सत्तास्थापनेसाठी राज्यात सध्या राजकीय उलथापालथ होण्यास सुरूवात झाली आहे. निकालानुसार सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर पक्ष कामाला लागले आहेत. राजकीय समिकरणे जुळविण्यासाठी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याकडून शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी फोन आला होता असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडून सेनेला पाठिंबा देण्यासाठी फोन आला होता. तिन्ही पक्षांचे आकडे जुळविल्यास १४६ आकडा गाठता येत होता परंतु, अशापद्धतीने राज्यात स्थिर सरकार ठेवणे कठीण जाईल म्हणून
भाजपला पाठिंबा जाहीर केला, असेही ते पुढे म्हणाले.
राज्यात कुणाचेही सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल. हे टाळण्यासाठीच आणि स्थिर सरकार यावे या उद्देशानेच आपण भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ केला असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या या बैठकीत अजित पवार यांची सर्वानुमते विधीमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली.