कर्नाटक देशी घडले ते आक्रीतच म्हणावयाचे. तेथे एका व्यक्तीने एका वास्तुसल्लागाराविरोधात ग्राहक संरक्षण कायद्याखाली दावा दाखल केला. का? तर म्हणे, त्या वास्तुसल्लागाराने सांगितलेले तोडगे करूनही त्याचा लाभ झाला नाही. सदरहू त्याने घरावर खर्च केलेले पाच लाख रुपये परत करावेत. हे म्हणजे अतीच झाले. समाजात किती अंधश्रद्धा बोकाळली आहे हेच यातून दिसते. या न्यायाने हे अंधश्रद्ध उद्या एखाद्या भविष्यवेत्त्याच्या पोपटाला सिडेशन लावा म्हणतील, की त्याने चुकीचे अंदाज वर्तविले म्हणून. आपण म्हणतो, की समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोक अंधश्रद्धांपासून दूर जातील. परंतु कसले काय? शिक्षणाने लोक अधिकाधिक अडाणीच झाले आहेत. शास्त्रावरील विश्वास गमावू लागले आहेत. आजवर आपण लोकांच्या ज्ञानचक्षूंवर पडलेला अंधश्रद्धांचा पडदा तसाच राहू दिला. परंतु आता ते सहन करता कामा नये. वास्तुविशेषज्ञांवरील हल्ला हा समस्त भारतीय शास्त्रांवरील हल्ला समजला पाहिजे. त्याकरिता आधी वास्तू हे प्रचंड शास्त्र आहे हे समजून घेतले पाहिजे. आता आधुनिक विज्ञानाला हे समजत नसेल, परंतु प्रत्येक वास्तू ही सजीवच असते. ती श्वास घेते. तिच्यातून आपल्या नाडीसारखी कंपने येतात. एखादी वास्तू गळते असे म्हणतात. पण ते तिला झालेले सर्दीपडसे असते. एखाद्या वास्तूतील भिंतींचे पोपडे निघतात. म्हणजे तिला त्वचारोग झालेला असतो. वास्तू बोलतेसुद्धा. नीट कान दिला, तर तिचे – ‘या महिन्याचा ईएमआय भरला का?’ – यांसारखे उद्गारही ऐकू येतील. अशा वास्तूंचे मनुष्यावरही परिणाम होत असतात. वास्तुतज्ज्ञ त्यावरचेच तर उपाय सांगत असतात, की ईशान्येतले शौचालय तोडा आणि वायव्येला बांधा किंवा पाण्याची टाकी आग्नेयेला बसवा. घरात बांबूच्या कुंडय़ा लावा आणि डेंग्यूचे डास पाळा. या गोष्टींमागे एक शास्त्र आहे. परंतु ज्यांच्या घराला ना खाली जमीन असते, ना वर आकाश अशा मधल्याच कुठल्या मजल्यावर राहणाऱ्या अंधश्रद्धाळूंना ही वास्तुस्थिती कशी समजावी? खरे तर वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घराच्या खाली भक्कम जमीन हवी. आमच्या एका वास्तुतज्ज्ञाने त्यामुळे खालची सदनिका पाडून टाकण्याचा सल्ला दिला होता. तो पाळता आला नाही. परिणामी वास्तुदोष तसाच राहिला. आता यावर का त्या वास्तुतज्ज्ञाला बोल लावायचा? आपण नीट पथ्ये पाळत नाही, म्हणून चांगले फळ मिळत नाही. त्यासाठी कोणी वास्तुतज्ज्ञालाच दंड करू पाहील तर ते कसे सहन करायचे? लोक अडाणी आहेत. त्यांना या अशा सर्व शास्त्रांमध्ये असलेला ‘अटी आणि शर्ती लागू’चा ताराच दिसत नाही. हा तारा सांगत असतो, ‘मा फलेषु कदाचन’. आता एवढेही शास्त्र समजत नसेल, तर अशा माणसांना वास्तू कशी लाभणार?