हे घर गणेशोत्सवात उजळून निघायचं. आज ३० वर्षांनंतरसुद्धा त्या घरातला गणेशोत्सव आठवतो; देवघरात गणपती विराजमान होण्याआधी गणपतीची ‘माटी’ कोकणच्या फुलापानांनी सजवलेली असायची. त्यात सुपारी, कवंडळ यांची फळं असायची. हरणाची पिवळी फुलं, सफेद शेरवडाची पानं, कांगलाची पानं यांनी माटी सजलेली असायची. या दिवसांत सदरेवर भजनांची रेलचेल असायची. गणपतीच्या दिवसांत स्वयंपाकघरातून ऋषीच्या भाजीचा, भोपळ्याच्या भाजी, पडवळ-भेंडय़ांच्या भाजी शिजल्याचा घमघमाट यायचा.

घ रात एका कोपऱ्यात असणाऱ्या फडताळात खूपशी जुनी कागदपत्रं ठेवली होती. बहुतेक कागदपत्रं मोडी लिपीत होती. त्या कागदपत्राच्या मदतीने एक गोष्ट कळली. माझ्या आयुष्यातली सात-आठ वर्षांतल्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ा ज्या घरात घालवली ते घर साधारणपणे १८३० साली बांधलेलं असावं, गावातल्या इनामदाराला शोभेल असंच ते घर होते. माझ्या पूर्वजांना आयनल (जि. सिंधुदुर्ग) गावाची इनामत मिळाली होती.
घर मातीच्या भिंतीचं आणि नळ्यांचं छप्पर असलेलं.. तेव्हा कौलारू घरं कोकणात रूढ झाली नव्हती. गावातल्या शाळा जशा असतात तसं लांब आणि ‘छ’ च्या आकारात. घरात १२ खोल्या, दोन स्वयंपाकघरं, एक मोठं देवघर. त्या १२ खोल्यांत एक मोठी खोली- जो सदरेचा भाग होता. घराच्या बाहेरच्या बाजूला लांबच्या लांब पडवी होती. पावसाळा असेल तर गावातले गावकरी लांब कुडय़ाची विडी ओढत, दोन-अडीच तास ‘गजाली’ (गप्पा) मारत बसत. घराच्या बाहेर मोठं खळं होतं. पावसाळा नसेल त्यावेळी या खळ्यात गप्पांचा सडा पडलेला असायचा. घरात बाळंतिणीची खोली, धान्यांची खोली, कोंबडय़ाची खोली अशा वेगवेगळ्या खोल्या होत्या. पणजोबा-आजोबा सनातनी नसले तरी त्यांच्यावर पूर्वीच्या रूढींचा पगडा असल्याने, तीन दिवसांच्या अडचणीत असलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था असायची. पुढल्या दारात एक चौपाळा ठेवलेला असायचा. त्या चौपाळाचे खूर भक्कम होते. म्हणजे सहसा चार माणसांना चौपाळा सहज उचलता येत नसे. घराच्या मागच्या बाजूला गुरांचा गोठा होता. गोठय़ात चार बैल, एखादी गाय, तिची वासरं, दोन दुभत्या म्हशी, तिची रेडकं एवढी पिलावळ असायची. त्यामुळे घरात दूधदुभत्याची कोणतीच कमतरता नव्हती. आजोबा किंवा चुलते दूध काढून ते भांडं व्यवस्थित फडताळाच्या आत ठेवायचे. कारण घरात सदानकदा मांजरांचा व बोक्यांचा वावर असायचा.
घरातल्या दारांना बहुतेक आडणा घातलेला असायचा. चुलीवर नेहमी दुधाचा टोप असायचा. परसदारात एखादी चूल असेल तर त्या चुलीत काजूबिया नाही तर फणसाच्या आठय़ा भाजल्याचा वास यायचा. या जुन्या घराच्या पुढेदेखील मोठा पसरट उंचवटा होता. त्यात जवळपास सात-आठ फणसाची झाडं होती. एक शेगलाचं झाड होतं. या जुन्या घरात बहुतेक शंभर-सव्वाशे वर्ष वीज नव्हती. ऐंशीच्या दशकात गावात वीज आली. पण सतत सळसळ असल्याने उन्हाळ्यातदेखील उष्म्याचा त्रास होत नसे. फणसाची पानं सतत अंगणात पडायची. आजोबा त्या फणसाच्या पानांचे बैल तयार करायचे. घराच्या बाजूला शेगलाचं झाड होतं. त्या झाडाचा चिक, पत्र किंवा कागद चिटकवायला उपयोग व्हायचा. घरासमोरचं खळं नेहमी शेणाने सारवून, तिथं तांदळाचं पीठ कालवून त्यापासून रांगोळी काढली जायची; खळ्यात एक तुळशीवृंदावन होतं. असं सर्व डोळ्यासमोर येताना कविवर्य डॉ. वसंत सावंत यांची कविता आठवते.
अशा लाल मातीत जन्मास आलो, जिचा रंग रक्तास दे चेतना
इथे नांदते संस्कृती भारताची, घरातून दारात वृंदावना.
घरासमोर अशी वृक्षावळ होती, तर घराच्या मागे सर्व रायवळ आंब्यांची झाडं होती. त्या आंब्यांची झाडं म्हणजे भलेमोठे वृक्ष होते. त्या आंब्यांच्या चवीनुसार त्या आंब्यांना नावं दिली होती. ‘साखरा आंबा’, ‘खारा आंबा’, ‘काजीयाळा आंबा’, ‘गोडा आंबा’ अशी विचित्र नावं धारण केलेले आंबे हे आमच्या गावच्या (आयनल, जि. सिंधुदुर्ग) ग्रामसंस्कृतीचे साक्षीदार होते. घराच्या दारातून एक बिटकी आंब्याचं झाड दिसायचं. मागे काजूची, नारळाची, एखाददुसरं सागाचं अशी वृक्षसंपदा होती. त्याच ठिकाणी गुरांच्या गवताची ‘उटी’ उभी केलेली होती. याशिवाय मोगरा, तगर, अबोली अशी फुलझाडं होती.
हे घर गणेशोत्सवात उजळून निघायचं. आज ३० वर्षांनंतरसुद्धा त्या घरातला गणेशोत्सव आठवतो. देवघरात गणपती विराजमान होण्याआधी गणपतीची ‘माटी’ कोकणच्या फुलापानांनी सजवलेली असायची. त्यात सुपारी, कवंडळ यांची फळं असायची. हरणाची पिवळी फुलं, सफेद शेरवडाची पानं, कांगलाची पानं यांनी माटी सजलेली असायची. या दिवसांत सदरेवर भजनांची रेलचेल असायची. गणपतीच्या दिवसांत स्वयंपाकघरातून ऋषीची भाजी, भोपळ्याच्या भाजी, पडवळ-भेंडय़ांच्या भाजी शिजल्याचा घमघमाट यायचा. त्यात मुंबईत दिवाळीत तयार होणाऱ्या पुरणाच्या करंज्या- कोकणात मुख्यत: कणकवली तालुक्यात गणेशोत्सवात बनवल्या जायच्या; त्यांचा वास संपूर्ण वातावरणात भरून राहायचा.
गावात माझ्या चुलत्यांनी पिठाची गिरण सुरू केली, पण घरात जात्याची घरघर थांबली नव्हती. घावणे, आंबोळ्याचं, कुळथाचं पीठ जात्यावरच दळलं जायचं. धान्य साठवण्यासाठी घरात मोठय़ा कणग्या- ज्या बांबूंच्या झाडापासून तयार केलेल्या असायच्या किंवा गवतापासून बनवलेल्या बिबळे असायचे. कुठल्या तरी खोलीत टोपल्या, कोंबडय़ांना ठेवण्यासाठी झाप ठेवलेले असायचे. या सर्व वस्तू बांबूच्या काठीने बनवलेले होते.

इनामदाराच्या पाच पिढय़ा या घरात राहिल्या. मातीच्या भिंती उकरू लागल्या. घराचे नळे फुटत होते. ऐन पावसाळ्यात घर गळू लागायचं. मग जमिनीवर भांडी ठेवली जात, जेणेकरून शेणाने सारवलेल्या जमिनीत पाणी मुरू नये. पण हे घर दुरुस्त होणं शक्य नाही हे बाबा आणि चुलत्यांच्या लक्षात आलं. कुटुंब वाढतंय तेव्हा हे घर कोसळून नवीन घरं बांधावं हेच योग्य होतं. मग १९८५ च्या सुमारास जुनं घर कोसळलं आणि चिऱ्यांच्या भिंतीचं नवीन कौलारू घर बांधलं. घरासमोरची फणसाची झाडं, शेगलाची झाडं, पाठीमागचे आंबे, काजू सर्व वृक्षावळ तोडली. नवं घरं दिमाखात उभं राहिलं. जुनं घर पाडलं तेव्हा मी फार फार तर सात-आठ वर्षांचा होतो. मागच्या पिढय़ांकडे पैसा नव्हता. कोकणात नगदी पिकं नव्हती. तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने शेतीचं उत्पन्न फार नव्हतं, पण जुन्या घरात वाडवडिलांनी करून ठेवलेली पुण्याई, पुढच्या पिढीला मिळाली.
ही वास्तू सदा तथास्तू म्हणणारी ठरली. जुन्या घराची मापं आजही मनात कोरली आहेत. मातीच्या भिंतीत एक ग्रामसंस्कृती होती. जुन्या घराने आजही मनात घर केलंय. कारण या घरात पणजोबांचं दातृत्व होतं. आजोबांच्या व्यासंगाने आलेले भगवद्गीता, हरिविजय, भागवत या ग्रंथांची शिकवण होती.
वैभव साटम -vrsatam1979@gmail.com