‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही,’ हे लोकमान्यांचे उद्गार. शालेय इतिहासात अजरामर झालेले. त्याच धर्तीवरचा आणखी एक उद्गार आता अजरामर होण्याच्या मार्गावर आहे. तो आहे- मी शेंगा खाल्ल्या असल्या तरी टरफले उचलणार नाही! खरे तर हे उद्गार आणखी एका वेगळ्याच उद्गाराचे भाषांतर आहे. ते मूळचे विधान, जे यापुढे इतिहासाचा भाग बनणार आहे ते, होते : माझी राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली असली तरी मी पक्षाचा सदस्य बनणार नाही. ही घोषणा कोणी केली त्या थोराची ओळख तशी अवघ्या महाराष्ट्रास आधीच झालेली आहे. त्यांचे नाव आहे डॉ. नरेंद्र जाधव. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, लेखक, भाषांतरकार आणि राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त सदस्य. (कोणी सांगावे, त्या नरेंद्रांच्या मनात काय चालले आहे? तेव्हा या नरेंद्रांची एक ओळख आधीच सांगून ठेवलेली बरी.. ती म्हणजे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे संभाव्य भावी गव्हर्नर!) खासदारकीच्या शेंगा खाऊनही पक्षसदस्यत्वाची टरफले उचलण्यास डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिलेला हा नकार ही दलित राजकारणातील एक महत्त्वपूर्ण घटना असून, त्यावर पुढेमागे जाधवसरांना ‘आमचा अपक्ष आणि आम्ही’ असे एखादे बहुखपाचे पुस्तकही लिहिता येईल. कारण हा साधा नकार नाही. तो एका नरेंद्राने दुसऱ्या नरेंद्राला दिलेला नकार असून, त्यास आगळेच वैचारिक तेज आहे. परवा कविकुलगुरू रामदासजी आठवले यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हाही असेच तेज दिसले होते. त्यांनीही मंत्रिपद स्वीकारले असले तरी भाजपचे सदस्यत्व स्वीकारलेले नाही. जाधवसरांनीही त्यांचाच कित्ता गिरविला आहे. आम्ही तुमचेच सहप्रवासी, तुमच्याबरोबर उठू-बसू-खाऊ-पिऊ-राहू-वावरू, परंतु तुमच्या रेशनकार्डावर मात्र आमचे नाव असणार नाही, असा हा बाणेदारपणा आहे. आपला कणा ताठ ठेवून वावरणाऱ्यांची मोठीच कमतरता असलेल्या काळात जाधवसरांसारखी व्यक्तिमत्त्वे म्हणूनच उठून दिसतात. या नकाराने त्यांनी आपल्या टीकाकारांनाही त्यांची जागा दाखवून दिली आहे. सरांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन सरसंघचालकांच्या हस्ते झाले, तेव्हा तर या विरोधकांनी काहूरच माजविले. वस्तुत: संघ हा बाबासाहेबांच्या विचारांचा केवढा भक्त. त्या संघटनेचे प्रमुख प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहणे हा आंबेडकरी विचारांचा विजयच असल्याची ग्वाही तेव्हा जाधवसरांनी दिली होती. पण या टीकाकारांना आंबेडकरी विचारांचा असा विजय मानवतच नाही, त्यास कोण काय करणार? तेव्हा सारे म्हणत होते, की सरांचे असे संघभावनेने समरसून काम करणे हे केवळ सत्तेसाठी आहे. पण तसे नसल्याचेच त्यांनी दाखवून दिले आहे. असा ताठ कणा असल्यामुळेच सर कोणाच्याही शेंगा खाऊन टरफले न उचलण्याचा बाणेदारपणा दाखवू शकले आहेत.