वैज्ञानिक महाप्रकल्पांमध्ये संशोधन करणं म्हणजे आव्हानात्मक काम. हे आव्हान पेलण्यासाठी आवश्यकता आहे ती तंत्र कुशल वैज्ञानिकांची. संशोधनाचे क्षेत्र निवडणाऱ्या मुलांसाठी हे क्षेत्र करिअरसाठी उत्तम ठरणार आहे.

गेल्या दहा वर्षांपासून भारत सरकारने विज्ञान संशोधन या विषयावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. गेली दहा र्वष सतत या क्षेत्रातली गुंतवणूक सरकारने वाढवत नेली आहे. २००४-२००५ मध्ये पहिल्यांदा आयआयटीसारख्या पण मूलभूत विज्ञानाला वाहिलेल्या अशा संस्थांची निर्मिती करावी असा विचार सुरू झाला. त्याप्रमाणे २०१० मध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या नावाने पुणे आणि कलकत्ता येथे दोन नवीन संस्था सुरू झाल्या आहेत. या संस्थांमध्ये बारावीनंतर पाच वर्षांच्या मूलभूत विज्ञान अभ्यासक्रमासाठी (इंटिग्रेटेड एमएससी) प्रवेश घेता येतो. त्यानंतर आयआयएसईआर या संस्था अजून मोहाली, भोपाळ, तिरुअंनतरपुरम, तिरुपती आणि बेहरामपूर येथे सुरू झाल्या. पुढील वर्षांत अजून एक आयआयएसईआर नागालँड येथे सुरू होईल. त्याचबरोबर अणुऊर्जा विभागातर्फे मुंबई विद्यापीठांतर्गत मूलभूत विज्ञान प्रकर्ष केंद्र (यूएम-डीएई सीबीएस) आणि भुवनेश्वर येथे एनआयएसईआर या संस्था सुरू करण्यात आल्या. अंतराळ संशोधन विभागातर्फे तिरुअनंतरपुरम येथे आयआयएसटीची सुरुवात झाली आणि शंभर वर्ष जुन्या भारतीय विज्ञान संस्थेने (आयआयएससी) ने देखील बारावीनंतरच्या विज्ञान स्नातक अभ्यासक्रमाची सुरुवात केली. या सर्व अभ्यासक्रमांचं उद्दिष्ट हे नव्या दमाचे वैज्ञानिक घडविणे आणि देशाला उत्तमोत्तम आणि तंत्र कुशल वैज्ञानिकांची खाण उपलब्ध करून देणे हे आहे. या संस्थेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने विशेष शिष्यवृत्ती उपलब्ध केल्या आहेत. आणि या संस्थांच्या पहिल्या काही वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आज जगातील आघाडीच्या विद्यापीठात संशोधन करताना दिसत आहेत.

विज्ञान संशोधनाचे क्षेत्र हे इतर कॉपरेरेट क्षेत्रांपेक्षा खूप वेगळे असते. इतर क्षेत्रांमध्ये तुम्हाला एक ठरलेले काम परत परत करण्यासाठी कामावर नेमले जाते. तुम्ही कोणते काम करावे याचा निर्णय तुमच्या हातात नसतो. आणि तुम्हाला जितके जास्त पैसे मिळतात त्याहून जास्त नफा कंपनीला तुम्ही मिळवून द्यावा अशी कंपनीची अपेक्षा असते. मात्र विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक आपले संशोधनाचे क्षेत्र आणि कामाचे स्वरूप स्वत:च ठरवत असतो. आणि त्याच्यावर याबाबतीत इतर कोणतीही बंधने नसतात. त्याचप्रमाणे सरकार वैज्ञानिकांचे कार्य हे नफा-तोटय़ाच्या तागडीत मोजत नाहीत. उत्तम संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना उत्तेजन देणं हे सरकार आपले मूलभूत कर्तव्य समजते. अर्थात या क्षेत्रातही धोके आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक हा कधीही सामान्य कुवतीचा असू शकत नाही. जर तुम्ही प्रतिभावंत नसाल तर तुम्हाला या क्षेत्रात संधी मिळत नाही. पण प्रतिभाशाली असलेल्या वैज्ञानिकांना संधींची कमतरता मुळीच नाही. दुसरे म्हणजे अशा संशोधन संस्थांमध्ये मिळणारा पगार हा खासगी क्षेत्रातील मोठय़ा पगाराची बरोबरी कधीच करू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात सर्वच गोष्टींना पैशामध्ये मोजणाऱ्या व्यक्तींनी या क्षेत्रापासून दूरच राहावे. या क्षेत्राचा मुख्य फायदा हा की तुम्हाला तुमचे आवडते काम करण्याची संधी मिळते. साधारणपणे आपण विचार केला तर वयाच्या बाविसाव्या-तेविसाव्या वर्षी आपण शिक्षण पूर्ण करतो. आणि त्यानंतर साठाव्या वर्षांपर्यंत नोकरी किंवा कामधंदा करत असतो. म्हणजे आपल्या आयुष्याची पस्तीसहून अधिक र्वष आपण नोकरीमध्ये घालवतो. जर नोकरीतील काम आपले आवडते काम नसेल तर कितीही पैसा मिळाला तरी माणूस समाधानी राहू शकत नाही. दहा-पंधरा वर्षांतच पैसा मिळवण्याचा कंटाळा येतो आणि आपले आयुष्य नीरस होऊन जाते. याच दृष्टीने संशोधनाचे क्षेत्र हे इतर क्षेत्रांपेक्षा उजवे ठरते.

जर तुम्हाला वैज्ञानिक व्हायचे असेल तर बारावीनंतर मूलभूत विज्ञानाचा अभ्यासक्रम तुम्ही निवडला पाहिजे. जरी तुम्ही वर उल्लेख केलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला नसेल तरी इतर विद्यापीठातील मूलभूत विज्ञानाच्या अभ्यासक्रमासाठी (बीएस्सी + एमएस्सी) प्रवेश घेऊ  शकता. एमएस्सी झाल्यानंतर संशोधन क्षेत्रातील पहिली पायरी म्हणजे पीएच.डी. पीएच.डी.ला सुमारे पाच र्वष लागतात. या कालावधीत तुम्ही एखाद्या संशोधकाबरोबर काम करून संशोधन करणे म्हणजे नेमके काय, नवीन प्रश्न कसे शोधावे आणि त्यांची उकल कशी करावी याचे तंत्र जाणून घेता. पीएच.डी.नंतर बहुतांश विद्यार्थी अन्य देशांतील कामाचा अनुभव मिळावा म्हणून त्या त्या देशातील संशोधन संस्थांमध्ये काम करतात. व त्यानंतर भारतातील संशोधन संस्थांमध्ये वैज्ञानिक म्हणून परततात. भारतामध्ये प्रत्येक संशोधन विषयाला वाहिलेल्या अनेकविध संस्था आहेत. उदाहरणार्थ जर खगोलशास्त्राचा विचार केला तर सुमारे १५-२० संस्थांमध्ये खगोलशास्त्र विभाग आहेत. त्याचबरोबर सर्व विद्यापीठांत आयआयटी, आयआयएसईआर इत्यादींमध्ये देखील खगोलशास्त्रज्ञ काम करू शकतो. थोडक्यात कुठचाही विषय घेतला तरी या देशात वैज्ञानिकांना नोकऱ्यांची कमतरता मुळीच नाही. कमतरता आहे ती समजून विज्ञान शिकणाऱ्यांची.

सध्या परीक्षाकेंद्री मनोवृत्तीमुळे अनेक विद्यार्थी केवळ पाठांतरावर भर देतात. परीक्षेपुरते पाठ केलेले धडे परीक्षा संपताच विसरलेही जातात. त्यामुळे परीक्षेत उत्तमोत्तम गुण मिळवूनही बहुतांश विद्यार्थ्यांची विज्ञानाची समज ही कमी असते. यातून असा विरोधाभास उत्पन्न होतो की एकीकडे आपल्याला पुरेसे पैसे मिळत नाहीत. आणि दुसरीकडे विज्ञान अभ्यासक्रमात खोऱ्याने मार्क मिळवणाऱ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. पण यात चुकीचे काहीच नाही. जर आपल्या परीक्षा पद्धतीने पाठांतरा-ऐवजी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर आधारित गुणदान केले तर हा विरोधाभास आपोआपच नाहीसा होईल.

बहुतांशी प्रगत देशांमध्ये देशाच्या अर्थसंकल्पाच्या सुमारे दोन टक्के हिस्सा हा विज्ञान संशोधनासाठी राखून ठेवलेला असतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात हे प्रमाण अध्र्या टक्क्यांच्या आसपास होतं. गेल्या काही वर्षांत भारत अनेक नवनवीन वैज्ञानिक महाप्रकल्पांमध्ये सहभागी होत आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये शेकडो कोटी रुपये गुंतवले जात आहेत. आणि त्याचबरोबर सध्याची आघाडीच्या वैज्ञानिकांची पिढी ही हळूहळू निवृत्तीकडे सरकत आहे. त्यामुळे या महाप्रकल्पांचा उपयोग करून घेण्यासाठी देशाला मोठय़ा प्रमाणावर वैज्ञानिकांची गरज आहे. जे हुशार विद्यार्थी या घडीला संशोधनाचे क्षेत्र निवडतील त्यांना येत्या काही वर्षांत भारतीय संशोधन क्षेत्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल.
अनिकेत सुळे – response.lokprabha@expressindia.com