यांची वादावादी ऐकून सुरक्षारक्षकाने ‘चला.. चला’ म्हणत आवाज चढवला आणि मग मोबाइल व कडेवरचा लहानगा सांभाळत तो सुखरूप बाहेर पडला..