अमर जाधवराव, कंपनी व्यवहारप्रमुख, आरपीजी एंटरप्रायजेस

आ र्थिक स्वातंत्र्यांची आज जी खऱ्या अर्थाने आपण फळे चाखतो आहोत त्या अडीच दशकांपूर्वी सुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणाची घटना माझ्यासाठी एक भारतीय म्हणून अभिमानाची घटना वाटते. सामान्यांसह अनेकांच्या आयुष्यावर मोठय़ा प्रमाणात बदल घडविणारी ही प्रक्रिया होती. देशाला एका नव्या टप्प्यावर नेऊन ठेवणारी ही घटना होती. उदारीकरणामुळे ‘लायसन्सराज’ संपुष्टात आले, असे नेहमीच म्हटले जाते. मात्र माझ्या दृष्टीने सर्वाधिक बदल झाला तो अर्थस्थितीत. एका पारंपरिक विचारसरणीच्या जोखडातून तमाम अर्थ, उद्योगव्यवस्था यामुळे स्वतंत्र झाली. आशियातील एक भक्कम अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे आज साऱ्या जगाची नजर आहे.  अमेरिका, रशियासारख्या जागतिक महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था अधिक विकास दर गाठणारी आहे. उदारीकरणाने खासगी क्षेत्र केवळ खुलेच झाले नाही तर त्याला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. त्याच्या वाढीबरोबरच मोठय़ा प्रमाणात रोजगारही वाढला. आर्थिकदृष्टय़ा आवाक्यात नसलेल्या अनेक वस्तू, सुविधा त्यातून निर्माण झालेल्या स्पर्धेतून अनेकांकरिता उपलब्ध झाल्या. सेवा पुरवठादार, उत्पादकाचे महत्त्व नगण्य होऊन ग्राहक राजा बनला. विदेशी कंपन्या, उद्योग आणि अप्रत्यक्षरीत्या त्यांचे देश हे भारतारकडे आपले उत्पादन निर्मितीकरिता ‘हब’ म्हणून पाहू लागले. वस्त्रोद्योग, वैद्यकीय पर्यटन, शैक्षणिक संस्था यासाठी भारत एक प्रमुख निर्यातदार देश बनला. गेल्या २७ वर्षांमध्ये भारताला केवळ आर्थिक, औद्योगिक प्रगतीच साध्य करता आली नाही तर विज्ञान, संशोधन, शिक्षण, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, किरकोळ व्यापार याही क्षेत्रात देशाला मुसंडी मारता आली ती केवळ भारताची अर्थव्यवस्था खुली झाल्यामुळेच.