मनात किंवा कामात डोकावणारा कुठलाही विचार मी मोकळेपणाने करू शकतो हे माझ्या मते माझ्या कलेतलं स्वातंत्र्य आहे. कोणत्याही कलेमध्ये विचार करणे आणि अभिव्यक्त करणे या दोन वेगळ्या गोष्टी नसतात. कलाकाराला अभिव्यक्तीतूनच विचार उमगतो. कलेमध्ये ‘सेइंग इज नोइंग’ याचा अर्थ विचार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य एकच असतं. कला मानवी मनाची जशी उच्च, उदात्त पातळीचे दर्शन घडवू शकते तसंच अगदी तळाच्या पातळीचेही दर्शन घडवू शकते. मानवी मनाचे संपूर्ण दर्शन आपल्याला कलेत घडू शकते. हे विचार, ही अभिव्यक्ती कधी पचण्यासारखी असते, कधी नसते, कधी मनाला शांत करणारी असते, तर कधी अस्वस्थ करणारी असते.

नाटय़ आणि चित्रपटकर्ता यांच्या तुलनेत सेन्सॉरशिपविषयी मुद्दय़ांना कमी सामोरं जावं लागत असलं तरी चित्रकारालाही चित्रकलेत स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. कुठल्याही कलाकाराला विचार करण्याचं स्वातंत्र्य असायलाच हवं. ही गरज जशी कलाकाराची आहे तशीच समाजाचीसुद्धा आहे. कलाकाराला काही विचार मांडायचा असेल तर त्याला ते स्वातंत्र्य असायला हवे. ‘आपल्या संस्कृतीत बसत नाही’, ‘धार्मिक भावना दुखावल्या’ असं सांगून अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला जातो. चित्रातील न्यूडिटीबद्दल तर अनेकदा आक्षेप घेतला जातो. ह्य़ुमन फिगर न्यूडमध्येच चित्रित करण्याचीच चित्रकाराची गरज असते, हे समजून घ्यायला हवं. चित्रकाराच्या या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे अनेकदा हल्ला केला आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधनं आली की त्याविरोधात बंड करणारे कलाकार थोडे असतात. काही कलाकार ‘कशाला उगीच यात पडा’ असं म्हणून मागे फिरतात; पण यात त्या चित्रकाराचं नव्हे, तर त्या समाजाचं नुकसान होतं. समाजाने कलेकडे मित्र म्हणून बघायला पाहिजे. आपलं काही चुकलं की, आपला मित्र आपल्याला त्याबद्दल बरं-वाईट सांगतो. कला ही मित्रासारखी आहे. कलेतून बरंच काही मिळू शकतं; पण कलेने माझ्यावर टीका केली, त्यामुळे मीसुद्धा तिच्यावर टीकाच करणार, अशी भावना ठेवल्यास ते नातं तुटतं. तसंच कलेचं आहे.

एखाद्या चित्रावर आक्षेप घेण्यामागे कधी कधी राजकीय हेतू असतो. तो साध्य करण्यासाठी एखाद्याला फूस लावून त्याच्यातून काही तरी फायदा मिळवला जातो. कोणत्याही चित्रावर आक्षेप घेण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, कोणत्याही कलाकाराचं स्वातंत्र्य व्यक्तिगत नसून ते त्याच्या विचारांचं आहे. हा फरक समजून घ्यायला हवा. कोणत्याही समाजात विशिष्ठ बंधनं असतात, याची जाणीव सगळ्या कलाकारांना असते. तरी आहे त्या परिस्थितीत लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टीबद्दल ते भाष्य करण्याचा प्रयत्न करतात. चित्रकाराच्या साध्या-साध्या स्वातंत्र्यावर हल्ला होतो तेव्हा त्याच्यासाठी अभिव्यक्त होणं कठीण होऊन जातं. अशा वेळी दोन वृत्ती तयार होतात. समाजात फार न गुंतता दूर जाणं आणि आपली कला फक्त आपल्यासाठीच आहे असं समजणं. दुसरं म्हणजे स्वातंत्र्याबाबत काही तरी विद्रोह करणं.

ढोबळमानाने विचार केला तर, चित्रकारांमध्ये तीन प्रवृत्ती आढळतात. पहिला प्रवृत्ती जी कला पूर्णपणे स्वायत्त आहे, असं मानते. त्याच्यावर समाजाचं कुठचंही बंधन नाही, असं त्यांचं मत असतं. या प्रवृत्तीच्या चित्रकारांची कला लोकांना समजत नसली तरी ते त्यांचे विचार व्यक्त व्हायला डगमगत नाहीत. मग ते समाजाला समजो अथवा न समजो, ही या वर्गाची अशी विचारप्रणाली आहे. अशा कलाकारांनासुद्धा मुभा दिली पाहिजे, की तुम्हाला काय करायचं ते करा. इथे विज्ञानातलं एक उदाहरण द्यावंसं वाटतं. विज्ञानात प्रयोग केले जातात. तो प्रयोग होण्यापूर्वी अनेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रयोगात काय चूक, काय बरोबर असे मुद्देही उपस्थित होतात. तरीही तो प्रयोग केला जातो. त्यातून पुढे काय साध्य होईल, त्याचा कितपत फायदा होईल हे तो प्रयोग प्रत्यक्ष केल्यानंतर कळतं. पुढे काय होणार हे आधी माहीत नसल्यामुळे तो प्रयोग होऊच द्यायचा नाही हे चुकीचं आहे. तसंच या वर्गातल्या चित्रकारांचं आहे. त्यांच्या चित्रातून काय विचार उमटेल, त्याने काय फायदा होईल असे विचार आधीपासूनच मनात ठेवण्यात अर्थ नाही. त्यांचे विचार चित्रातून व्यक्त होण्याचं त्यांचं स्वातंत्र्य त्यांच्याकडून हिरावून घेता कामा नये. यात दुसरी प्रवृत्ती समाजाची साधारण बंधनं पाळून काम करते. त्यांना समाजातील घडामोडींबद्दल जे वाटतं ते चित्रातून व्यक्त केलं जातं; पण ते फारच जाहीर, प्रखरपणे लोकांसमोर येत नाही. असं असलं तरी लोकांनीच ते स्वत:हून समजून घ्यावं आणि ते लोकांच्याच हिताचं असतं. तिसरी प्रवृत्ती बंड पुकारणारी असते. समाजातील न पटणाऱ्या गोष्टींवर भाष्य करणारा आणि त्याविरोधात लढा देणारा हा गट आहे. हा गट बहुतांशी वेळा राजकीय विषयांवर भाष्य करतो. त्यांच्यावर बंधनं येणार याची त्यांना जाणीव असते; पण समाजाची स्थिती जर अधिकाधिक बंधनकारक होऊ लागली तर दुसरी प्रवृत्ती म्हणजे चित्रातून व्यक्त केलेले भाव फार जाहीरपणे, प्रखरपणे लोकांसमोर येत नाहीत असे कलाकार तिसऱ्या प्रवृत्तीकडे म्हणजे हेतुपुरस्सर विरोध करणाऱ्या प्रवृत्तीकडे वळायला वेळ लागणार नाही, हेही तितकंच खरं आहे.

यावरून समाज, त्यातील बंधनं, त्यांचे विचार, स्वातंत्र्याच्या व्याख्या, दृष्टिकोन असं सगळंच तीन वेगवेगळ्या स्तरांवरून चित्रकारांचं स्वरूप समोर येतं. कोणतीही कला प्रत्यक्षात उतरवण्याआधी ती साकार करणाऱ्याच्या विचारांमध्ये स्वातंत्र्य असायला हवं. कलेच्या बाहेरून आलेली कोणतीही बंधनं, नियम, अटी असा कशाचाही विचार न करता मोकळेपणाने विचार आणि काम केलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने चित्रकाराने त्याचं स्वातंत्र्य उपभोगलं असं म्हणता येईल.

सुधीर पटवर्धन

(शब्दांकन – चैताली जोशी)