डॉ. गोवारीकर हे माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला बरेच शिकायला मिळाले. विशेषत: कसोटीचे प्रसंग सौम्यपणे कसे हाताळायचे हे त्यांच्याकडून शिकता आले. एकदा मी त्यांच्यासोबत मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनाला निघालो होतो. प्रवास लांबचा होता. आम्हाला उशीर झाला होता. त्यामुळे निराश झालो होतो. त्या वेळी ते म्हणाले होते की, जास्त काळजी करू नका, यानिमित्ताने आपल्याला जास्त वेळ गप्पा मारता येतील. असे हे व्यक्तिमत्त्व होते.गोवारीकर हे कुलगुरू असताना त्यांनी पुणे विद्यापीठातही बऱ्याच सुधारणा केल्या होत्या. त्या वेळी मी ‘आयुका’मध्ये होतो. त्यामुळे त्यांचे काम जवळून पाहता आले. कोणतीही गोष्ट नियोजन करून करायची, अशी त्यांची पद्धत होती. तीच त्यांनी विद्यापीठाच्या कारभारात वापरली होती.
– डॉ. जयंत नारळीकर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खगोलशास्त्रज्ञ

गोवारीकर यांच्या निधनाने आपल्या अजोड बुद्धीने व अपार कष्टाने अवकाशाला गवसणी घालणा-या पण त्याचबरोबर मातीशी नातं जपणा-या गुणी शास्त्रज्ञास भारत मुकला आहे. हवामान अंदाज, पीकवाढ, जमिन सुपिकता, खते- सूक्ष्म द्रव्ये संशोधन अशा नानाविध बाबतीत त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल भारतीय शेतकरी वर्गात गोवारीकरांच्या बाबत आदरभाव चिरंतन राहील. गोवारीकरांनी लिहिलेला खतांचा विश्वकोष ज्ञानाचे भांडार आहे.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>

गोवारीकर यांच्या निधनाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. अंतराळ विज्ञानापासून विज्ञानातील विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे काम अतुलनीय होते. याचबरोबर ंसमाजातील विविध गरजा लक्षात घेऊनही त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. यामुळे त्यांनी विज्ञानाला वेगळे स्थान निर्माण करून दिले.
-डॉ. अनिल काकोडकर, भारतीय अणू उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष
           
आज आपण भारतीय अंतराळ संस्थेच्या अर्थात इस्रोच्या यशाचा अभिमान बाळगतो. पण, या इस्रोची खरी उभारणी डॉ. गोवारीकर यांनी केली. त्यांनी घालून दिलेल्या पायामुळे आज इस्रोला मंगळभरारी शक्य झाली. त्यांचे काम विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन या तिन्ही क्षेत्रात मोठे होते. त्यांनी देशाला विज्ञान नेतृत्व दिले. विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव असताना त्यांनी विज्ञानाच्या हितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयांमुळे विज्ञान क्षेत्रात दोन टक्क्यांपर्यंत गुंतवणूक शक्य होऊ शकली आहे. त्यांच्या निधनामुळे विज्ञान क्षेत्राचे मोठा मार्गदर्शक हरपल्यासारखे वाटले.
– डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ वैज्ञानिक

वसंतकाकांबद्दल आम्हाला वेगळा आदर आहे. त्यांचे क्षेत्र वेगळे असले तरी माझ्या चित्रपटांबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय हे मला खूप महत्त्वाचे वाटे. मी त्यांच्याशी चित्रपटांबद्दल तासन्तास बोलत असे.
– आशुतोष गोवारीकर,दिग्दर्शक

अंतराळ मोहिमांचे शिल्पकार
अल्पचरित्र
डॉ. गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी पुण्यात झाला. त्यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले. विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील mu04बर्मिगहॅम विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी. मिळवली. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील ‘अ‍ॅटॉमिक एनर्जी रीसर्च एस्टॅब्लिशमेंट’ मध्ये रासायनिक अभियांत्रिकी विभागात तर ‘समरफील्ड रीसर्च स्टेशन’ येथे क्षेपणास्त्रांसाठीच्या मोटारी बनवण्याच्या प्रकल्पात काम केले. डॉ. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे गोवारीकर यांनी मायदेशी परत येऊन रॉकेटसाठीचे इंधन बनवण्याच्या क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. देशाच्या अनेक अंतराळ मोहिमांची पायाभरणी गोवारीकर यांच्या कारकिर्दीत झाली. पुढे विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे आणि त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांनी समर्थपणे जबाबदारी पेलली. ‘एसएलव्ही- ३’ (सॅटेलाइट लाँचिंग व्हेइकल) या अद्यावत उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण ही त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाची घटना मानली जाते.
सलग चार पंतप्रधानांचे विज्ञान व तंत्रज्ञानविषयक सल्लागार म्हणून काम केलेल्या गोवारीकर यांनी या काळात त्यांनी मोसमी पावसाचा अंदाज वर्तवणाऱ्या पथकाचे नेतृत्व केले. त्यासाठी त्यांनी हवामानशास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिले. त्याद्वारे प्रसिद्ध ‘पॉवर रिग्रेशन’ मॉडेल विकसित करण्यात आले. हे मॉडेल १९८८ पासून हवामान विभागाने वापरले. ते २००२ पर्यंत वापरात होते. ते ‘गोवारीकर मॉडेल’ म्हणूनही ओळखले जात होते.
रॉकेट तंत्रज्ञान क्षेत्राच्या बाहेर पाऊल टाकून गोवारीकर यांनी व्ही. एन. कृष्णमूर्ती यांच्या सहकार्याने लिहिलेली ‘फर्टिलायझर एनसायक्लोपिडिया’ आणि ‘पेस्टिसाइड सायक्लोपिडिया’ ही पुस्तके विशेष गाजली. गोवारीकर यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांना २००८ मध्ये पद्मभूषण व तत्पूर्वी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.  ते  पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष होते.