‘नावापुरते देवीपण’ हा अलकनंदा पाध्ये यांचा लेख १२ नोव्हेंबर रोजी वाचला. आपला समाज स्त्रियांबाबत ढोंगी आहेच. दुष्ट शक्तीचे निर्दालन करणारी महिषासुर मर्दिनीची पूजा करणाऱ्यांची प्रत्यक्षातील वागणूक उलट आहे. नावापुढे देवी, पण साधी माणुसकीची वागणूकपण तिला मिळत नाही. आपल्यावर अन्याय होतोय हेच जर समजत नसेल तर पुढील पिढीवर ती काय संस्कार करणार? यात पुढाकार स्त्रियांनी घ्यायला हवा. आपल्या घरापासून त्याची सुरुवात करावी. आपल्या घरातील स्त्रीचा सन्मान करावा. स्त्रीने दुसऱ्या स्त्रीस कमी लेखू नये. विधवा, घटस्फोटित, प्रौढ कुमारी या स्त्रियांबरोबरची वागणूक त्याची प्रचीती देते. दिसायला छोटय़ा वाटणाऱ्या पण समाजात तिचे दुय्यम स्थान ठरवणाऱ्या गोष्टी करू नये. नवऱ्याच्या पश्चात समर्थपणे घर सांभाळणाऱ्या स्त्रीला घरातील मोठय़ा कार्यक्रमापासून दूर ठेवले जाते. तिच्या मुली-मुलाच्या लग्न विधीसाठी कोणी काका-मामा उभा राहतो. पत्नीपश्चात पती मात्र सर्व विधी करू शकतो. स्त्रीने स्वत:ला कमी लेखू नये.

– ममता निमकर  

 

स्वयंप्रेरणा सर्वात महत्त्वाची

१ ऑक्टोबरच्या पुरवणीतील ‘शेवटाची परिपक्व सुरुवात’ हा आरती कदम यांचा लेख वाचला. तो मनोमनी भावला. त्यात एकही मुद्दा अस्पर्शित राहिला नाही. अनेक ज्वलंत सत्य उदाहरणे देऊन स्पष्ट केलेला आहे. लेख वाचल्यानंतर ‘नटसम्राट’मधील एक वाक्य आठवलं, ‘दुसऱ्यांना जेवायचं ताट द्यावं परंतु बसायचा पाट देऊ नये.’ वृद्धांना भेडसावणारे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. यात चूक कोणाची आहे हा प्रश्न निर्माण होतो. असं वाटतं कुठे गेले ते दिवस? मुलांना आई-वडिलांबद्दल खूप प्रेम वाटायचे. नातीगोती कुठे गेली? ज्येष्ठांचा आदर करावा ही शिकवण आपली संस्कृती देते ती शिकवण कुठे गेली? याला एकच गोष्ट जबाबदार, ती म्हणजे प्रॉपर्टी व पैसा. प्रत्येक व्यक्ती ही वृद्धत्वाकडे आज ना उद्या झुकणार.  त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पैसा असो वा प्रॉपर्टी त्याचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नियोजन योग्य प्रकारे केले तर प्रश्न, समस्या कमी प्रमाणात निर्माण होतील. तसेच तरुणांनी वृद्धांना समजून घेणे व वृद्धांनी तरुणांच्या आधुनिकतेनुसार समजून घेणे आवश्यक आहे. तेव्हा बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. वयाचा एक आकडा हे माझं वय झालं हे सुचवण्यास पुरेसे आहे का हे स्वत:ला प्रथम विचारावयास हवं. वृद्धत्वाकडे निराशावादी नव्हे तर सकारात्मक व आशावादी दृष्टीने पाहण्यावर भर असावा. तसेच स्वत: स्वत:चे स्थान, स्वत:च्या नजरेत नेहमी राखून ठेवणे गरजेचे आहे कारण स्वयंप्रेरणा ही सर्वात महत्त्वाची आहे.

– प्रिया प्रवीण नाईक, चुनाभट्टी

 

संघटित ज्येष्ठांचा उपयोग करून घ्यावा

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्रसिद्ध झालेलेल ‘शेवटाची परिपक्व सुरुवात’ हा लेख वाचला. आरती कदम यांनी त्याच्या लेखात दर वर्षी वाढणारी ज्येष्ठांची संख्या व ज्येष्ठांच्या न्यायालयात प्रलंबित असलेली सात लाख प्रकरणे यांची केलेली मीमांसा व त्या अनुरोधाने घेतलेला ज्येष्ठांच्या जीवनाचा परामर्श प्रबोधनपर वाटला. त्यांनी दिलेली विविध उदाहरणे हेच दर्शवितात की, ज्येष्ठांची होणारी फरफट, अनास्था आणि एकंदर जीवनातील सर्व दोष परिस्थितिजन्य आहेत, ते निमूटपणे सहन करतात त्याची कारणे काहीही असली तरी ते (ज्येष्ठ) बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत. याचे उत्तरही अपेक्षित होते. ज्येष्ठांची उतारवयात काय काळजी घ्यावी याची यादी फार मोठी असली तरी स्वत:च्या कुटुंबात होणारी अवहेलना, अपमान इत्यादी कसे टाळू शकले असते यावरही भाष्य गरजेचे होते.

ज्येष्ठांनी आपल्या आयुष्यात आनंद घेण्याचे/मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत त्यापैकी एक तरी मार्ग निवडावा. एकंदर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायम सकारात्मक असला हे माहीत नसलेले ज्येष्ठ किती असतील? तसेच वयाच्या साठीनंतर अशा प्रत्येक सकारात्मक दृष्टिकोनाचा श्रीगणेशा करणे किती ज्येष्ठांना जमेल? पूर्वापार चालत आलेली ‘वृद्धा’ची व्याख्या मात्र तीच राहिली नाही, पण या बदलत्या व्याख्येला निराशेची किनार आहेच. त्याचबरोबर एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास व एकंदर कुटुंब व्यवस्थेत सध्या दिसणारा विभक्तपणा इत्यादीला पर्याय शोधताना ज्येष्ठांची चळवळ व ज्येष्ठ नागरिक संघाचा उदय ही लक्षणीय सुधारणा मानली पाहिजे. पुण्यासारख्या शहराच्या विविध भागात सुमारे २००च्या वर ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. ज्येष्ठांची राज्य पातळीवर फेडरेशन (फेस्कॉम) आहे. या संघटना, संघ ज्येष्ठांच्या सुखा-समाधनासाठी विधायक कार्याने सज्ज आहेत. त्यामुळे नवीन कुटुंबपद्धतीत न सामावलेले ज्येष्ठ संघ पातळीवर एक होत आहेत याची जाणीव समाजातील सर्व स्तरावर व लोकप्रतिनिधींना आहे. यात  खेदाची गोष्ट म्हणजे या संघटित ज्येष्ठांचा उपयोग समाजातील विधायक कार्यासाठी जेवढा करून घेता आला असता तो होत नाही. कारण ज्येष्ठांची संघटित शक्ती समाज सुधारण्याकरिता अत्यंत गरजेची आहे. या संघटित शक्तीचा उपयोग सर्वानी करून घ्यावा कारण ज्येष्ठ हे सर्व कार्य निरपेक्ष भावनेने करणारे असतात याचीही काही उदाहरणे आहेत.

– नारायण खरे, पुणे</strong>

 

गर्भपात सेवा एप्रिल १९७३ पासून

५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेला ‘माझे शरीर, माझा हक्क’ हा लेख वाचला. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील अनेक छोटय़ा-मोठय़ा शहरांत, खेडय़ापाडय़ांत बेकायदेशीर गर्भपात, भोंदू वैदू, अाया आदी तद्दन अशिक्षित, अकुशल लोक सर्रास करीत असत. त्यामुळे असंख्य गर्भवती स्त्रिया मृत्युमुखी पडत. १९६०च्या दशकात भारत सरकारने गर्भपात सेवासुविधांसंबंधी विचार करून शिफारशी सुचविण्यासाठी शांतिलाल शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने देशभरातील अनेक डॉक्टर्स, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर व प्रसूतितज्ज्ञ यांना भेटून खूप माहिती गोळा करून भारत सरकारला एक अहवाल सादर केला. या अहवालावर आधारित तत्कालीन इंदिरा गांधी केंद्र शासनाने एक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत मांडले आणि त्यावर साधकबाधक चर्चा होऊन ते संमत झाले. या विधेयकाचे रूपांतर ‘वैद्यकीय गर्भपात कायदा १९७३’ असे झाले व १ एप्रिल १९७३ पासून तो कायदा देशभर अमलात येण्यास प्रारंभ झाला. हा कायदा कुटुंब नियोजनाचे साधन म्हणून वापरला गेला नाही. या कायद्यामुळे शासकीय, निमशासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियासारख्या स्वयंसेवी संस्थांची कुटुंब नियोजन केंद्रे, इतर स्वयंसेवी संस्थांची रुग्णालये, कुटुंब नियोजन केंद्रे, खासगी संस्थांची रुग्णालये यामधून गेली ४३ वर्षे वैद्यकीय गर्भपात सेवा दिल्या जात आहेत. त्यामुळे देशातील कोटय़वधी गर्भवती स्त्रियांना या सेवांचा लाभ घेता आला. गेली

४३ वर्षे हा हक्क त्यांना मिळाला आहे आणि यापुढेही मिळत राहील, हे निश्चित व नि:संशय.

– ज. शं. आपटे, पुणे

(पत्रलेखक कुटुंबनियोजन क्षेत्रातील कार्यक्रम अंमलबजावणी प्रशिक्षण यामध्ये ३० वर्षे (१९६०-१९९०) कार्यरत.)