मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी हे अत्यंत हुशार आहेत. शिवाय नावात ‘जी’ असल्याने ते जीनिअससुद्धा आपोआपच आहेत. कारण की ते सतत प्रत्येक गोष्टीचा अभ्यासच करीत असतात. म्हणजे बघा, शाळेतसुद्धा ते पहिल्या बाकावरच बसत असणार व बाईंकडून पैकीच्या पैकी गुण व पाठीवर शाबासकी मिळवीत असणार. आता बाईंऐवजी ‘भाई’ त्यांना पैकीच्या पैकी गुण देतात असे सगळेच म्हणतात. अगदी भाऊसाहेब खडसेसुद्धा तेच सांगत असतात. तर असे हे हुशार विद्यार्थी असलेले आपले मुख्यमंत्री बोलतातसुद्धा वादविवाद स्पर्धेतील प्रथम विजेत्या विद्यार्थ्यांसारखे म्हटल्यावर तर ते दुप्पटच हुशार. लोणीकर विखेपाटलांपासून वांद्रेकर उद्धवरावांपर्यंत सगळे यास दुजोराच देतील. परंतु आमच्या पत्रकारू-नारूंना हे पटायला हवे ना. त्यातील काही नतद्रष्टांनी हल्ली एक भलतीच कुजबुज मोहीम सुरू केली आहे. तीसुद्धा नागपुरातून नव्हे, तर मुंबईतून. ही कुजबुज अशी, की देवेंद्रजी कॉपी करतात. शिव शिव! कसे बोलवते ना त्यांना हे असे जिभेचा अस्थिभंग झाल्यासारखे? ज्यांच्या हुशारीस खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही विनम्र अभिवादन करतात त्या मुख्यमंत्र्यांवर असा आक्षेप घेतला जावा? पण या पत्रकारू-नारूंचे बोरू कोण हो धरणार? ते म्हणतात, की देवेंद्रजी सतत आपले पुढच्या बाकावर पाहून पेपर सोडवीत असतात. एक तर हे कोणालाच मान्य नाही. पण समजा, हे चहाटळेश्वर पत्रकारू म्हणतात ते खरे मानले तरी हरकत काय आहे त्यास? काय आहे आक्षेप? अखेर पुढच्या बाकावर कोण असते देवेंद्रजींच्या? मोदीजी! आता त्यांच्या उत्तरपत्रिकेत पाहून देवेंद्रजींनी काही लिहिले तर बिघडले कुठे? मोदीजींनी पंतप्रधानांच्या नावाने योजना आखल्या. देवेंद्रजींनी त्याची कॉपी केली. मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना आखल्या. पंतप्रधानांनी ‘मन की बात’ हा एकपात्री प्रयोग सुरू केला. देवेंद्रजींनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा बोलण्याचा कार्यक्रम लावला तर बिघडले कुठे? की उगाच ‘मी मुख्यमंत्री नुसताच बोलतोय’ अशी खिल्ली उडवायची त्याची? मोदी-जाकिटावरून उडवली जाते ती पुरेशी नाही का? याला विधायक टीका म्हणत नाहीत; पण या पोटभरू बोरूबहाद्दरांना कुणाची अशी टिंगलटवाळी केल्याशिवाय पत्रकार परिषदेत खाल्लेला वडा हजम होतच नाही बहुधा. उलट त्यांनी आपल्या योजनांना कोणा व्यक्तीचे नाव दिले नाही व जुने रिवाज मोडून काढले याचे कौतुक व्हायला हवे. ते सोडून देवेंद्रजींसारख्या हुशार व अभ्यासू व्यक्तीवर ताशेरे ओढले जातात. छी! हे म्हणजे प्रत्येक मनुष्यात काही तरी ओरिजिनॅलिटीच हवी, असे म्हणण्यासारखे झाले. माणूस कितीही देवेंद्र झाला तरी त्याने प्रत्येक वेळी कुठून हो आणायची ती? आता नरेंद्रजी नाही का जुन्याच योजनांना नवे अंगडे घालत असतात? मग?