ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता शेकडो मल पायी चालत वारकरी पंढरपुरात ९ लाख भाविक एकादशी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. टाळ-मृदंग  आणि हरिनामाच्या जयघोषात पंढरी नगरी दुमदुमून निघाली आहे.दरम्यान, आज एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक करणार आहेत.

राज्यात मृग नक्षत्रावर अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीच्या कामाला लागला. मात्र राज्यात काही ठिकाणी पावसाने दडी मारली. याच काळात जगदगुरु तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महराजांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवले. या वेळी वारकऱ्यांची संख्या कमी होती. मात्र विदर्भ, मराठवाडा येथे पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीची कामे आटपून पायी चालत आले, तर काही शेतकरी हे पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी आले. पायी चालत वारी करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. देहू,आळंदी,त्र्यंबकेश्वर, सासवड,मुक्ताईनगर,पठण आदी ठिकाणाहून पालखी पंढरीला प्रस्थान ठेवतात. मजल दलमजल करीत हा वैष्णवांचा मेळा आता पंढरपूरला विसावला आहे.

अवघे गर्जे पंढरपूर ,चालला नामाचा गजर ” या अभंगाप्रमाणे पंढरी नगरी दुमदुमून निघाली आहे.जवळपास आठ लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. एस.टी.बसने विदर्भ,मराठवाडा येथून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. चंद्रभागा नदीच्या पलतीरावरील ६५ एकर जागेत भाविकांच्या राहण्याची सोय केली आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. या ठिकाणी भाविकांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, वैद्यकीय सेवा सरकारतर्फे पुरविल्या जातात.चंद्रभागा नदीपात्रात पुरेसे पाणी असल्याने भाविकांना स्नानाचा आनंद घेत आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानुसार चंद्रभागा वाळवंट येथे भाविकांसाठी शौचालय, दिवाबत्ती आदी सोयी सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच बरोबर यंदाच्या वर्षी मंदिर समितीच्या वतीने २० जीवरक्षक दल नदी किनारी तनात ठेवले आहेत, जेणे करून नदीपात्रात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ मदत देता येईल. शहरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तनात केला आहे. बॉम्बशोधक व नाशक तसेच श्वानपथक तनात केले आहे. या शिवाय सीसीटीव्हीची करडी नजरही राहणार आहे. भाविक मोठ्या संख्येने पंढरीत दाखल झाले आहेत. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. टाळ-मृदुंग आणि हरिनामाचा जयघोष सुरु आहे. दरम्यान मंगळवारी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करणार आहेत. ” जाऊ देवाचिया गावा..देव देईल विसावा ..देवा सांगू सुख दु:ख ..देव निवारील भूक ” या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे भाविक आपली सुख-दु:खं सांगण्यासाठीच पंढरीला येतो.