परीक्षा आटोपून, सुट्टीत धमाल करून सगळी तरुणाई रिफ्रेश झालेली असते. अशातच सगळ्या कॉलेजेसमध्ये तयारी सुरू होते कॉलेज फेस्टिव्हल्सची! ‘नाइट’ मारून शब्दश: रात्रीचा दिवस करून सुरु असलेल्या या तयारीतदेखील फेस्टिवलइतकीच धम्माल असते.

डिसेंबर महिना म्हणजे कॉलेज फेस्टिव्हल्ससाठी सुगीचा काळ! परीक्षा आटोपून, सुट्टीत धमाल करून सगळी तरुणाई रिफ्रेश झालेली असते आणि पुढची परीक्षा पुन्हा लांब असल्यामुळे निर्धास्त असते. अशातच सगळ्या कॉलेजेसमध्ये तयारी सुरू होते मोठमोठय़ा फेस्टिव्हल्सची! महोत्सव म्हटला की सगळ्यांच्या उत्साहाला उधाण येतं. कॉलेजमध्ये ‘नाइट’ मारून अर्थात शब्दश: रात्रीचा दिवस करून मुलं जोमाने तयारी करत असतात. बाहेरची कॉलेजेस आपल्याकडे येणार, आपलं वातावरण, आपली तयारी बघणार तर आपण चमकलंच पाहिजे हा प्रत्येक मुलाच्या मनात आग्रह आणि निश्चय असतो आणि त्यासाठी तो अगदी वेळप्रसंगी लेक्चर्सही बाजूला ठेवून कामाला जुंपून घेतो. आपल्या कॉलेजची शान राखली जाईल याची काळजी महोत्सवात सहभागी झालेला प्रत्येक स्वयंसेवक घेत असतो.

काही कॉलेजेस अशी असतात ज्यांचा इव्हेंट अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे आणि त्यांना आता फक्त नेहमीच्या आखणीने कामं करायची आहेत. तरीही दरवर्षी नवीन मुलं सहभागी होतात, जुनी काही कामसू मुलं कॉलेजमधून बाहेर पडतात याचा फेस्टिव्हलवर परिणाम होतोच, मात्र खरी कसोटी असते ती नव्याने इव्हेंट सुरू करणाऱ्यांची! ज्यांचं अगदी पहिलंच वर्ष आहे किंवा ज्यांचा फेस्टिव्हल अजून बाळसं धरतोय त्यांच्यासाठी दरवर्षी नवीन आव्हानं आणि दरवर्षी नव्याने तयारी! स्वत:च्या कॉलेजपुरता एखादा कार्यक्रम आयोजित करणं आणि आंतरमहाविद्यालयीन महोत्सव आयोजित करणं यातला फरक अगदी पहिल्या टप्प्यात असलेल्या कॉलेजेसना कळतो.

मुंबईत विलेपार्ले पश्चिम इथल्या मिठीबाई कॉलेजचा ‘क्षितिज २०१६’ येत्या डिसेंबरमध्ये एक, दोन आणि तीन तारखेला असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मिठीबाई कॉलेजची मुलं जोमाने काम करत आहेत. फेस्टिव्हल जवळ आल्याने आता तयारी अंतिम टप्प्यात आहे. परफॉर्मिग आर्ट्स, मॅनेजमेंट, क्रीडा, लिटररी आर्ट्स अशा अनेक विभागांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत. मिठीबाई कॉलेजचे विद्यार्थी आता परिसराच्या सजावटीत गुंतले आहेत आणि परिसरात हळूहळू वातावरणनिर्मिती सुरू आहे. केवळ ‘क्षितिज’साठी काम करणाऱ्याच नव्हे तर संपूर्ण कॉलेजमध्ये उत्साह संचारला आहे. वेस्टर्न डान्स, डीजे, स्टॅन्ड अप कॉमेडी, क्रिकेट अशा वेगवेगळ्या ग्लॅमरस स्पर्धानी ‘क्षितिज २०१६’चा माहौल गाजणार आहे. कॉलेजची सजावट हा मिठीबाई कॉलेजसाठी नेहमीच कौतुकाचा विषय ठरलेला आहे. डोकं कल्पकपणे चालवून आपलं कॉलेज अधिकाधिक आकर्षक कसं दिसेल यासाठी मिठीबाईचे विद्यार्थी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात.

सर्व महाविद्यलयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेलं मुंबईचं कॉलेज म्हणजे माटुंगा येथील रुईया महाविद्यालय. रुईया महाविद्यालय सालाबादप्रमाणे ‘उत्सव-आरोहन’ या कलाभिमुख तर ‘कलोजियम’ या क्रीडाभिमुख आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांचं आयोजन तर करत आहेच; मात्र या वर्षी नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ‘वॉक्स पॉप्युलाय’ या कॉन्क्लेव्हबद्दल सर्वामध्ये उत्सुकता आहे. ‘वॉक्स पॉप्युलाय’चा शब्दश: अर्थ हा ‘व्हॉइस ऑफ द पीपल’ अर्थात जनतेचा आवाज असा होतो. त्यामध्ये सामाजिक, राजकीय, अशा अनेक विविध विषयांवर चर्चासत्र, वादविवाद आणि व्याख्यानांचा समावेश असेल. ‘उत्सव-आरोहन’मध्ये विविध प्रकारचे ३० स्पर्धा आणि उपक्रम असणार आहेत. त्यात लोकनृत्यासारख्या पारंपरिक स्पर्धाप्रकारापासून ते ‘मर्डर मिस्टरी’ या खेळापर्यंत अनेक प्रकारच्या स्पर्धाचा समावेश आहे. प्रत्येक विभागाचे आपापले काही महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत, उदाहरणार्थ, परफॉर्मिग आर्ट्ससाठी रॉक बँड, वॉर ऑफ डीजे अशा काही स्पर्धा या खास महत्त्वाच्या असतात ज्यांचं स्पर्धकांना आणि विद्यार्थ्यांना सर्वाधिक आकर्षण असतं आणि त्या स्पर्धेच्या विजेत्यांना सर्वात जास्त मान दिला जातो. शेवटच्या दिवशी ‘प्रॉम नाइट’ असल्याने कॉलेज क्राउडमध्ये त्याबद्दल प्रचंड चर्चा आणि उत्साह आहे.

या पाश्र्वभूमीवर मराठमोळा असा विलेपार्ले पूर्व येथील साठय़े महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव ‘सप्तरंग’! या महोत्सवाचं हे तिसरं वर्ष! ‘सप्तरंग’ हा सात स्पर्धाचा महोत्सव ज्यात दरवर्षी काही स्पर्धा नवीन असतात त्याची तयारी ही मुलं अगदी गणपतीची सुट्टी संपताच करायला घेतात. गेली दोन र्वष केवळ कला प्रकारातील स्पर्धा आयोजित करणाऱ्या ‘सप्तरंग’ने यावर्षी पहिल्यांदाच क्रीडा प्रकारात कबड्डीचे सामनेही आयोजित केले आहेत. मुंबई, पुणे आणि रत्नागिरी या विभागांतून मोठय़ा संख्येने गेली दोन र्वष स्पर्धक सहभागी झाले होते. ठिकठिकाणच्या कॉलेजेसमध्ये जाऊन माहितीपत्रकं पोहोचवण्याचं कामंही मुलं अगदी उत्साहाने करत आहेत. नवीनच फेस्टिव्हल असल्याने अगदी प्रायोजकांपासून ते परीक्षकांपर्यंत आणि खाण्यापासून ते बक्षिसांपर्यंत सर्वासाठीच दरवर्षी विविध पर्याय आजमावून बघावे लागतात. आपल्या इव्हेंटसाठी आपण आपलं कॉलेज सजवायचं या उत्साहात विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पना आपोआप सुचायला लागतात. आपल्या कॉलेजची ओळख निर्माण करण्यासाठी सगळे विद्यार्थी मनापासून जातात आहेत. प्रत्येक वेळी काही नवा प्रयोग करून बघण्याची उर्मी वेगवेगळे पर्याय शोधायला उत्साह देते. ‘सप्तरंग’मध्ये यावर्षी विशेष आकर्षण हे क्रीडा प्रकारातील कबड्डी हे आहे. कलांमध्ये पटाईत असणारी कॉलेजेस मैदानावर किती कुशल आहेत हे यावर्षी पहिल्यांदा कळेल. खिलाडूवृत्ती तर सगळ्या कॉलेजेसकडे आहे; मात्र यंदा कसोटी आहे ती खरोखरच्या खिलाडूंची!

विविध कल्पनांनी सजलेली कॉलेजेस, उत्साहात तयारी करणारी मुलं-मुली आणि बक्षीस मिळाल्यावर जल्लोश साजरा करणारे स्पर्धक यांनी डिसेंबर महिना फुलून गेलेला असतो. सगळ्या तरुणाईला आपली कला, कौशल्य आणि कल्पकता पणाला लावून काम करण्याची संधी या काळात मिळत असते. खऱ्या अर्थाने कॉलेज लाइफचा अनुभव याच काळात घेता येतो! आता लक्ष्य, फक्त फेस्टिव्हल्स!
वेदवती चिपळूणकर – response.lokprabha@expressindia.com