आईचे हृदयच घेऊन या पृथ्वीतलावर अवतरलेल्या साने गुरुजींची ही काव्यपंक्ती प्रसिद्ध आहे-  ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे.’ ‘धर्म’ या संकल्पनेचे मर्मच सांगणाऱ्या या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव जगात येणे जरा दुरापास्तच आहे.

आंतरधर्मीय संवादाच्या निमित्ताने मला देश-विदेशात फिरायची संधी मिळाली, विविध धर्माच्या अनुयायांच्या तसेच पुढाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या. अशा प्रसंगात धर्मानी माणसांमाणसांत उभ्या केलेल्या अदृश्य भिंती जाणवून मनाला अस्वस्थता आली. ‘प्रेम’ हे धर्माचे सार असेल तर प्रत्यक्ष व्यवहारात त्या प्रेमाऐवजी अविश्वास, तिरस्कार, दुरावा यांचे साम्राज्य का, असा प्रश्न सतावू लागला, पण त्याच्या उत्तराची दिशाही सापडली. धर्म केवळ एकच आहे आणि तो म्हणजे जगाला प्रेम अर्पण करणे.

पण ‘प्रेम अर्पण करणे’ म्हणजे काय? आपण देवाच्या चरणी फुले अर्पण करतो, लेखक आपले पुस्तक पूर्ण झाल्यावर अर्पण पत्रिका लिहितात, पण प्रेम? प्रेम करणे व ते अर्पण करणे यात काही फरक आहे का?

प्रेम भावना अतिशय सुंदर असली तरी प्रेम हा विषय गुंतागुंतीचा होत चालला आहे, असे दिसते. प्रेमाच्या अनेक छटा आपण जीवनात अनुभवतो. आईवडिलांचे प्रेम, प्रियकर-प्रेयसीमधील प्रेम, मित्रमैत्रिणींमधील प्रेम, भावा-बहिणींमधील प्रेम, इत्यादी. प्रेमांच्या अशा विविध पैलूंना काही तरी नाव आहे, आपण त्याला कुठले तरी ‘लेबल’ लावू शकतो. पण ज्या प्रेमाला कुठलेही ‘लेबल’ नाही, ज्याला कुठल्या नावांच्या मर्यादांमध्ये बांधता येत नाही, अशा प्रेमाचा अनुभव आपल्याला कधी आला आहे का? असे प्रेम आपल्याला कधी करता येईल का?

वरील सर्व प्रेम छटांमध्ये आपले प्रेम सहेतुक असते, सापेक्ष असते. समोरच्या व्यक्तीशी आपला काही तरी संबंध असतो, म्हणून ते प्रेम असते. त्यामध्ये आपल्यालाही समोरच्याकडून काही अपेक्षा असते. हे झाले प्रेम करणे. पण ज्यांचा आपल्याशी काही संबंध नाही, ज्यांच्याकडून आपल्याला काही अपेक्षा नाही, अशांना निर्हेतुकपणे ‘अनाम’ प्रेमाने वागवणे, म्हणजे प्रेम अर्पण करणे. जगात असे प्रेम असते का? का बरे आपल्याला तरी असा प्रश्न पडावा?

आपल्याला काय कधीच अशा प्रेमाचा अनुभव आलेला नाही? कुणीतरी पाठीवर फिरवलेला हात, कुणी देऊ केलेला मदतीचा हात, निराशेच्या क्षणी कोणी चेहऱ्यावर फुलवलेले हास्य, संकटकाळी कुणी केलेली निरपेक्ष मदत.. असे अनेक प्रेमक्षण आपण आठवून पाहावेत. म्हणजे लक्षात येतं, की हो, अत्यंत निरपेक्षपणे ‘अनाम’ प्रेमाची बरसात ही कविकल्पना नाही, ते वास्तव आहे.

असे निर्हेतुक प्रेम जगाला अर्पण करण्यासाठी कुठल्याही औपचारिकपणाची गरज नसते. त्यासाठी कुठलीही संस्था उभारावी लागत नाही, कुठे कार्यालय सुरू करावे लागत नाही, निधी गोळा करावा लागत नाही, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव अशी अधिकारांची उतरंड रचावी लागत नाही की कुठे नोंदणी करावी लागत नाही. प्रेमाचा अक्षय झरा असणारे आपले प्रत्येकाचे हृदय ही एकमेव गोष्ट. तीच संस्था, तेच कार्यालय आणि तोच निधी. अहंभाव, ईष्र्या, मत्सर, मलिनता यांच्यापासून मुक्त असलेले हृदय हे निखळ प्रेमाचे वसतिस्थान असते आणि चराचरावर आपल्या या अनमोल खजिन्याची उधळण करणे हा त्या हृदयाचा स्वभावच होऊन जातो.

नाही, नाही, या हस्तिदंती मनोऱ्यात बसून केलेल्या कल्पना नाहीत. हे प्रेमाचे प्रयोग या जीवनातील सत्य आहे. या प्रयोगांची प्रयोगशाळा आहे संपूर्ण विश्व.

विश्वात प्रेमाच्या, निखळ प्रेमाच्या प्रतीक्षेत सर्वच जण असतात. पण संत तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे- ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा।।’ तुम्हा-आम्हांसारखी सर्वसामान्य माणसे साधू किंवा देव होण्याची आकांक्षा बाळगत नाहीत, पण रंजल्या-गांजल्यांना प्रेम तर नक्कीच देऊ शकतात. अनाथ बालके, शारिरिक दृष्टय़ा विकलांग व्यक्ती, दृष्टिहीन, मूकबधीर, कॅन्सरग्रस्त, किडनी विकारांनी जर्जर रुग्ण, सामाजिकदृष्टय़ा विकलांग असे किती तरी दीनदु:खी आपल्या सभोवती असतात. त्यांच्या व्याधी आपण कमी करू शकत नाही, पण त्यांच्या वेदनांवर प्रेमाची फुंकर घालू शकतो. यांच्याव्यतिरिक्त आपल्या समाजात असा एक वर्ग आहे ज्यांना आपण माणूस म्हणून मानण्याचेही नाकारतो तो म्हणजे तृतीयपंथीयांचा वर्ग. आपण त्यांची गणना स्त्री किंवा पुरुष अशा कोणातच करत नाही. त्यांना भेटल्यावर लक्षात येते की त्यांना सहानुभूती नको आहे, त्यांना प्रेमाची अपेक्षा आहे. आपण ते निश्चित देऊ शकतो. शिवाय आपला समाज ज्यांच्यामुळे सुरळीत चालतो ते बस ड्रायव्हर्स, कंडक्टर्स, पोलीस, वाहतूक पोलीस, पोस्टमेन, नर्सेस, रेल्वे मोटरमेन, हवामान खात्याचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान इत्यादी अनेक जण आपल्या स्नेहपूर्ण वर्तनाच्या, प्रेमाच्या प्रतीक्षेत असतात.

कोणाला असा प्रश्न पडेल की ‘या सर्वाशी आमचा काय संबंध? यांचा आम्ही का बरं विचार करावा?’ प्रश्न रास्त असला तरी संकुचित मनोवृत्ती दर्शवतो. आपल्या स्वत:ला जर इतरांचे प्रेमपूर्ण वर्तन हवेहवेसे वाटते तर इतरांनाही ते तसेच वाटणार हे नि:संशय. एक मानव म्हणून यानुसार वर्तन करणे हे आपले उत्तरदायित्व आहे. दीनदु:खितांप्रति तर आपल्या सर्वाची विशेष जबाबदारी आहे. एवढेच नव्हे, तर आपल्याला सुरळीत जीवन जगण्यास साहाय्यभूत ठरणाऱ्या सर्व घटकांप्रति कृतज्ञभाव राखणे हेदेखील एक सुसंस्कृत नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.

आणि मनुष्यच कशाला, पशुपक्षी, झाडे, कीटक या सर्वाची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी आहे.

चला, आपले पाऊल पुढे टाकू या आणि चराचरावर प्रेम सिंचन करायला सज्ज होऊ या!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com