सकाळपासून रात्रीपर्यंत, रात्रीपासून मध्यरात्रीपर्यंत, मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत.. तेच ते तेच ते, रोज रोज ऐकावे लागते, नको ते, नको ते. निगमांचा सोनू म्हणाला, माझी उडते साखरझोप, कोण येथे विणतो कसला, नावडे मला स्वरांचा गोफ. तुझीच नाही सोनू बाळा, आमचीही आहे तशीच कथा, काय काय सांगाव्या तुला, ऐक जरा आमच्या व्यथा. सारेच लावतात मोठा आवाज, आकाशीच्या ‘त्या’च्यासाठी, डेसिबलाचे बळ मोठे, गाठतात आणि पुण्यासाठी. जयंत्या, मयंत्या, असो किंवा वाढदिवस, कल्लोळ करूनच फेडतात आणि, सारेच कसे आपले नवस. दिसामाजी काही तरी ऐकत जावे आमचा नेम, तुझे आणि आमचे दुखणे, याबाबत जरा सेम. ऐन सकाळी निघावे कामासी, नाही मिळत टॅक्सी-रिक्षा, परीटघडीचे कपडे सावरत, चालावयाची मिळते शिक्षा. भला वाटे एखादा मध्येच अवचित थांबतो, किधर है जाना, थंडपणे आणि विचारतो. ऐकून आमचे सुनावतो आम्हा, पेट्रोल नहीं है, नहीं है साब जाना. रेलगाडय़ा रोज धावतात लेट, फलाटावर कोण होते खेचाखेच. अशा वेळी कानी पडे, सुस्वर तो एक, दिलगिरी नोंदवती, नित्यनेमे नेक. गाडीमध्ये बसता चिंता साऱ्या हरती, घोषणा मोलाच्या कानी त्या पडती. फलाट आणिक पायदान यांत, लक्ष ठेवा नीट, बोल ते सांगती. कार्यालयी पोहोचण्या होतो जरासा उशीर, सहीची लागते मग आम्हाला फिकीर. ऐकवी साहेब तशात विलंबाचे बोल, तुम्हा नाही म्हणे मुळी वेळेचे हो मोल. करताना सही, लेखणीला दाब, राखावा लागतो साहेबाचा आब. मुकाटसे मग टेबल गाठतो, कामाचा रगाडा नित्याचा हाकतो. हे तर तू सोड, ऐक आणि जरा, ऐकतो काय आम्ही, काय काय तऱ्हा. रांगेमध्ये उभे, नेमाने राहतो, डोईवर ऊन, मुकाट साहतो. कान आसुसती, ऐकावया बोल, किती थोर आहे पैशांचे रे मोल. गाठून ते यंत्र, तंत्र चालवावे, एक शून्य समोर, दिसते रे सारे. नोटांविना ऐकू येते खडखड, अशी आमुची सारी असे परवड. बाजारात जावे, घ्यावयाला भाजी, किंवा डाळ घेण्या दुकानात जावे. कानावर जे जे पडतात भाव, महागाईचा नको वाटे सारा गाव. ऋतू येतो दर, पंचवर्षी एक, नाव त्याचे असे निवडणूक. गल्लीतली असो, असो दिल्लीतली, एक तंत्र, भाषा, सारीकडे खुली. बोलताना खुले, साऱ्यांचाच कंठ, असो कुणी राव किंवा असो पंत. काय ते बोलती, आश्वासने देती, सुंदर जिण्याचे स्वप्न दाखवती. द्या रे सत्ता आम्हा, तुम्हापुढे लीन, खेचून आणूच आम्ही अच्छे दिन. ऐकावे लागती, ऐसे बोल थोर, नाचती मनात उगा थुईथुई मोर. सावकाश मोर, थकुनिया जाती, कानांमध्ये बोल उरतात बाकी. आमच्या कानांत खूप काहीबाही, ऐकणे अजून सरलेले नाही. अशा या कल्लोळी, हरवला आज, ऐकू ना ये आम्हा आमुचा आवाज. कानीचे कल्लोळ, सदाच साहतो, नको ते नको ते, रोजच ऐकतो..