राज्यातील संसदीय मंडळ आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील असे मत केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.   
दिल्लीवरून नागपुरात आगमन झाल्यावर विदर्भातील ४० ते ४२ आमदारांनी नितीन गडकरी यांची वाडय़ावर भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, विदर्भातील सर्व आमदार केवळ भेटीसाठी आले होते. महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी विदर्भातील आमदारांची इच्छा असली तरी ते शक्य नाही. त्या संदर्भातील भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. मात्र संसदीय मंडळ आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री होण्याचे संकेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असला तरी त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, शिवसेनेसोबत चर्चा सुरू असून त्यातून सकारात्मक निर्णय होऊन राज्यात भाजपाचे सरकार बनेल, असे मत केंद्रीय दळवळणमंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला असला तरी त्याबाबत कुठलीही चर्चा नाही. मात्र, शिवसेनेसोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असून त्यातून सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास आहे. राज्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. पूर्वी निवडणुकींमध्ये पक्षातील आमदारांच्या जमानती जप्त होत असताना ज्याची जमानत जप्त होत नव्हती त्याचा आम्ही सत्कार करायचो. मात्र, आज पक्षाच्या १२३ आमदारांपैकी जवळपास सर्वच आमदार ३० ते ४० हजाराच्या मताधिक्याने निवडून आले आणि हे सर्व यश पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे आहे. नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजनितीला लोकांनी स्वीकारले असून त्याचेच हे फळ आहे. विदर्भात आणि त्यातही नागपूर जिल्ह्य़ात पक्षाला मोठे यश मिळाले, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री व्हावे, अशी आमदारांची इच्छा असली तरी मी सध्या दिल्लीमध्ये खूष आहे. दिल्लीच्या राजकारणातून महाराष्ट्रात परत येण्याचा विचार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्यात कोण मुख्यमंत्री व्हावे, असे विचारले असता त्याबाबत संसदीय मंडळ निर्णय घेईल, असेही गडकरी म्हणाले. पक्षात कुठलीही गटबाजी नाही. राज्याचे नेतृत्व जो कोणी करेल त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास करण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले. यावेळी विदर्भातील सर्व आमदारांचे नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांनी स्वागत केले.
आनंदरावांचा सत्कार
भारतीय जनता पक्षाचे संघापासूनचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांचा यावेळी सर्व आमदारांच्या उपस्थितीत गडकरींनी सत्कार केला. आज मी जो कोणी आहे ती सर्व आनंदरावांचीच देण आहे, असे गौरवोद्गारही यावेळी गडकरींनी काढले.