हरियाणाचे नवनियुक्त मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी हरियाणाचे दहावे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केली. सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.
प्रथमच हा शपथविधी सोहळा पंचकुला येथे आयोजित करण्यात आला होता. पंचकुला येथील सेक्टर पाचवरील मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला. १२०० व्हिआयपींसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.  सुरक्षेसाठी ३ हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. हरियानात भाजप पहिल्यांदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणार आहे. राम विलास शर्मा, ओम प्रकाश धनकड, अनिल विज, कॅप्टन अभिमन्यू, नरवीर सिंह, कविता जैन यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून यावेली शपथ घेतली. खट्टर यांच्या शपथविधी कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, सुषमा स्वराज, मनेका गांधी, व्ही. के. सिंह, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्यासह केंद्रातील काही कॅबिनेट मंत्री,  अन्य काही वरिष्ठ नेते उपस्थित होते.