चीनने भारताच्या भोवताली असलेल्या देशांशी मैत्री साधून नेहमीच भारतावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला.  आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगोलियाचा दौरा करताना चीनच्या शेजारी देशाशी मैत्री साधून, चीनचेच धोरण वापरून त्याच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा मंगोलिया दौरा हा अनपेक्षित असला तरी त्याला वेगळा अर्थ आहे. मंगोलियासारख्या देशाला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. या दौऱ्याला सांस्कृतिक राष्ट्रवाद व इतर परिमाणेही आहेत..

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत हे खरे असले, तरी ते युरेशियाच्या उंबरठय़ावरील व चीन-रशिया यांच्यात सँडविचसारख्या दाबल्या गेलेल्या मंगोलिया या एरवी दुर्लक्षित देशातही जाणार आहेत. मोदी यांचे वैशिष्टय़ म्हणजे ते आतापर्यंत फारसे महत्त्व न दिलेल्या देशातही जात आहेत. कॅनडाला भेट देणारे ते ४१ वर्षांतील भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. चीन भेटीइतकीच त्यांची मंगोलिया भेटही महत्त्वाची पण अनपेक्षित आहे. मोदींच्या आजपासून सुरू होणाऱ्या तीन देशांच्या दौऱ्यात चीनचा दौराच भाव खाऊन जात आहे. पंतप्रधान मोदी हे भारत-चीन संबंधांकडे नेहमीच्या मोजपट्टीपेक्षा वेगळ्या अंगाने बघतात. चीनमध्ये जाऊन ते पुन्हा ‘मेक इन इंडिया’वर भर देतील व थेट परकीय गुंतवणुकीसाठी प्रयत्न करतील; पण त्याचबरोबर मंगोलियाप्रमाणेच भारताकडून दुर्लक्षित राहिलेल्या दक्षिण कोरियालाही ते भेट देणार आहेत. दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था जगातील एक प्रगत अर्थव्यवस्था आहे. ईशान्य आशियाच्या मध्यभागी हा देश आहे. पण मंगोलिया भेटीचे काय.. पंतप्रधान मोदी हे मंगोलियाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

lokmanas
लोकमानस: धार्मिकतेला धर्मांधतेकडे वळविण्याचा प्रयत्न
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण

मंगोलिया हा देश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण तेथे नैसर्गिक युरेनियमचे साठे आहेत, इतर मौल्यवान खनिजे आहेत. युरेनियमसाठी भारताने अनेक देशांशी करार केले आहेत, ते देश आपल्याला युरेनियम आणण्याच्या दृष्टीने मंगोलियापेक्षा जवळ आहेत. चीनने त्याच्या आजूबाजूच्या मित्र देशांशी मैत्रीचे नाटक करून प्रत्येक देशाला दडपणात ठेवले आहे. चीनबाबत नेमके तेच धोरण अवलंबताना एरवी चीनचा विरोधक असलेल्या मंगोलियास मोदी भेट देत आहेत. चीनने भारताच्या मित्र देशांना व हिंदूी महासागराच्या भागातील देशांना चुचकारण्यासाठी बरीच राजकीय शक्ती खर्च केली आहे, आता चीनच्या अंगणात जाऊन मोदी तेच करणार आहेत व म्हणून ते मंगोलियाला भेट देत आहेत. मंगोलिया हा चीनचा संवेदनशील शेजारी आहे, त्यामुळे मंगोलियाला भेट देऊन मोदी एक वेगळी गुंतवणूक करू पाहत आहेत. मंगोलियाशी संबंध प्रस्थापित करताना भारताला काही भूराजकीय पैलूंवर भर द्यायचा आहे. गेल्या काही वर्षांत भारताचे मंगोलियाशी संबंध सुधारत आहेत. त्यात सुरक्षा व संरक्षण सहकार्यावर भर आहे. मंगोलियात शक्तिप्रदर्शन करण्यात भारताला काही मर्यादा आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे. केवळ दोन शेजारी देश असलेल्या मंगोलियाला चीन व रशियात अस्थिरता निर्माण करण्यात रस नाही. मोठे शेजारी देश असलेल्या मंगोलिया या छोटय़ा देशाला त्यांच्याकडून सामरिक स्वायत्तता हवी आहे. मंगोलिया इतर प्रमुख देशांशी असलेल्या भागीदारीकडेही काळजीपूर्वक पाहतो. चीनच्या निषेधानंतरही दलाई लामा यांच्याशी संबंध त्यांनी काळजीपूर्वक जपले आहेत. गेल्या शतकाच्या एकचतुर्थाश काळात मंगोलियाने त्याचे संबंध तिसरा शेजारी या संकल्पनेतून विस्तारले. शीतयुद्धानंतर अमेरिकेशी संबंध विकसित केले, तर जर्मनी, युरोप, जपान व कोरिया या देशांशी बहुपदरी, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय संबंध विकसित केले. मंगोलिया दर वर्षी खान क्वेस्ट येथे अनेक देशांचा समावेश असलेल्या लष्करी कवायती घेतो. मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमांत सहभाग आहे, त्यामुळे मंगोलियाला एक जागतिक ओळख आहे, फक्त ती आपल्याला माहिती नाही. त्यामुळे मोदींची मंगोलिया भेट आपल्याला अनपेक्षित वाटते. मंगोलियासाठी भारत हा तिसऱ्या शेजाऱ्याहून वेगळे महत्त्व असलेला आध्यात्मिक पाश्र्वभूमी असलेला शेजारी आहे. गेल्या दोन सहस्रकांत बौद्ध धर्माचा प्रसार भारत व तिबेटमधून जगात झाला. बोल्शेविक क्रांतीनंतर मंगोलिया सोविएत रशियाच्या प्रभावाखाली होता तेव्हा तेथे स्टालिनची दडपशाही होती व त्यात धार्मिक दडपशाही तर जास्तच होती. १९५५ मध्ये समाजवादी विभागाच्या पलीकडे असलेला भारत हा मंगोलियाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा पहिला देश होता. त्या देशाने धार्मिक वारशाचे पुनरुज्जीवन करतानाच १९९० नंतर नवीन लोकशाही मूल्यांची जोपासना केली. मंगोलियाने देशाची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यावरही भर दिला आहे, त्यामुळे मंगोलियाला मोदी यांच्यात सांस्कृतिक ओळख निर्माण करणाऱ्या एका योग्य नेत्याचे उदाहरण सापडेल यात शंका नाही. गेल्या वर्षी मोदी यांनी नेपाळमध्ये काठमांडू येथे पशुपतिनाथ मंदिरात प्रार्थना केली होती व जपानमध्ये क्योटो येथे बौद्ध मंदिरात ध्यानधारणा केली होती. श्रीलंकेत अनुराधापुरा येथे महाबोधी वृक्षाला भेट दिली होती. मोदी यांना धार्मिक वारशाचे आदानप्रदान महत्त्वाचे वाटते. त्याचा पुरेपूर वापर ते त्यांच्या दौऱ्यांमध्ये करीत असतात.

मंगोलियातही ते सांस्कृतिक राजनैतिकतेची अशी उदाहरणे घालून देतील यात शंका नाही. मोदी यांना बौद्ध धर्मात रस आहे, गुजरातचे मुख्यमंत्री असतानापासून त्यांनी ते संकेत दिले आहेत. आता भारतीय उपखंड व आशियात ते बौद्ध धर्माबाबत असलेल्या प्रेमातून खास मोहीमच आकारास आणत आहेत. दिल्लीत त्यांनी बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमात सांगितले होते की, गौतम बुद्ध नसते तर २१ वे शतक आशियाचे राहिले नसते. भारतीय उपखंडात बौद्ध धर्मस्थानांचा जीर्णोद्धार करण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे. बौद्ध धर्मस्थानांच्या माध्यमातून पर्यटन वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. मोदी यांनी अध्यात्म व आर्थिक विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून मांडल्या असतील तर त्यांचा तीन दिवसांचा परदेश दौरा हा
नवीन आशियाशी संबंध प्रस्थापित करताना बौद्ध धर्माला अग्रस्थानी ठेवून मार्गक्रमण करील यात शंका नाही.

*लेखक दिल्ली येथील ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशनचे मानद सदस्य तसेच ‘द इंडियन एक्स्प्रेस’ चे सहयोगी संपादक आहेत.
*उद्याच्या अंकात दीपक घैसास यांचे ‘ अर्थ-विकासाचे उद्योग’ हे सदर