माणसाची भरारी घेण्याची आकांक्षा उंच हवी. जमिनीवरून तर सगळेच चालतात. मनीषा हवी ती आकाशात भरारी घेण्याची. आणि ही भरारी घ्यायची तर खरोखर आकाशात उडण्याची गरज आहे, असे नाही. उंची गाठण्याचे, भरारी घेण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला एक मार्ग पुतळ्याचा. अमेरिकेतला तो स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा. त्याच्या ९३ मीटर उंचीची त्यांना कोण मिजास. अर्थात, आता किती करायची ती मिजास करून घ्या म्हणावे त्यांना. इकडे मुंबईच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि गुजरातेत सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला की त्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याची मान खाली जाणारच. मग आपली मान आणखी उंचावणार. इमारतींचेही तसेच. त्या दुबईतल्या अरबांच्या बुर्ज खलिफा इमारतीच्या उंचीचे सगळ्यांना कोण कौतुक. कोण तिचा रुबाब. मिरवा म्हणावे आणखी काही दिवस. पण हा रुबाब उतरणार आहे लवकरच. आमचे नितीन गडकरी म्हणजे वाटले काय? एकदम दांडगे प्रकरण. त्यांनीच जाहीर केले ना मध्यंतरी- मुंबईत त्या बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत बांधण्यात येणार आहे म्हणून. ती बांधून झाली की त्या बुर्ज खलिफाचे गर्वाचे घर खाली आलेच म्हणून समजा. आपल्या देशाचे नाव त्रिखंडांत दुमदुमत ठेवायचे असेल तर ‘सामथ्र्य आहे उंचीचे.. जो जो उंचावेल त्याचे’, हा मंत्र सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा. अर्थात तो लक्षात आहेच म्हणा आपल्या लोकांच्या. त्याखेरीज, शिवरायांचा पुतळा, सरदारांचा पुतळा, बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत अशा भव्यदिव्य प्रकल्पांची स्वप्ने पाहताना, आभाळाशी स्पर्धा करणारे, आभाळभर होणारे राष्ट्रध्वज त्यांनी फडकावले नसते. हे असे उंचच उंच फडकणारे राष्ट्रध्वज म्हणजे आपल्या मनातील जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रनिष्ठेची, राष्ट्रवादाची एक सळसळती खूण. त्या तिकडे वाघा सीमेवर मध्यंतरी आपला राष्ट्रध्वज फडकला. तो किती उंचीचा असावा? ३६० फूट. त्या ध्वजाने जागतिक विक्रमच केला उंचीचा. त्यापासून प्रेरणा घेत आपल्या चंद्रकांतदादांच्या कोल्हापुरात परवाच्या महाराष्ट्रदिनी तसाच उंच राष्ट्रध्वज फडकला. या ध्वजाची उंची ३०३ फूट. वाघा सीमेवरील ध्वजानंतरचा सर्वाधिक उंचीचा हा ध्वज. यानिमित्ताने आपल्या राष्ट्रभक्तीचा वन्ही अवघ्या महाराष्ट्रात चेतविला जाईल, यात शंकाच नाही. खरे तर या ध्वजांच्या उंचीची स्पर्धाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित करावी. ज्या राज्यातील, गावातील, खेडय़ातील ध्वज उंच त्या राज्याला अधिक निधी, अधिक सवलती अशी काही बक्षिसी द्यावी. स्मार्ट सिटीसाठीच्या निकषांत या ध्वजांच्या उंचीचाही एक निकष समाविष्ट करावा. त्यातून ठिकठिकाणी उंचच उंच राष्ट्रध्वज फडकू लागतील. शहरे, गावे, खेडी केवळ स्मार्ट असून चालणार नाहीत. त्यांच्या रस्त्यारस्त्यांमधून, गल्लीबोळांमधून राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रवादाची भावना उंच ओसंडून वाहायला हवी. अशा भावनेतून बलशाली राष्ट्र उभे राहात असते आणि उंचही होत असते.