दिल्लीश्वरांपुढे झुकणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आता मवाळ झाली असून भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याची तयारी शिवसेनेने दाखविली आहे. १९९५ मधील युती सरकारच्या जागावाटप सूत्रानुसार सत्तेत सहभाग असावा असा सेनेचा प्रस्ताव भाजपने फेटाळला आहे. ठाकरे व शिवसेना नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडवट टीका केल्याने आणि भाजपची ताकद आता वाढल्याने कोणतेही जुने सूत्र आता लागू नाही, अशी भूमिका भाजपने घेतली असून शिवसेनेच्या अटींवर नव्हे, तर भाजपच्या इच्छेनुसार शिवसेनेला सत्तेत वाटा दिला जाईल, असे भाजपने ठरविले असल्याचे उच्चपदस्थांनी स्पष्ट केले.
शिवसेनेने भाजपवर निवडणुकीमध्ये  टीका केली, अफझलखानाच्या फौजांना मराठी बाणा व स्वाभिमान दाखविला जाईल, अशी भाषा शिवसेना नेत्यांनी वापरली होती. पण निवडणुकीत फारसे यश न मिळाल्याने आणि १५ वर्षे सत्तेपासून दूर राहिल्याने शिवसेना नेत्यांना आता सत्तेत सहभागी होण्याची तीव्र इच्छा आहे. उगाच हट्टीपणा करुन भाजपसाठी अधिक जागा न सोडण्याचा निर्णय घेतलाच नसता, तर सन्मानपूर्वक सत्तेत वाटा मिळाला असता, असे काही शिवसेना नेत्यांना वाटत आहे. भाजपलाही बहुमतासाठी शिवसेनेच्या मदतीची आवश्यकता आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची ताठर भूमिका चालवून घ्यायची नाही, आपल्या इच्छेनुसार तडजोड झाली तरच पाठिंबा घ्यायचा, अशा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना आहेत.
युतीची १९९५ मध्ये सत्ता आली, तेव्हा भाजपच्या ६५ व शिवसेनेच्या ७२ जागा होत्या. त्यावेळी भाजपला उपमुख्यमंत्रीपद, गृह, अर्थ, उर्जा अशी महत्वाची खाती भाजपकडे होती. शिवसेनेपेक्षा भाजपला दुप्पट जागा मिळाल्याने त्या सूत्रानुसार शिवसेनेला सत्तेतील वाटा देण्याची भाजपची तयारी नाही. फार तर १५ मंत्रिपदे देण्याची भाजपची तयारी आहे. शिवसेनेला मात्र हे अमान्य आहे. आम्ही देऊ तेवढीच मंत्रीपदे व तीच खाती शिवसेनेने स्वीकारली पाहिजेत, अशी भाजपची भूमिका आहे. केंद्रात ज्याप्रमाणे अवजड उद्योगसारखे खाते शिवसेनेच्या गळ्यात बांधण्यात आले, तशाच पध्दतीने शिवसेनेला अद्दल घडविण्याची भाजपची योजना आहे. जागावाटपाच्या वेळी ज्याप्रमाणे शिवसेनेने भाजपला वागणूक दिली, त्याच पध्दतीने शिवसेनेचा आता वचपा काढायचा. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या दबावाला झुकायचे नाही असे भाजपने ठरविले आहे.

निवडणूक मुद्दय़ांवर लढलो-संजय राऊत
विधानसभेची निवडणूक आम्ही मुद्दय़ांवर लढलो. भाजप हा आमचा काही शत्रू नाही. भारत-पाकिस्तानमध्ये जर चर्चा होऊ शकते, तर ती दोन राजकीय पक्षांमध्येही होऊ शकते. चर्चा अखंड सुरुच आहे, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. अखंड महाराष्ट्राच्या मुद्दय़ावर शिवसेना कधीही तडजोड करणार नाही. आम्हाला सन्मानजनक प्रस्ताव भाजपकडून आल्यास त्यावर विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.