भाऊसाहेब ऊर्फ गणेश बा. नेवाळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष कुठे साजरे केले जाईलच, असे नाही; पण स्वातंत्र्योत्तर काळात उद्योग-क्षेत्रात आणि सत्तेच्या जवळ राहूनही मूल्यांची जपणूक कशी करता येते याचा एक आदर्श घालून देणारे म्हणून त्यांचे स्मरण केले पाहिजे. ते करता-करता, या क्षेत्रातील आजच्या मूल्यांबद्दल अंतर्मुख होण्याची संधी देणारा लेख..
भाऊसाहेब नेवाळकर आज असते तर २८ ऑगस्ट रोजी त्यांनी १०० व्या वर्षांत पदार्पण केले असते. त्यांच्या नखात रोग नव्हता, त्यामुळे ते सहज शंभरी गाठतील असे वाटत असे. शिवाय रोजचा व्यायाम, सात्त्विक मिताहार, शांत झोप व नेहमीच इतरांचे शुभ चिंतणे व शक्यतो सर्वाना मदत करणे या स्वभावामुळेही असावे; पण त्यांचे मन शांत व नव्या विचारांना उत्सुक असायचे. वयात अंतर असूनही त्यांच्याशी वाटेल त्या विषयांवर गप्पा मारता यायच्या. तुम्ही असे का वागलात, असे प्रश्न विचारण्यात त्यांचा अधिक्षेप होतो असेही कधी वाटले नाही. त्यांचे मोठेपण त्यांनी कधीच अंगावर बाळगले नाही. अर्थात त्यांच्या कर्तृत्वाचा आदर व म्हणून धाकही मनात असायचा; पण त्यांच्या मोकळ्या वागण्याने त्यांच्यात व सामान्य माणसात कधी अंतर निर्माण झाले नाही. त्यांचे कर्तृत्व आणि विचारांची झेप बघता, त्यांना हे कसब कसे काय साध्य झाले होते याचे आजही नवल वाटते; पण यशस्वी माणसाने कसे असावे याचा ते आदर्शही वाटतात.
स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणींत भाऊ खूप रमायचे; पण स्वातंत्र्योत्तर काळात भाऊंच्या कर्तृत्वाला वेगळीच झळाळी मिळाली. तो काळच भारताच्या नवनिर्माणाच्या आकांक्षेने भारलेल्या नेत्यांचा होता. स्वातंत्र्य चळवळीत काम केल्यामुळे सामान्य जनतेशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली होती. दैन्य, दु:ख व दारिद्रय़ या त्यांच्यासाठी ऐकीव गोष्टी नव्हत्या. अशा नेत्यांपैकी एक म्हणजे यशवंतराव चव्हाण! त्यांचा व भाऊंचा परिचय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान झाला असावा. त्याच वेळी त्यांनी भाऊंच्यातले गुणही हेरले असावेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्याच सुमारास भाऊंनी राजकारण सोडले होते व छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या करीत, पत्रकारिता करीत, पुढची दिशा काय असावी याचा ते विचार करीत होते. मला असे वाटते की, त्यांच्यात उद्योजकतेची आवड सुप्तावस्थेत असावी म्हणूनच काही नोकऱ्या सोडल्यावर, त्या काळी नावीन्यपूर्ण वाटेल अशी, खासगी-सरकारी सहकार्यातून उभारलेल्या उद्योगाची कल्पना त्यांच्या मनात आली. सामान्य परिस्थितीतून वर आल्यामुळे भांडवल त्यांच्याकडे नव्हतेच. विज्ञानाची आवड होती व म्हणून ‘महाराष्ट्र मिनरल्स कॉर्पोरेशन’ ही कंपनी स्थापन करून प्रथम श्रीवर्धनला व मग सिंधुदुर्गात सरकारकडून जमीन लीजवर घेऊन खाण उद्योगात पदार्पण केले. त्यात पूर्ण झोकून देण्याअगोदरच, चव्हाणांनी नव्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ती पार पडेतो १९ ऑक्टोबर १९६२ साली मुख्यमंत्री चव्हाणांनी, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना केली व त्याचे अध्यक्ष म्हणून भाऊंचे नाव घोषित केले. हे सर्व परस्पर झाले होते; पण हे स्वीकारावे किंवा नाही याचा निर्णय घेण्यापूर्वी भाऊंनी यामागची अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चव्हाण म्हणाले, ‘‘नवीन विकास संस्था स्थापताना ज्याला सामाजिक जाण आहे, तसेच सामाजिक व राजकीय अनुभव आहे व उद्योगधंद्याचीही जाण आहे, अशा व्यक्तीकडे हे पद सोपवावे असा माझा विचार होता. म्हणून तुम्हाला न विचारता मी तुमचे नाव जाहीर केले.’’ बऱ्याच विचारान्ती भाऊंनी ही जबाबदारी स्वीकारली.
यशवंतराव चव्हाणांनंतर वसंतराव नाईकांनी भाऊंना लघुउद्योगाच्या विकासाबद्दलच्या स्वत:च्या कल्पना मुक्तपणे राबवण्यात पूर्ण पाठिंबा दिला. भाऊंनीही फक्त व फक्त महाराष्ट्र राज्याचा विकास- म्हणजे महाराष्ट्रातील लघुउद्योग तसेच उद्योजक यांचा विकास हाच विचार सर्ववेळ मनात ठेवला. त्यासाठी त्यांनी सर्व राज्यांचा अनेक वेळा दौरा केला. सर्व विभागांतील कारागिरांना समान मदत देऊनही सर्व भागांचा समान विकास होऊ शकला नाही. तसेच नवीन कल्पना राबवणाऱ्या उद्योजकाला भागीदारीच्या रूपात मदत करण्याची योजनाही राबवली गेली. काही योजना खूपच यशस्वी झाल्या, तर काही फसल्या. महाराष्ट्र लघुउद्योगाला दहा वर्षे झाली असता केलेल्या समारंभात मुख्यमंत्री वसंतराव नाईक म्हणाले, ‘‘जो काम करतो तोच चुका करतो.’’ यशवंतराव चव्हाण म्हणाले, ‘‘नव्या दिशा शोधताना नव्या कल्पना व नव्या योजना अमलात आणाव्या लागतात. हे सर्व करायला धाडस लागते.’’ भाऊ कबूल करतात की, त्यांच्या सर्वच योजना यशस्वी झाल्या नाहीत; परंतु त्यांनी पैठणी उद्योगाचे केलेले पुनरुज्जीवन, कोल्हापुरी चप्पल उद्योगाला केलेली मदत तसेच महाराष्ट्रातील लघुउद्योगांना मदत व्हावी म्हणून दिल्लीत उघडलेले त्रिमूर्ती हे स्टेट एम्पोरियममधले सर्वात पहिले एम्पोरियम ही त्यांनी केलेल्या अनेक महत्त्वाच्या कामांपैकी काही.
कामानिमित्त भाऊंना बरेच वेळा दिल्लीला जावे लागे. तिथे त्यांची गाठभेट या क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील इतर लोकांबरोबर व्हायची, त्यांच्यावर स्वत:ची छाप ते पाडू शकले याचे कारण म्हणजे त्यांचे निर्भीड व परखड बोलणे व वागणे! त्यांनी हे अध्यक्षपद स्वीकारले याचे, माझ्या मते कारण म्हणजे त्यांना या कामात आव्हान वाटले. त्यातून त्यांनी कधीही स्वत:चा ऐहिक स्वार्थ साधला नाही. त्यांचे विचार स्पष्ट होते व शहाण्या माणसांना त्यांचे बोलणे पटायचे. त्या वेळी शहाणी माणसे दुर्मीळ नव्हती. त्यांच्या महामंडळाच्या कारकिर्दीत अशा अनेक घटना घडल्या, ज्या वेळी त्यांचे परखड व स्पष्ट विचार संबंधितांना बोचले, पण विचाराअंती पटले. पुढे भाऊंना बँक ऑफ बरोडाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर घेतले गेले. भाऊ नेहमी म्हणायचे, ‘‘मी काही पुस्तकं वाचत नाही. हे प्रोफेसर लोक उगाच वाचतात.’’ आणि बँकेची हकीकत सांगताना म्हणाले, ‘‘मी चार दिवस सुट्टी घेतली व बँकेवरची सगळी पुस्तके वाचून काढली.’’ Bank is the repository of people’s faith. मग त्यांनी बँकिंगची इतकी माहिती सांगितली व इतक्या पुस्तकांची नावे सांगितली, की त्यामुळे कुणाच्याही ज्ञानात भर पडावी. ‘मी काही वाचत नाही’ हे त्यांचे म्हणणे बहुधा कामासाठी वाचन म्हणजे वाचन नव्हे असे असावे. कारण अभ्यास केल्याशिवाय त्यांनी कुठल्याही क्षेत्रात पाय ठेवला नाही. पुढे त्यांच्या लक्षात आले की, लघुउद्योजकांचे अनेक प्रश्न समान असतात. एकत्र आल्यास हे प्रश्न सोडवणे सोपे होईल. त्यासाठी लघुउद्योग विकास महामंडळाची अखिल भारतीय शिखर संस्था स्थापन झाली व मुंबईला त्याचे केंद्रीय ऑफिस आले. भाऊसाहेबांना त्याचे पहिले अध्यक्ष निवडण्यात आले. दशकपूर्तीचा दिमाखदार सोहळा झाल्यावर भाऊसाहेबांच्या मनाने घेतले की, राजकारणाची दिशा बदलत आहे. आपण या क्षेत्रात जेवढे करायचे तेवढे केले आहे. आता नवे विचार या क्षेत्रात यायला हवेत. १९७४ साली आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाऊ मोकळे झाले. भाऊंनी या काळातील आपल्या आठवणी लिहिल्या आहेत, त्या मुळातूनच वाचणे योग्य ठरेल.
महामंडळाच्या व इतर कामांनिमित्त हिंडताना त्यांच्या लक्षात आले की, उद्योजकता हा एक वेगळा विषय आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा इत्यादी मागास विभागांत उद्योजकता शिबिरे भरवली व त्यासाठी त्यांनी ‘निमिड’ (National Institute of Motivational and Institutional Development) स्थापन केली जी अजून कार्यरत आहे.
भाऊ कामापुरते काम ठेवत नसत. याचे उदाहरण म्हणजे अचानक कोकम तेलाला इटलीतून मोठय़ा प्रमाणावर मागणी आली. खरेदीदार त्याचे काय करतात याचे भाऊंना कुतूहल! दुसऱ्या एका कामानिमित्त इटलीला गेले असताना त्यांनी त्या ग्राहकाची मुद्दाम भेट घेतली व शोधून काढले की, कोको बटर खूप महाग झाल्याने, त्याऐवजी चॉकलेटमध्ये कोकम बटरचा उपयोग करतात.
१९७७ साली जनता पक्षाचे राज्य दिल्लीत आले. भाऊसाहेबांचे कार्य व त्यांच्या विचारांशी परिचित सर्वच होते. त्यामुळे त्यांना हॅण्डलूम व हॅण्डिक्राफ्ट कमिशनचे अध्यक्ष नेमण्यात आले. या काळात त्यांनी काश्मीरच्या गालिचा उद्योगास उत्तेजन दिले व पहिला मोठा गालिचा स्वत: खरेदी केला. जेव्हा त्यांनी त्या कारागिरांना रोख रक्कम देऊ केली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला; पण भाऊंच्या तत्त्वाप्रमाणे त्यांनी पहिल्या पैठण्या खरेदी केल्या, तसेच पहिले गालिचेही स्वत:च्या पैशांनी खरेदी केले. शिवाय त्यांना विक्रीच्या दृष्टीने सुधारणा सुचवल्या. त्यांना बाजारपेठही मिळवून दिली. दोन वर्षांनंतर, जनता पार्टीचे सरकार पडल्यावर, भाऊ स्वत: नव्या मंत्र्यांकडे गेले व स्वत:चा राजीनामा देऊन आले. या सर्व कामांत ते गुंतले नव्हते का? तर होते. कारण त्यानंतर किती तरी वर्षांनंतर बोलताना, सर्व हॅण्डलूम, हॅण्डिक्राफ्टस्चे प्रश्न, लघुउद्योगांचे प्रश्न त्यांच्या तोंडावर होते. गुंतल्याशिवाय हे शक्य होत नाही. त्याच वेळी बोलताना, ‘‘मी सोडल्यावर कसे सगळे वाईट झाले..!’’ असे म्हणणे नाही वा सूरही नाही. हे जमणे खरोखर अवघड असते.
या कामासाठी त्यांना दिल्लीत घर मिळू शकत होते; पण त्यांनी ते नाकारले. ‘काय गरज?’ म्हणून. इतक्या वेगवेगळ्या वरच्या हुद्दय़ांवर काम करीत असूनही कुठेही त्यांच्या नावावर घर नव्हते. वयाच्या ८०व्या वर्षी भाडय़ाचे घर सोडण्याचा प्रसंग आल्यावर, घरमालकाने भाऊंचा चांगुलपणा जाणून त्यांना घर घेण्यासाठी पैसे दिले. जवळजवळ ९० वर्षे वय झाल्यावरही ते ‘महाराष्ट्र मिनरल्स’च्या ऑफिसमध्ये रोज जात होते. रोज जाणे बंद झाल्यावर घरातच वेगाने चकरा मारणे, घराभोवतालचा परिसर झाडला न गेल्यास मुलाच्या नकळत झाडू मारणे, पाहुणे आल्यावर पहाटे उठून काचेची भांडी घासून टाकणे वगैरे उद्योग चालायचे. डोक्यामध्ये मात्र सतत समाजाचा विचार असे. त्यामुळे त्यांचे विचार कधी शिळे वाटले नाहीत. म्हणून आजही काही चांगले वाचल्यावर चर्चा करायला भाऊ नाहीत ही उणीव जाणवते.
*लेखिका मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील माजी प्राध्यापक आहेत.
*उद्याच्या अंकात सदानंद मोरे यांचे ‘समाज-गत’ हे सदर.