सच्चा हवाई योद्धा हरपला

भारत आणि पाकिस्तानमधील १९६५ च्या युद्धातील प्रसंग. पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवर छांब-जोरियां येथ पॅटन रणगाडय़ांनिशी मोठा हल्ला केला होता. लष्कराला हवाई दलाची मदत गरजेची होती. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जे. एन. चौधरी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अर्जन सिंग यांना संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तातडीने कार्यालयात बोलावून घेतले होते. परिस्थिती समजावून घेतल्यावर चव्हाण यांनी सिंग यांना एकच प्रश्न विचारला, हवाईदल किती वेळात हल्ला करू शकते? आणि अर्जन सिंग यांनी त्यांच्या नेहमीच्या बाणेदारपणे उत्तर दिले, एका तासात. चव्हाण यांनी अक्षरश: पाच मिनिटांत हवाई हल्ल्याचे आदेश दिले आणि दिलेल्या शब्दाला जागत हवाई दलाची विमाने एका तासाच्या आत आघाडीवर पाकिस्तानी रणगाडय़ांच्या डोक्यावर घिरटय़ा घालू लागली होती. त्यापुढील इतिहास सर्वज्ञात आहे.

१९६५ च्या युद्धात हवाई दलाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल आणि एकंदर देशसेवेची दखल घेऊन अर्जन सिंग यांना जानेवारी २००२ मध्ये मार्शल ऑफ द इंडियन एअर फोर्स हा सर्वोच्च किताब देऊन गौरवण्यात आले. लष्करातील फिल्ड मार्शलच्या समकक्ष असणारा हा पंचतारांकित सन्मान मिळवणारे ते भारतीय हवाई दलातील पहिले आणि एकमेव अधिकारी होते. त्यांच्या निधनाने देशाने एक सच्चा हवाई योद्घा गमावला आहे.  अर्जन सिंग यांचा जन्म अखंड भारतातील पंजाबमधील लायलपूरजवळील (सध्या पाकिस्तानमधील फैसलाबाद) कोहाली या गावात १५ एप्रिल १९१९ रोजी झाला. त्यांचे वडिल व आजोबा ब्रिटिश भारतीय सैन्यात घोडदळात होते. त्यांचे शालेय शिक्षण माँटगोमेरी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण लाहोर येथे झाले. त्यानंतर त्यांची तत्कालीन ब्रिटिश भारतीय हवाई दलात निवड झाली. वयाच्या १९ व्या वर्षी ब्रिटनमधील क्रॅनवेल येथील हवाई दल अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून १९३८ साली हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून दाखल झाले. भारतीय हवाई दलातील नंबर वन स्क्वॉड्रन या पहिल्या तुकडीत त्यांची नेमणूक झाली. सुरुवातीला वायव्य सरहद्द प्रांतात सेवा बजावल्यानंतर त्यांची नेमणूक बर्मा (आताचा म्यानमार) आघाडीवर झाली. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी इम्फाळ व रंगूनच्या लढायांत भाग घेतला. त्यावेळी जपानी सैन्याविरुद्ध गाजवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना डिस्टिंग्विश्ड फ्लाईंग क्रॉस हे शोर्यपदक देऊन गौरवण्यात आले होते. नंतर त्यांनी नंबर वन स्क्वॉड्रनचे नेतृत्वही केले.

अर्जन सिंग ऑगस्ट १९६४ ते जुलै १९६९ या काळात भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी वेस्टलँड वापिती, हॉकर हरिकेन, व्हँपायर, नॅट यासह ६० प्रकारची विमाने चालवली होती. हवाई दलाच्या आधुनिकीकरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. निवृत्तीनंतर त्यांनी भारताचे स्वित्र्झलड, व्हॅटिकन व केनिया येथील राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळली होती. एक वर्षांसाठी दिल्लीचे लेफटनंट गव्हर्नर होते. पश्चिम बंगालमधील पानागड येथील हवाई तळाला २०१६ साली त्यांचे नाव देण्यात आले होते. अन्य अनेक शौर्यपदकांसह त्यांना पद्म विभूषण हा नागरी सन्मान मिळाला होता.