मेकअप व्हॅनिटी, शृंगार पेटी अशा सिनेसृष्टीशी संबंधित वस्तूंना आगळ्यावेगळ्या रूपात आणलंय अभिनेत्री श्वेता महाडिक हिने. नवनव्या संकल्पनांचा वापर करत तिने या वस्तूंचा लुकच बदलला. कलाकारही या वस्तूंचा आनंद घेत आहेत.
मालिका, सिनेमांच्या सेटवरच्या मेकअप रूमचं टेबल हातात घेऊन सगळीकडे जायला मिळालं तर?, नाटकाच्या ग्रीनरूममधला आरसा वेगवेगळ्या कार्यक्रमांना सोबत न्यायला मिळाला तर? किंवा घरातला मिनी बार पिकनिकला घेऊन जाता आला तर?; हे सगळं वाचायला विचित्र वाटतंय ना. वाटणारच.. अशी कल्पना कधी केली असली तरी ती प्रत्यक्षात कितपत उतरेल याचा विचार करणं मात्र दूरच राहतं. तर, अशा प्रकारची संकल्पना सध्या प्रत्यक्षात उतरताना दिसतेय. अहा, घाबरू नका. कुठल्याही रूममधला टेबल, आरसा किंवा मिनी बार खरोखर कोणाला कुठे न्यावा लागणार नाहीये. श्वेता महाडिक या अभिनेत्रीच्या सृजनशीलतेतून आलेल्या काही वस्तूंची ही कमाल आहे. मेकअप व्हॅनिटी, शृंगार पेटी, मिनी बार या वस्तू विशिष्ट रंग, चित्र, डिझाइनने सजवल्या आहेत. विशेष म्हणजे या पेटय़ा आपल्यासोबत घेऊन जाता येतात. या पेटय़ांसह तिने क्लच (हातात घ्यायची छोटी पर्स), शूज यातही क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. कलाकारांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींना सजवून तिने काही कलाकारांचं आयुष्य रंगबेरंगी केलं आहे. सुरुवातीला आवड म्हणून केलेले तिचे हे प्रयोग आता व्यावसायिकतेकडे वळले आहेत. सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तिच्या या व्यवसायाचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे.
या व्यवसायाचा श्रीगणेशा कुठून झाला याबद्दल ती सांगते, ‘लहानपणापासून हस्तकलेची खूप आवड आहे. कागदाच्या वस्तू तयार करायला मला फार आवडतात. तसंच ‘टाकाऊपासून टिकाऊ’ हे धोरण तर माझ्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे टाकाऊ गोष्टींपासून काय बनवता येईल आणि ते कसं वापरता येईल याचा मी सतत विचार करत असते. स्वत:साठी मी अशा अनेक वस्तू तयार केल्या आहेत. एकदा मी शूजवर कार्टून्स कॅरेक्टर्स रंगवले होते. त्याचा फोटो काढून मी सहजच हर्षदा खानविलकर हिला पाठवला. तिने मला लगेच सेटवर बोलवून घेतलं. ते शूज तर तिने माझ्याकडून विकत घेतले, शिवाय आणखी दोन जोड हवेत, अशी मागणी करून नकळतपणे तिनेच माझ्या या व्यवसायाला सुरुवात करून दिली. ती मला नेहमी व्यावसायिकदृष्टय़ा विचार कर म्हणून सुचवायची. पण, त्या दिवशी तिने प्रत्यक्ष श्रीगणेशाच केला असं म्हणायला हरकत नाही. हर्षदाने हे केलं नसतं तर माझा हा व्यवसाय आज सुरू झालाच नसता.’
श्वेताने तिच्या या क्रिएटिव्हिटीला ‘पिटारा’ हे नाव दिलंय. त्याचं कारण ती सांगते, ‘मी अमुक एखादी गोष्टच करणार असं कधी ठरवत नाही. माझ्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येत असतात. मला रोज काहीना काही वेगळं सुचत असतं. त्यामुळे मला सुचणाऱ्या सगळ्या वैविध्यपूर्ण गोष्टी एका पिटाऱ्यातून येत असतात. म्हणून ‘पिटारा’ हे नाव सुचलं.’ श्वेताच्या क्रिएटिव्ह वस्तूंप्रमाणे तिच्या ब्रॅण्डचंही नाव तसंच क्रिएटिव्ह आहे यात शंका नाही.
lp36कलाकारांसाठी सिनेमा, मालिका किंवा नाटक यांच्या सेटवरील मेकअप रूम चांगली, प्रसन्न असणं महत्त्वाचं असतं. शृंगार करताना मनातून आनंदी असणं त्यांना आवश्यक वाटतं. म्हणूनच मेकअप रूमचं वातावरण उत्तम असतं. असं वातावरण केवळ कोणत्याही कलाकृतीच्या सेटवरच असलं पाहिजे असं नाही, ते त्यांच्या घरीही असलं तर कुठे बिघडलं, असा विचार श्वेताने केला आणि मेकअप व्हॅनिटीची संकल्पना तिच्या डोक्यात आली. ‘कोणत्याही सेटवरील मेकअप रूममध्ये आरशांना लाइट्स असतात. त्यामुळे तिथे केलेला मेकअप उत्तम होतोच. पण, हेच घरून तयार होऊन एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर घरातल्या आरशाला लाइट्स नसतात. मग अशा परिस्थितीत काही वेळा मेकअप वेगळा होण्याची शक्यता असते. म्हणून सेटवरील आरशाला ज्याप्रमाणे लाइट्स असतात तसे घरी का नसावे हा मला प्रश्न पडला. मग यावर उपाय म्हणून मी मेकअप व्हॅनिटी तयार केली. ही व्हॅनिटी छोटी असल्यामुळे कुठेही सोबत नेता येते. शिवाय यात लाइट्सही आहेत. व्हॅनिटी उघडली की हवं तेव्हा त्यात असलेली वायर प्लगला जोडून लाइट्स सुरू करता येतात. यामुळे शूटिंगच्या वेळी कलाकार ज्याप्रमाणे तयार होतो तसंच त्याला कुठेही कधीही तयार होता येतं’, श्वेता सांगते. या व्हॅनिटीमध्येही तिने वेगळपण टिकवून ठेवलं आहे. ज्या अभिनेत्रीसाठी व्हॅनिटी करायची आहे तिची ओळख, स्वभाव, सवयी, टोपण नाव अशा अनेक गोष्टींचा विचार करून व्हॅनिटी कस्टमाइज्ड केली जाते. असंच काहीसं शृंगार पेटीचंही आहे. शृंगार पेटीमध्ये बांगडय़ा, हार, नेकलेस, पैंजण अशा अ‍ॅक्सेसरीज ठेवता येऊ शकतात. शृंगार पेटीत विभाग करावे लागतात तर व्हॅनिटीमध्ये विभाग तयारच असतात.
सिनेसृष्टीतल्या अनेकांकडून श्वेताला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. अवघ्या सहा महिन्यांत या वस्तूंची मागणी वाढली असल्याचं ती सांगते. तेजस्विनी पंडित, सुरुची अडारकर, हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे, जुई गडकरी, स्वप्नाली पाटील, शाल्मली टोळ्ये, सुयश टिळक, पीयूष रानडे, श्रेया बुगडे, संग्राम समेळ, अजिंक्य जोशी, समीधा गुरू, नेहा पेंडसे, महेश लिमये, सोनाली खरे, भाग्यश्री मोटे, रेशम टिपणीस अशा अनेकांनी श्वेताने केलेल्या विविध वस्तू घेतल्या आहेत. व्यक्तींच्या वैशिष्टय़ानुसार ती वस्तू तयार केली जाते. हा त्या वस्तूचा यूएसपी ठरतो. असं केल्यामुळे तशी वस्तू दुसरीकडे मिळत नाही.
मिनी बार असलेल्या पेटीविषयी श्वेता एक गंमत सांगते, ‘मागच्या वर्षी देवयानी या मालिकेसाठी मी शूट करत होते. सेटवर खूप ट्रंका म्हणजे पेटय़ा असतात. एकदा माझं लक्ष तिथल्या एका छोटय़ा पेटीकडे गेलं. या पेटीचं आपण काय करू शकतो असा विचार मी करत राहिले. प्रॉडक्शनच्या काही लोकांना विचारून मी ती पेटी घरी घेऊन आले. पेटीला टिपिकल ढाब्याचा लुक दिला. त्यावर ट्रकसारखं ‘हॉर्न ओके प्लीज’ असं लिहिलं. त्यात लाइट्सची व्यवस्था केली. असा हा मिनी बार माझ्या घरी तयार झाला. एक दिवस सहज मी त्याचा फोटो काढला आणि फेसबुकवर शेअर केला. तर त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. दिग्दर्शक-सिनेमाटोग्राफर महेश लिमये यांच्या मित्रांना महेशला काहीतरी भेट द्यायची होती. पण, ती काहीतरी वेगळी हटके अशी द्यायची होती. म्हणून त्यांनी मला या मिनी बारसाठी विचारलं होतं. त्यामुळे आता हा मिनी बार महेश लिमये यांच्याकडे आहे.’ मिनी बारमध्ये प्रत्येक बॉटल्ससाठी वेगवेगळे विभाग आहेत. ओपनर, चमचे ठेवण्यासाठीही जागा आहे. एलईडी लाइट्सने सजलेला हा मिनी बार कुठेही सोबत नेता येतो. असा मिनी बार २५०० रुपयांपासून मिळतो.
lp38
व्हॅनिटी, शृंगार पेटी यांसह क्लचचीही विविध रूपं श्वेताने तयार केली आहेत. एरवी लग्न समारंभ, सणासुदीला हे चकचकीत गडद क्लच बघायला मिळतात. पार्टी, पिकनिक अशा ठिकाणी जाण्यासाठीही साधे क्लच मिळतात. पण, त्यात फारसं वैविध्य दिसून येत नाही. श्वेताने त्यातही तिचं कौशल्य दाखवलं आहे. ‘प्रथम दर्जा.. पुरुष प्रवेश निषेध’ असं लिहून क्लचला रेल्वेच्या डब्याचा लुक दिला आहे. तर ‘अंग बाई’ असा मुलींचा टिपिकल सूर पकडत त्या प्रकारचे क्लच तयार केले आहेत. अशा क्लचची किंमत ८०० रु.पासून सुरू आहे. वस्तूंमधील क्रिएटिव्हिटी पाहता श्वेता नक्कीच फाइन आर्टची विद्यार्थिनी, चित्रकार वगैरे असणार, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण हा गैरसमज बाजूला सारू या. श्वेताने फाइन आर्टचं शिक्षण घेतलं नाही. तिचं ग्रॅज्युएशन मुंबईच्या रुईया कॉलेजमधून आर्ट्समध्ये झालं आहे. लहानपणापासून चित्रकला आणि हस्तकलेची आवड असल्यामुळे तिला वैविध्यपूर्ण संकल्पना सुचत असतात. टेक्स्टाइल डिझायनर असलेल्या श्वेताच्या आईमुळेच तिच्यात ही कला असल्याचं तिचं म्हणणं आहे.
या सगळ्या वस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या पेटय़ा विशिष्ट स्वरूपाच्या आहेत. त्याबाबत श्वेता सांगते, ‘केस कापण्याचा व्यवसाय असणाऱ्यांची पेटी मला नेहमी व्हॅनिटीसारखीच वाटायची. ती व्हॅनिटी का असू शकत नाही असा प्रश्न मी स्वत:च स्वत:ला विचारायचे. दुसरं म्हणजे, कुठलीही गोष्ट बनवण्याआधी किंवा एखादी संकल्पना सुचल्यानंतर मी स्वत:ला ‘मी हे वापरेन का’ हा प्रश्न विचारते. त्याचं उत्तर हो आलं की मी लगेच काम सुरू करते. असंच झालं व्हॅनिटीचं. न्हाव्याची पेटी व्हॅनिटी असू शकते हे मला पटलं म्हणून मी त्याची व्हॅनिटी तयार केली. त्यामुळे मी अशा केस कापण्याचा व्यवसाय असणाऱ्यांच्या पेटय़ांसारख्या पेटय़ा बनवून घेते.’ व्हॅनिटी, शृंगार पेटी आणि मिनी बार रंगवताना श्वेता स्प्रे पेंट्स वापरते. व्हॅनिटी आणि शृंगार पेटी १६०० रुपयांपासून तर मिनी बारची किंमत २५०० रु.पासून सुरुवात आहे.
शूजवर रंगवल्यानंतर ते धुतले की त्याचा रंग जाण्याची शक्यता असू शकते. पण, श्वेताने याची काळजी घेतली आहे. ती कॅनव्हासचे शूज फॅब्रिक रंगांनी रंगवते. हे शूज धुतल्यानंतरही त्याचा रंग जात नाही. ऑर्डरनुसार त्या त्या साइजचे शूज विकत घेऊन त्यावर डिझाइन्स करते. शिवाय हे शूज नेहमीसारखे म्हणजे दोन्ही शूजवर सारख्या डिझाइन्सचे असतातच असं नाही. दोन्ही शूजमध्ये वेगळेपण असलं तरी शूजचा तो जोड वाटेल इतकं साम्य नक्की त्यात असतं. त्यामुळे शूजचं तेही एक वैशिष्टय़ आहे. या शूजची किंमत ८०० ते १५०० रु.दरम्यान आहे.
lp37श्वेताने यापूर्वी अनेक मराठी-हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. आताही एका बँकेच्या जाहिरातीत ती झळकतेय. ‘लोकमान्य.. एक युगपुरुष’ या सिनेमात तिने लोकमान्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तसंच ‘सुजाता’, ‘बालिका वधू’, ‘संगम’, ‘प्यार के दोन नाम एक राधा एक श्याम’, ‘शकीरा’, ‘सावधान इंडिया’, ‘इमोशनल अत्याचार’ या हिंदी तर ‘देवयानी’, ‘काटा रुते कुणाला’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या मराठी मालिकांमध्ये ती दिसली होती. एखादा सिनेमा किंवा मालिकेची ऑफर आली, आवडली तर नक्की त्याचा स्वीकार करणार असल्याचं ती सांगते. ‘सध्या नव्याने सुरू केलेल्या व्यवसायावर मी लक्ष केंद्रित केलंय. मी करत असलेल्या वस्तू लोकांना आवडताहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. मी करत असलेल्या वस्तूंची मागणी वाढतेय. त्यामुळे सध्या तरी व्यवसायावरच लक्ष आहे’, ती सांगते.
खऱ्या अर्थाने कलाकार असलेल्या श्वेताला कला दिग्दर्शनातही रस आहे. संधी मिळाली तर नक्की त्याचा विचार करू असं ती म्हणते. तिने तिच्या घरातल्या भिंती रंगवल्या आहेत. अनेक लोक तिला वॉल पेंटिंगबद्दल विचारताहेत. तसंच इंटिरिअरविषयीही तिला विचारणा होत असल्याचं ती सांगते. वॉल पेंटिंग करायची तिची खूप इच्छा आहे. केवळ सिनेसृष्टीतील लोकांकडूनच तिला प्रतिसाद मिळत नाहीये तर त्याशिवायही लोकांची मागणी होतेय. इंस्टाग्राम, फेसबुकवरून तिने केलेल्या वस्तूंविषयी विचारलं जातंय. पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी तिने केलेल्या वस्तू कुरिअरही केल्या आहेत. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे हा उपक्रम प्रत्येकाने शालेय जीवनात एकदा तर केला असेल. तेव्हा काहींना त्याचा त्रास झाला असेलही, पण ती खरी क्रिएटिव्हिटी होती. ही क्रिएटिव्हिटी पुढे नेणारे मोजकेच असतात. त्यापैकीच श्वेता एक. तिने तिची आवड, छंद जोपासत त्याला व्यवसायाचं रूप देऊन कमी कालावधीत त्याचा आवाका वाढवला आहे. श्वेताच्या क्रिएटिव्हिटीच्या ‘पिटारा’तून आणखीही वैविध्यपूर्ण वस्तू बघायला मिळतील यात शंका नाही.