ज्या क्षेत्रात करिअर करायचं त्याच क्षेत्रासंबंधीचं शिक्षण घ्यायचं हे अगदी सरळ साधं गणित आहे. पण कधी कधी एक करिअर ठरवलं जातं, त्याचं रीतसर शिक्षणही घेतलं जातं पण, कालांतराने एखाद्या विषयाची आवड आहे हे लक्षात येतं आणि मग नंतर तेच करिअर होऊन जातं. तर कधी एखाद्यामध्ये अनेक कौशल्यं असतात. त्यानुसार त्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला जातो. पण, त्यापेक्षा वेगळ्याच क्षेत्रात करिअर केलं जातं. विविध कौशल्यांचा वापर करत मिनौती पाटील हिनेही विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आणि आता एका बडय़ा इव्हेंटसाठी ती भारतातील प्रमुख म्हणून कार्यरत आहे. स्वत:कडे असलेल्या कौशल्यांचा विकास करत राहायला पाहिजे. त्यासाठी मेहनत घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असं मिनौतीचं म्हणणं आहे.

मिनौतीने रुईया कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर न्यू लॉ कॉलेजमधून तिने एलएलबीचंही शिक्षण घेतलं. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन करिअर कौन्सिलिंग हा कोर्सही तिने केला. एका कौन्सिलिंग एजन्सीमध्ये काम करायला तिने सुरुवात केली. पाच वर्ष तिने तिथे परदेशात शिक्षणासाठी जाण्यास इच्छुक मुलांचं कौन्सिलिंग करण्याचं काम केलं. अशा मुलांचा कल, ओढ, कौशल्य ओळखून त्यांनी कोणत्या अभ्यासक्रमासाठी जायला हवं, कोणत्या देशात जायला हवं, त्यासाठी लागणारी कागदपत्रं ही सगळी कामं तिने तिथे केली. या कामाच्या संबंधी तिने काही इव्हेंट्सचं आयोजनही केलं होतं. त्यावेळी इव्हेंट्स मॅनेजमेंटबद्दलची तिची आवड तिला पुन्हा एकदा प्रकर्षांने जाणवली. नेमकं याच वेळी तिला एस्टेक या मोठय़ा इव्हेंटसाठी विचारलं गेलं. ‘मला आधीपासूनच इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये रस होता. करिअर कौन्सिलिंगच्या काही कार्यक्रमांमुळे इव्हेंट्समध्ये काम करावंसं वाटू लागलं. त्याच वेळी एस्टेक या इव्हेंटसाठी विचारलं गेलं आणि मी त्यासाठी काम करू लागले. इव्हेंट मॅनेजमेंटचं माझं कोणतंही प्रशिक्षण झालं नाही. त्यामुळे या क्षेत्रात आल्यावर सुरुवातीच्या काळात मी सगळ्या विभागात काम केलं. अगदी बॅकहँडपासून ते सेल्सपर्यंत. प्रत्येक विभागाची माहिती असायला हवी म्हणून मी माझ्या कामाची सुरुवात अशी केली होती’, मिनौती तिची इव्हेंट मॅनेजमेंट करिअरच्या प्रवासाबद्दल सांगते.

Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू

एस्टेक या इव्हेंटसाठी काम करत असतानाच तिने ‘दॅट लिटील आयडिया’ ही स्वत:ची कंपनी सुरू केली आहे. एस्टेक हा बिल्डिंग तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या प्रदर्शनाचा इव्हेंट असतो. हा इव्हेंट मुंबई, दिल्ली, बंगळुरु, अहमदाबाद या शहरांमध्ये होतो. तर ‘दॅट लिटील आयडिया’ ही तिची कंपनी कॉन्फरन्स, सेमिनार, वर्कशॉप असे कॉर्पोरेट इव्हेंट्स आयोजित करते. ‘माझं इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचं शिक्षण नसताना त्यात करिअर करायला सुरुवात केली. कौन्सिलिंगचं काम करत असताना इव्हेंट्ससाठी काम करण्याची संधी मिळाली आणि त्याचा मी फायदा घेतला. करिअर करताना तुमची आवड आणि कौशल्य खूप महत्त्वाचं ठरतं’, मिनौती सांगते. आजच्या पिढीने करिअर निवडताना काय विचार करायला हवा याबद्दलही ती तिचं मत व्यक्त करते, ‘तुमची आवड असलेल्या क्षेत्रात तुम्ही करिअर करायचं ठरवलं तर तुम्ही त्यातल्या नव्या गोष्टी आवडीने शिकता, त्यात प्रयोग करायची इच्छा असते. म्हणूनच सगळ्यात आधी तुम्ही तुमच्यातली कौशल्य जाणा, त्याचा करिअरमध्ये कसा वापर करता येईल ते बघा. करिअर काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे. तुमची आवड नसलेलं क्षेत्र तुम्ही निवडलंत तरी त्या क्षेत्रातही तुम्ही जे शिकता ते वाया जात नाही. तरीसुद्धा करिअर निवडताना तुमच्या मनात आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच याचा विचार तुम्ही दहावीत गेल्यापासूनच सुरू व्हायला हवा. वर्तमानपत्रात, मासिकांमध्ये येणारी विविध अभ्सासक्रमांची माहिती वाचायला हवी. एकदा तुम्ही तुम्हाला काय करायचंय हे निश्चित केलं की योग्य पद्धतीनेच मार्गदर्शन मिळेल. आजच्या पिढीसमोर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कौन्सिलिंग इन्स्टिटय़ुट आहेत. विविध अ‍ॅप्टिटय़ुट टेस्ट्स आहेत. या सगळ्याचा मुलांनी पूर्ण वापर करायला हवा. आपली कौशल्य आणि आवड ओळखून तसे पर्याय निवडायला हवेत.’

करिअर कौन्सिलिंगचा पाच वर्षांचा आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा दहा वर्षांचा अनुभव असलेल्या मिनौतीला स्वत:तील कौशल्य ओळखणं जास्त महत्त्वाचं वाटतं. मुलांनी मित्रपरिवार अमुक क्षेत्राचा कोर्स करतोय म्हणून तो करणं ही मानसिकता चुकीची असल्याचंही तिचं म्हणणं आहे. अशा वेळी त्याने त्याला काय करायचं हा शांतपणे लक्ष केंद्रित करून त्याबद्दल विचार करणं आवश्यक आहे, असं तिचं मत आहे. तसंच ती विद्यार्थ्यांसह पालकांनाही एक महत्त्वाचा सल्ला देते, ‘विद्यार्थी एखादं करिअर निवडत असताना त्यांच्या घरच्यांनी कोणतंही दडपण आणू नये. उलट त्यांना पाठिंबा देऊन योग्य ते मार्गदर्शन करावं. जेणे करून त्यांना त्यांचा मार्ग शोधणं सोपं जाईल.’

आवड, कला, कौशल्य या सगळ्याचा विचार करून क्षेत्र निवडल्यामुळेच करिअरचा योग्य तो मार्ग सापडेल हे नक्की. तसंच तुम्ही करिअरची वाट शोधत अनेक गोष्टी शिकलात पण त्यात काही केलं नाही तरी हरकत नाही; कारण हा अनुभव खूप काही शिकवणारा असतो.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com