पॅकेजिंग हा शब्द प्रत्येकाच्याच वापरात काही ना काही निमित्ताने येत असतो. पॅकेजिंग हे वरवर साधं, सोपं वाटत असलं तरी हे क्षेत्र तसं मोठं आहे. इतर क्षेत्राप्रमाणे यातही करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत. त्याचा जरुर विचार व्हायला हवा.

पॅकेजिंग म्हणजे काय तर बाजारातील कोणत्याही वस्तूच्या भोवती गुंडाळलेलं वेष्टण किंवा आकर्षक आवरण. साधारणत: सत्तरच्या दशकापर्यंत कोणत्याही वस्तूच्या विक्रीसाठी पॅकिंग म्हणून कोऱ्या कागदी पिशव्या किंवा वर्तमानपत्राचा वापर केला जात असे. हळूहळू कागदाऐवजी प्लास्टिकचा वापर मोठया प्रमाणावर होऊ लागला. प्लास्टिक टिकाऊ आणि चमकदार असल्याने त्याच्यावर वस्तूचे नाव आणि कंपनीची जाहिरात करणे सुरू झाले. गेल्या पन्नास वर्षांत याचा इतका प्रसार आणि प्रचार झाला की वस्तूच्या दर्जापेक्षा त्याचं बाहेरील आवरण किती आकर्षक यावर त्याची विक्री किंवा मागणी ठरू लागली. सध्या उत्पादन कंपन्यांमध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आले आहे. त्यात जीवघेणी स्पर्धा सुरू आहे.

सध्या अनेक कंपन्यांमध्ये पॅकेजिंगसाठी लाखो, करोडो रुपयांचं बजेट आपल्या अंदाजपत्रकात राखून ठेवलं जातं. वस्तूच्या किंमतीमध्ये आता पॅकेजिंगची किंमत त्याच्या गुणवत्तेनुसार वाढत चालली आहे.

पॅकेजिंग क्षेत्रात महत्त्वाची क्रांती म्हणजे प्लास्टिकच्या निरनिराळ्या प्रकारांचा आवरणासाठी वापर १९८५ साली भारतात प्रथम ‘‘पानपराग’’ या पान मसाल्यासाठी सॅशेचा वापर सुरू झाला. त्यानंतर हळूहळू त्याची व्याप्ती इतकी वाढली की आता बाजारात निरनिराळे श्ॉम्पू, लोणची, वेफर्स, सॉस  बिस्कीटे, औषधं, पेन, तेल, सौंदर्यप्रसाधनं आणि मोठय़ा आकाराच्या पिशव्यांमध्ये (ळी३१ं ढूं‘) धान्य, दूध, मसाले, निरनिराळे आटा प्रकार, इत्यादी जीवनाश्यक वस्तू त्यांच्या अत्यंत आकर्षक रंगीबेरंगी पॅकेजिंग स्वरुपात उपलब्ध आहेत.

करिअरच्या संधी

बाजारातल्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व त्यात सतत अग्रेसर राहण्यासाठी कंपन्यांमध्ये तशाच दर्जाच्या माणसांचा भराणा करावा लागतो. वस्तूचे डिझाईन करण्यासाठी कंपन्या जाहिरात एजन्सीबरोबर करार करतात. किंवा कंपन्या स्वत:च अशा कामासाठी डिझायनरची नेमणूक करतात. सध्या चांगल्या व अनुभवी डिझायनरला भरघोस पगार मिळतो. कंपन्यांमध्ये सध्या पॅकेजिंग डेव्हलपमेंट असा नवीन विभाग बहुतेक ठिकाणी असतो व तिथे नवीन प्रयोग आणि संशोधन करत आपलं उत्पादन कसं कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार व आकर्षक करता येईल यावर भर दिला जातो.

पॅकेजिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी क्षेत्र खालीलप्रमाणे:

१)     छपाई म्हणजे प्रिंटिंग इंडस्ट्री

२)     सर्व औषध कंपन्या. यात पॅकेजिंगला प्रचंड मागणी आहे व उत्तम पगार मिळतो. प्रत्येक कंपनीत असा विभाग असतो व त्यात चार ते २५ जण कार्यरत असतात.

३)     ऑटोमोबाइल्स

४)     खाद्यपदार्थ उत्पादन करणाऱ्या कंपन्या.

५)     फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स व निरनिराळे श्ॉम्पू, चहा पावडर, कॉफी, मसाले सौंदर्य प्रसाधनं अशा कंपन्यांमध्ये करिअर करण्याची उत्तम संधी.

६)     तयार ब्रॅण्डेड कपडय़ांच्या उद्योगात पॅकेजिंग साठी माणसं लागतात.

आत्ताचे नवीन ट्रेण्ड

पूर्वी औषधांसाठी, फळांच्या रसासाठी, लोणच्यासाठी, सॉससाठी काचेच्या बाटल्या व त्याच्या सुरक्षिततेसाठी बॉक्सचा वापर होत असे. आता काचेच्या बाटल्या जाऊन त्या जागी प्लास्टीक  बॉटल्सचा वापर होत आहे. प्लास्टिक बाटल्या प्रवासात हाताळण्यासाठी टिकाऊ असल्याने बॉक्स वापरण्याची गरज लागत नाही. ती किंमत वाचते. व त्याजागी श्रिंक रॅप या प्रणालीचा वापर करतात. कोल्ड ड्रिंक्स आता सर्रास प्लास्टिकमध्ये येतात.

पॅकेजिंगमध्ये करिअर

उत्तम पॅकेजिंगसाठी उत्तम प्रिंटिंग व आकर्षक डिझायनिंग तसेच फोटो हे आवश्यक असतात. म्हणून छायाचित्रण, छपाई हे नवीन पॅकेजिंगला पूरक म्हणून करिअर आहे. प्लास्टिकचा वापर वाढल्याने प्लास्टिक टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले तर पॅकेजिंग क्षेत्रात त्याला खूप मागणी आहे. दूग्धजन्य पदार्थ, फूड प्रॉडक्टससाठी पॅकेजिंग महत्वाचे असल्याने डेअरी टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम करणाऱ्यांना पॅकेजिंगमध्ये खूप संधी  उपलब्ध आहेत. पॅकेजिंगचा कोर्स करून पेन व साहित्य (शालेय) व्यवसायात नोकरी किंवा व्यवसाय करू शकतो.

यासाठी दोन अभ्यासक्रम आहेत.

१) प्रिंटिंग टेक्नॉलॉजी

हा तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. त्यात प्रिंटिंगचे सर्व प्रकार उदा. लेटर प्रेस ऑफसेट, रोटो ग्रॅवुअर, स्क्रिन प्रिंटिंग व डिजिटल प्रिंटिंग हे शिकवले जातात. मुंबईत सर जे. जे. महाविद्यालयात व भवन्स कॉलेज (चर्नी रोड) मध्ये हे अभ्यासक्रम शिकवले जातात. पुण्याला पदविका  व पदवी असे दोन्ही कोर्स दहावी किंवा बारावी नंतर उपलब्ध आहेत.

२) डिप्लोमा इन पॅकेजिंग

मुंबईत इंडियन इन्स्टिय़ुट ऑफ पॅकेजिंग या संस्थेमार्फत हा कोर्स दोन वर्षे पूर्ण वेळ व दीड वर्षे करस्पॉण्डन्स स्वरुपात उपलब्ध आहे. पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठी विज्ञान पदवी व करस्पॉण्डन्स  अभ्यासक्रमासाठी पाच वर्षे पॅकेजिंग क्षेत्रात नोकरीचा अनुभव आवश्यक आहे.

नवी मुंबई नेरुळमध्ये असाच कोर्स एका खाजगी संस्थेमार्फत चालवला जातो. मुंबईतील आयआयपी संस्था सरकारमान्य आहे.

पॅकेजिंग या विषयाला परदेशात मुख्यत: विकसनशील देशांत भरपूर मागणी आहे. अनेक जण नोकरी निमित्त परदेशात या क्षेत्रांत भरघोस पगार घेत स्थायिक झाले आहेत.

तीन ते पाच वर्षे नोकरी करून ज्ञान प्राप्त करायचं आणि भांडवल गुंतवणूक करून छोटासा उद्योग सुरू करायचा अशा अनेक लोकांनी हा मार्ग पत्कारून ते आता लघु उद्योजक व मोठे उद्योजक म्हणून नावारुपाला आले आहेत. त्यापैकी काही उद्योग – बाटल्यांची झाकणं बनवणं, इंजेक्शनचे ड्रॉपर, प्लास्टीकचे चमचे, मेझरिंग कप्स, कोलिन टिश्यूस बनवणे इत्यादी व्यवसाय करतात.

पॅकेजिंग हा विषय इतका व्यापक झाला आहे की जीवन जगताना पदोपदी आपल्याला या गोष्टीची गरज भासते. पॅकेजिंग ही आता काळाची गरज आहे. व त्यात संधीही विपुल प्रमाणात आहेत. तरुणांनी या संधीचं सोनं करावं.
गिरीश नानिवडेकर – response.lokprabha@expressindia.com