शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा राज्याच्या राजकारणात दबादबा राहिला. मुख्यमंत्री बदलाची वेळ आली की नेहमी जिल्ह्यातील एकतरी नाव स्पर्धेत असते, पण लोकसभेतील पराभवाचा धक्का, सत्ताबदलाची चिन्हे, काँग्रेस-राष्ट्रवादीची फुटलेली मतपेटी, सहकाराचा ओसरलेला प्रभाव यामुळे नेत्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. मधुकर पिचड, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे हे तीन मंत्री याच मतदारसंघात आहेत. ते नेहमी एकमेकांवर कुरघोडय़ा करत, पाडापाडीचा खेळ खेळत, पण आता त्यांच्याच पुढे स्वत:ची आमदारकी टिकविणे हेच मोठे आव्हान आहे.
श्रीरामपूर
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला या मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, गोिवदराव आदिक, काँग्रेसचे जयंत ससाणेंचा प्रभाव, सेना-भाजपाचीही आता ताकद वाढली आहे. ससाणेंनी मागील निवडणुकीत भाऊसाहेब कांबळेंना काँग्रेसकडून आमदार केले. पण ससाणेंना विखे-थोरातांनी त्रास दिला. शिर्डीचे साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद मिळू दिले नाही. तूर्तास काँग्रेसमध्ये असले तरी सेनाप्रवेशाचा विचार त्यांचा मनात डोकावत आहे. नेवाशातून भाजपाला तिकीट मिळावे म्हणून मुरकुटेंचा प्रयत्न आहे. दोघांनी पक्षांतर केले, महायुतीत आले तरी त्यांचा छुपा संघर्ष सुरुच राहील. सेनेकडून साहित्यिक लहू कानडे व काँग्रेसकडून आमदार कांबळेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
नेवासे
राजकारणी व साहित्यिक असलेले यशवंतराव गडाख यांचे सत्ता स्पर्धेतून राजकीय खच्चीकरण केले गेले. पण त्यांनी मुलगा शंकर यांना मागील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार केले. आमदार गडाख हे मितभाषी आहेत. प्रस्थापित विरोधी हा तालुका आहे. त्यामुळे नेहमी विरोधाला गडाख यांना तोंड द्यावे लागते. मुळेच्या पाण्यामुळे आर्थिकदृष्टय़ा संपन्न तालुक्यात गडाखांच्या विरोधात भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी डझनभर इच्छुक आहेत. माजी आमदार भानुदास मुरकुटे भाजपाकडून इच्छुक आहेत.
 शिर्डी
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांचा हा मतदारसंघ, राजकारणात सब कुछ विखे, संस्था व सत्तेमुळे त्यांचा पराभव करणे कठीणच. विखेंना शह देण्याचा शरद पवार, (स्व) विलासराव देशमुख या नेत्यांनी प्रयत्न करुन पाहिला, तो जमला नाही. पण मागील निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र पिपाडांनी त्यांना झुंजविले. लोकसभेत खासदार लोखंडेंना मताधिक्य मिळाल्याने विखे हादरले. सेनेच्या उमेदवारीसाठी विखे यांचे नातेवाईक अभय शेळके यांचे नाव आहे. कैलास कोते, विजय कोते, राजेंद्र पिपाडा सेनेकडे उमेदवारीसाठी आग्रह धरत आहेत.
संगमनेर
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व शरद पवारांशी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची जवळीक असून विरोधकांशीही चांगले संबंध आहेत. मतदारसंघातील विरोधक त्यांनी संपविले, पण स्वपक्षातील विखेंचा छुपा विरोध नेहमीच त्रासदायक ठरला. नेतृत्वाच्या स्पर्धेमुळे विखे-थोरातांनी एकमेकांना पाण्यात पाहिले. पण लोखंडेंना संगमनेर मतदारसंघातून आघाडी मिळाली असली तरी थोरातांना विजय मिळणे सुकर असूनही ते सावध आहेत.
अकोले
या मतदारसंघाने आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचडांना नेहमी साथ दिली. धनगर आरक्षणात त्यांनी आदिवासींची पाठराखण केली. मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा दिला. त्याचा लाभ होईल. स्वत:ऐवजी मुलगा वैभवला रिंगणात उतरविले तर अवघड होईल. पण सेनेची उमेदवारी भांगरे की मधुकर तळपाडे यापैकी कुणाला मिळते याला महत्व आहे.  
कोपरगाव
शंकरराव कोल्हे व (स्व) शंकरराव काळे यांचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ. अशोक काळे हे सेनेचे आमदार, आता चिरंजीव आशुतोषला  उभे करणार. बिपीन कोल्हे यांचा अपक्ष उमेदवारीचा विचार आहेत्. राष्ट्रवादी किंवा काँग्रेसने नितीन औताडेंना उमेदवारी दिली तर होणाऱ्या तिरंगी लढतीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न आहे.