आपली थोर संस्कृतीच आहे ही. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ अशी. घर म्हणू नका, कट्टा म्हणू नका, चहाची टपरी म्हणू नका, दुपारचे हॉटेल म्हणू नका, रात्रीचे हॉटेल म्हणू नका, रेल्वेगाडी म्हणू नका, बस म्हणू नका, जहाज म्हणू नका, विमान म्हणू नका.. काही काही म्हणू नका, काही काही सोडू नका.. ही थोर संस्कृती सर्वत्र आढळते. समाजमाध्यम म्हणजे तर या संस्कृतीचा जणू अथांग समुद्रच. कांद्याच्या भज्यांमध्ये ओवा किती प्रमाणात घालावा इथपासून ते ट्रम्प यांचे इराणबाबतचे धोरण कसे चूक वा बरोबर आहे, इथपर्यंतच्या विषयांवर जो तो आपापली मते मांडत असतो. आपले राजकीय नेतेही या संस्कृतीचे भोक्ते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले शरद पवार यांचेच घ्या. या दोघांमध्ये गुरू-शिष्याचे अत्यंत हृदयंगम नाते. शरदरावांनी मोदी यांना बोट धरून राजकारणात आणलेले, राजकारणाचे डावपेच शिकवलेले. हे दोघे अधूनमधून एकमेकांना भेटत असतात, चर्चा करीत असतात, विचारमंथन करीत असतात.‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ ही जगरहाटी दोघांनाही चांगलीच अवगत. या दोघांचेही शत्रू सतत बदलत असतात, त्यामुळे मित्रही सतत बदलत असतात. मोदीसाहेबांना मुंबई-महाराष्ट्राच्या विकासात मोठा रस, तर शरदरावांना दिल्लीतील विकासाची आस. जनसेवेची अपार इच्छा असल्याने राष्ट्रपतिपदही नको म्हणते झाले ते. ‘एकमेका साह्य़ करू.. दोघे धरू विकासपंथ’ अशी या दोघांची विचारसरणी. तर ते असो. मुद्दा असा की, अगदी परवाच शरदराव दिल्लीमुक्कामी पंतप्रधान मोदी यांना भेटले. शरदराव हे जाणते राजे, रयतेचे राजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना अचूक जाण. सांप्रतकाळी महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर ते मोदी यांना भेटले. काही खोडसर लोकांना मात्र या भेटीमागे वेगळीच पाश्र्वभूमी दिसली. ज्युनिअर जाणते राजे श्रीमान अजितदादा पवार यांच्यावर, तसेच माजी हवाईराजे श्रीमान प्रफुल्ल पटेल यांच्यावर काही बालंट येऊ पाहते आहे. ही भेट त्याच संदर्भात होती, असे अंतस्थ गोटातून कळते. काही म्हणतात की, या भेटीमुळे अजितदादांचा रक्तदाब अंमळ वाढला आहे. बालपणापासून काकांना पाहिले आहे त्यांनी. बालपणी एकदा पतंग उडवताना गुंतलेला मांजा सोडवण्यास त्यांनी काकांना सांगितले, तर काकांनी मांजा अधिकच गुंतवून ठेवला आणि मग पतंग गोता घेत घेत खाली आला, अशी आठवण दादा अंतस्थ गोटात नेहमी सांगतात. योगायोग असा की, मोदीसाहेबांनाही पतंगबाजीचे मोठे वेड. फिरकी आपल्या हाती ठेवण्याची शरदरावांप्रमाणेच त्यांनाही सवय. परवाच्या भेटीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच, कुणाचा पतंग उडवायचा, कुणाचा पतंग काटायचा, याचीही चर्चा झाली, असे म्हणतात. फिरकी कुणी हाती घ्यायची, हेही ठरले म्हणतात. अर्थात ही माहिती अंतस्थ गोटातली. विचारायला जाऊ नका कुणी दोघांना. अन्यथा पतंग फुकटचा कापला जायचा..