01-lp-ullhas२०१७ साल हे संख्याशास्त्राच्या दृष्टीने खूप क्रांतिकारक ठरेल.

या वर्षांत राजकीय दृष्टिकोनातून होणारे निर्णय खूप दूरदृष्टीचे, तसंच फायद्याचे ठरतील.

२०१६ सालचा एकांक २०१६ = २+०+१+६ = ९ होता. हा मंगळाचा अंक. मंगळ शौर्याचे प्रतीक आहे. यातूनच सीमेवर ताणतणावाची सुरुवात झाली तर वैयक्तिक जीवनातही लोकांना संघर्ष, वादविवाद, कोर्टकचेरी या अनुभवातून जावे लागले. आता २०१७ या येणाऱ्या वर्षांचा अंक आहे २+०+१+७ = १०. यामध्ये एक व शून्य आहे. एक या अंकातील स्पष्टता, सत्य नि शून्यातील प्रगल्भ  विचार या दोहोंच्या आविष्कारातून काही कठोर निर्णय घ्यावे लागतील व ते खूप फायद्याचे ठरतील. मात्र यात सामान्य माणसाच्या त्यागाचीही नोंद होऊन भावी पिढय़ांना सुखाचे दिवस लाभतील. धार्मिक आंधळेपणा जाऊन जगण्याची सूत्रे बदलतील. खऱ्या अर्थाने प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. जात्याच बुद्धिवंत असलेल्या या देशाला भोंदू नेते जास्त काळ फसवू शकणार नाहीत.

विज्ञान निसर्गाच्या खूप जवळ जात आहे आणि त्यातून होणारे बदल मानवजातीला खूपच फायद्याचे ठरतील. संख्याशास्त्रातील स्पंदनांमधून संभाव्य घटनांची भाकिते खूपच आधी कळतील. त्यामुळे प्रगतीच्या वाटा खूपच जवळ येतील नि त्यातील संभाव्य धोक्यांचीही सूचना आधी मिळेल. एकूण मानवहिताच्या बाबतीत ही संख्याशास्त्रीय अनुमाने खूप मार्गदर्शक ठरतील.

02-lp-astro-chart

संख्याशास्त्र नि फलज्योतिष यांच्या अभिनव अभ्यासातून म्हणजेच राशीतून होणारा ग्रहप्रवास नि बारा महिन्यांतील  प्रत्येक राशीतील सूर्य संक्रमण यांच्या माध्यमातून निर्माण होणारे भविष्य म्हणूनच जाणून घेतले पाहिजे. संख्याशास्त्र आणि फलज्योतिष यांच्या अभिनव अभ्यासातून प्रत्येक राशीतून होणारा सूर्यप्रवास आणि इतर ग्रह यांच्या माध्यमातून हे भविष्यनिदान करीत आहे. मानवी मन आणि भविष्यनिदान यांचे एक वेगळे नाते आहे. आपल्या मनाच्या विचारांचे सूत्र कसे असेल यांचा बोध आपल्याला चंद्र ग्रहाकडून समजतो. तसेच आपली बौद्धिक क्षमता बुध-गुरूच्या साह्य़ाने समजते, तर रवी-मंगळाच्या साह्य़ाने आपल्यातील साहस-आक्रमकता यांचा बोध होतो, पण रवीचा प्रत्येक महिन्याचा राशिप्रवेश त्या राशीचे भविष्यनिदान करताना खूप मदतीचा ठरतो. रवीचे भ्रमण नि संख्याशास्त्र यांचा खूपच जवळचा संबंध आहे. प्रत्येकाच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा बोध होतो. त्या स्थितीवरून त्याच्या भावी काळातील काही ठळक गोष्टी वर्तवता येतात. सूर्य आणि इतर ग्रहांची स्पंदने आणि मानवी मने या सूत्रातून खूपशा गोष्टींचे आकलन होऊ शकते. ग्रहांचा होणारा मानवी मनावरील परिणाम म्हणजे आपण आधीच करत असलेले भविष्यनिदान. नोकरी, व्यवसाय, आजार, उद्योगधंदे आदी बाबतीत हे शास्त्र आपल्यास खूप मोलाचे ठरते. तेव्हा आता प्रत्येक राशीतील प्रत्येक मिहन्याचा सूर्यप्रवास काय भविष्यनिदान करतो ते सखोलपणे पाहण्याचा प्रयत्न करू. खालील तक्त्यामध्ये ज्या राशीत रवीचा राशिप्रवेश दिला आहे, ती प्रत्येकाची सूर्य रास आहे.

उदा. २१ मार्च ते १९ एप्रिल या काळात रवीचे भ्रमण मेष राशीत असते. त्या काळात इतर ग्रहांच्या साह्य़ाने भविष्यनिदान करता येते.
उल्हास गुप्ते – response.lokprabha@expressindia.com