विभावरी शिरुरकर म्हणजेच मालती बेडेकरांपासून सुरू झालेली बंडखोर लेखिकांची परंपरा पुढे गौरी देशपांडे, मेघना पेठे यांनी विस्तारत नेली. काळाच्या पटलावर या बंडखोरीचं काय व्हायला हवं हा मुद्दा तपासून पाहताना आजची लेखिका कशी दिसते?

बंडखोरीचे पहिले टप्पे

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

नाटय़विषयक मराठी लिखाणातील शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजीव नाईक यांची एक कथा आहे. ‘निवेदनं : तिघींची’ या नावाची. बंडखोरियत काठोकाठ भरलेली लेखिका आणि दोन स्तरांवरील स्त्री-वाचकांना त्याच लेखिकेने पछाडलेला कालिबदू पकडणारी. मुक्त स्त्री म्हणून अकरा जणांबरोबर झोपण्याच्या अनुभवांवर कादंबऱ्यांमधून लिहीत, परदेशांतील सफरीत प्रियकरांवर प्रियकर बदलत, भारताच्या आठवणींनी व्याकूळ बनणारे यातील लेखिकेचे निवेदन आहे. त्यावर लेखिकेच्या कादंबऱ्यांतील या मुक्त अनुभवांशी एकरूप झालेली पहिली वाचक त्या अनुभवांचा नाद लागल्यासारखी पुन्हा पुन्हा लेखिकेकडे आकृष्ट झाली आहे. लेखिकेने साहित्यातून मांडून ठेवलेल्या बंडखोर जगण्याची शक्यता वास्तव आयुष्यात निर्माण झाल्यानंतर हीच वाचक त्या वाटेकडे सरकू लागते. दुसरी वाचक मात्र लेखिकेला व्यक्तिगत की विद्रोही गटात बसवावे याबाबत सुरुवातीपासून गोंधळलेली आहे. लेखिकेने मांडलेल्या मुक्त अनुभवांच्या वाटेवर जाताना प्रतिकूल वातावरणामुळे ती धडपडते. नंतर त्या विचारांबाबतचा भ्रमनिरास सहन न झाल्याने लेखिकेने घालून दिलेल्या मुक्त विचारांचीच बंधने उधळून लेखिकेपासून ही वाचक लांब पळू लागते.

पाऊण शतकापूर्वी स्त्रियांनी लिहिणे हीच मुळात बंडखोरी मांनली जाण्याच्या काळापासून विजया राजाध्यक्ष, गौरी देशपांडे, कविता महाजन, सानिया, मेघना पेठे, आशा बगे, नीरजा, प्रज्ञा दया पवार, मोनिका गजेंद्र गडकर, उर्मिला पवार आदी नव्या-जुन्या सर्वच वाचकांच्या आवडत्या सशक्त लेखिकांपर्यंत दरएक टप्प्यात बंडखोरीचा स्तर बदललेला आहे . पण स्त्री-साहित्यात आलेल्या बंडखोर वा सच्चे-कडवे अनुभव यांच्या गुरुत्वाकर्षणाने भारावलेल्या त्यांच्या अट्टल वाचकांची घुसळण सर्वार्थाने संदिग्धच राहिलेली आहे. १९८८ साली, म्हणजेच उदारीकरणाआधी प्रकाशित झालेल्या राजीव नाईक यांच्या ‘मोकळा’ या एकमेव संग्रहाची बाजारातून पहिली आवृत्तीही संपलेली नाही. अजूनही पुस्तकांच्या दुकानांतील मौजेच्या दालनात हे पुस्तक सहज सापडते. तत्कालीन मौज, सत्यकथांत छापून आलेल्या त्यांच्या या संग्रहातील इतर सरस कथांमधून ‘निवेदनं : तिघींची’चे महत्त्व सहज अधोरेखित होते. नाव न घेता, कुणावरही टीका न करता स्त्री-साहित्य व्यवहाराच्या सूक्ष्मलक्ष्यी निरीक्षणांचे आगर म्हणून या कथेचा उल्लेख करावा लागेल. नाईकांनी पुढे कथालेखन न केल्याने आणि मराठी समीक्षेच्या कथालेखकांना दुय्यम लेखण्याचा शिरस्ता याहीबाबत पाळला गेल्याने ‘मोकळा’ कथासंग्रह आजही अडगळीत राहिलेला दिसतो. विशेष म्हणजे त्यांची निरीक्षणे आज अधिक प्रकर्षांने व्यवहारात अस्तित्वात आलेली असतानादेखील.

विभावरी शिरुरकर (मालतीबाई बेडेकर) या आद्य मराठी स्त्रीवादी बंडखोर लेखिकेबद्दल मायाजालापासून इतरत्र ‘स्त्री जीवनातील अनुभवांना साहित्यात आणताना कौटुंबिक आणि सामाजिक वास्तवापलीकडे स्त्री-मनाची, स्त्री-व्यथांची जाणीव करून देणारे साहित्य त्यांनी लिहिले’ अशी थेट माहिती मिळते. ‘पुरुषी औदार्यभावाला बाजूला सारत स्त्रीनिष्ठ जाणिवांतून स्त्री-प्रश्नांना वाचा फोडणारे साहित्य त्यांनी पहिल्यांदाच आविष्कृत केले. पुरुषी दडपशाहीला नकार देऊन स्वतंत्रपणे स्त्री-केंद्री कलेचा शोध त्यांच्या साहित्याने घेतला’ असेही त्यांच्यावरील सादर माहितीमध्ये सहजे सापडते. मात्र या माहितीत येत नाही तो काळाचा व्यावहारिक तपशील. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या जागतिक अन्नटंचाईनंतर मूलभूत खाद्यान्न रेशनिंगवर मिळत होते. या काळातील आर्थिक गरज म्हणून शहरांत सुशिक्षित घरातील स्त्रियांनी पहिल्यांदा नोकरीसाठी घराबाहेर पाऊल टाकणे अपरिहार्य बनू लागले होते. तसे घराबाहेर पाऊल टाकणारी पात्रे उभी करणे म्हणजेही स्त्रीचे बंडखोर चित्रण होते. तशा पात्रांनीदेखील वादळे वगैरे उठविली, म्हणणे आज न पचणारे वाटते. विभावरी शिरुरकर यांचे साहित्य वाचताना तात्कालीन काळापुढे त्यांचे लेखन होते, हे लक्षात येते. पण ते आजच्या काळातील वाचकाला तितकेच पुढारलेले वाटेल का, याबाबत शंका आहे. अन् गंमत ही आहे की, गेल्या कित्येक दशकांमधील स्त्री-साहित्यावर छापून येणाऱ्या समीक्षण आणि परीक्षणातही (मग ते लिहिणारा पुरुष असो की बाई) ‘स्त्री-मनाची, स्त्री-व्यथांची जाणीव करून देणारे’, ‘स्त्रीनिष्ठ जाणिवांतून स्त्री-प्रश्नांना वाचा फोडणारे’, ‘पुरुषी दबावाला झुगारून देणारे’ गुणविशेष जागोजागी पेरले जातात, याचा अर्थ विभावरी शिरुरकरांपासून पाऊण शतकभर आजच्या लेखिका लेखनाचा किंवा बंडखोरीचाही एकच साचा घेऊन लिहीत आहेत की काय, हा प्रश्न सर्वसामान्य वाचकांना पडण्याची शक्यता आहे.

मराठी साहित्यामधील शिरुरकरी वादळे संपल्यानंतर इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत यांच्या वैचारिक, ललितबंधांनी एक काळ गाजविला. नवकथेच्या उत्तरमध्य काळात वसुंधरा पटवर्धन आणि कमल देसाई यांची लेखणी ललित साहित्यात फिरू लागली. बेस्टसेलर कौटुंबिक, सामाजिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखिकांचा भरणा याच काळात झाला.

स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या, स्त्री-दु:खांचे केंद्र एकामागोमाग एक पन्नासहून अधिक कादंबऱ्यांत मांडणाऱ्या डॉ. सुमती क्षेत्रमाडे ,पन्नास-साठ कादंबऱ्या- कथासंग्रह लिहिणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ स्नेहलता दसनूरकर किंवा हिंदूीतही लेखणी चालविणाऱ्या ज्योत्स्ना देवधर यांनी खूप खपाची साहित्यनिर्मिती केली. एकीकडे बाबा कदम ज्या जोमाने वाचक घडवीत होते, तितकाच स्त्री-तरुणींचा वाचकवर्ग या लेखिकांनी जोडला होता. अत्यंत खानदानी भाषा, सुसंस्कृत वातावरणातील हे साहित्य एकसुरी असले तरी काळानुरूप योग्य होते. मुख्य धारेत एका बाजूला सत्यकथा, मौज आणि ढीगभर प्रथितयश नियतकालिकांतून साठोत्तरी काळात नवनवे प्रयोग होत होते. दुसऱ्या बाजूला धुमसत्या नवतरुणांची ‘लिटिल मॅगझिन’ चळवळ जोरात सुरू होती. तिसऱ्या आघाडीवर दलित साहित्य उदयाला येत होते. या पाश्र्वभूमीवर साहित्यात कमल देसाई यांच्याइतकी ठळक प्रसिद्धी कुणाच लेखिकेला मिळविता आली नाही. नाही म्हणायला वसुधा पाटील यांच्या कथा ऐंशीच्या दशकानंतर लिहू लागलेल्या पद्मजा फाटक यांचे लिखाण सर्वस्वी वेगळे झाले आहे. त्यांच्या प्रवासवर्णनांपासून कथासंग्रहापर्यंत आणि ललित लेखांपासून कुठल्याही प्रकारच्या लेखनात रूढ स्त्री-लेखनापलीकडे बरेच काही मिळत राहते.

पुढे ठळक प्रसिद्धी मिळविली व ती गाजविली गौरी देशपांडे यांनी आपल्या मोजक्या परंतु मुक्तविचारी लेखनाने. स्त्रीच्या समग्रलक्ष्यी दु:ख, वेदनांतून बाहेर पडत व्यक्तिवादी विचारसरणीच्या उच्चभ्रू-श्रीमंती पात्रांची संवेदना एका पिढीत झिरपत गेली इतक्या जोमाने ‘गौरी देशपांडे इफेक्ट’ मराठी स्त्री-साहित्यामध्ये ठळक झाला. त्यानंतर आशा बगे, सानिया यांनी कथा आणि कादंबऱ्यांमध्ये स्त्री-जाणिवांचा जो पट मांडला, त्यातून त्यांच्यावर ठळकपणे स्त्रीवादी शिक्का मारता येऊ शकणार नाही. स्त्रियांना त्यांचे लेखन आवडेल, तितक्याच प्रमाणामध्ये पुरुषांनाही आवडू शकेल, इतक्या ताकदीने त्यांनी लेखन केले. यात त्यांच्या पुढच्या पिढीच्या नीरजा, प्रज्ञा दया पवार, उर्मिला पवार, कविता महाजन आणि मेघना पेठे यांचाही उल्लेख महत्त्वाचा आहे.

पण इथे लक्षात घ्यायला हवे ते जागतिकीकरणाच्या काळात लेखिकांची बंडखोरियतता ठरणारे काही निकष तयार झाले. मग स्त्रीवादी चळवळ आणि संघटनांचे कार्य या काळात क्षीण होऊ लागले, तसेच त्यांच्या लेखनातील प्रखरता काळाप्रमाणे सौम्य वाटू लागली.

गौरी देशपांडे यांची पात्रे परिकथेत शोभावी अशी समजूतदार मोकळी, आर्थिक चिंता नसणारी, परदेशात सहज वावर करणारी असत. त्यांची कथानके पुरुषांसोबतच्या नात्यांमधील घोटाळे आणि मानसिक द्वंद्व यांच्याभोवती फिरणारी असत. त्यात बंडखोर असे म्हणण्याजोगे त्यांच्या अनुयायांना काय वाटले, तर शरीरसंबंधांबद्दल मोकळेपणी बोलणे. याबद्दल नको तितकी चर्चाही तिच्या बाजूच्या व विरोधातील वाचकांनी घडविली, मात्र तिने विचारलेल्या स्त्रीच्या लैंगिकतेच्या आणि मानसिकतेच्या प्रश्नांबाबत बोललेच गेले नाही.भारतीय मिथककथांचा त्यांनी केलेला वापर याचाही कमी विचार झाला. ‘एकेक पान गळावया’मधील राधा प्रेमाच्या मूलभूत मर्यादांबद्दल बोलते, मुलाविषयी वाटायला हवीच अशी अपेक्षा असलेल्या मातृप्रेमाच्या एकसुरीपणा, त्यातील अन्यायाबद्दल बोलते. तिच्या ‘निरगाठी’मध्येही याची चाहूल आहे. ‘आहे हे असं आहे’मधल्या कथा तेव्हाच्या नैतिक चौकटी मोडून टाकणाऱ्या आणि त्याबद्दल गाजावाजा न करणाऱ्या आहेत. पण मराठी समीक्षकांनी आणि स्त्री-पुरुष वाचकांना त्यांच्या लेखनाचे पहिले वैशिष्टय़ काय दिसले असेल, तर तिने रंगविलेले प्रियकर आणि त्यांच्यासोबतचे धीटपणे रंगविलेले संबंध. अन् या आधारावरच वाचकांना, समीक्षकांना स्त्रियांची बंडखोरी दिसू लागली. मेघना पेठेंच्या ‘हंस अकेला’मधील जगत राहण्याची अपरिहार्यता, कोणत्याही परिस्थितीत जगायला आनंदाने उभी ठाकणारी माणसातील चिवट वृत्ती, नात्यांच्या ओझ्याखाली घुसमटणाऱ्या भावना हे सगळे परिणामकारक दखलपात्र होत असताना तिची बंडखोरियतता वाचकांलेखी वाढलेली दिसते, ती धीट शरीरसंबंध चितारण्यामुळेच. कविता महाजनांच्या ‘ब्र’ किंवा ‘भिन्न’ या कादंबऱ्या कशाबद्दल बोलतायत, त्याबद्दल एक प्रकारचा खांदेउडवूपणा होता. महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणातील स्त्रीचे स्थान कसे आहे, याचे अतिशय निराळ्या कोनातील तपशील ‘ब्र’मध्ये होते. ‘भिन्न’मध्ये एनजीओच्या अंतर्गत व्यवहारांत माणसे कशी दिसतात, ते रेखाटण्याच्या शक्यता होत्या. त्याच्याही बरेवाईटपणाबद्दल, वा गोष्टीच्या बांधेसूदपणाबद्दल चर्चा होणे शक्य होते. पण बोल्ड लिहिले की झाली बंडखोर लेखिका, प्रवाहाविरोधातील स्त्री-लेखिका. बरे बोल्ड लिहिणे म्हणजे काय, तर शरीरसंबंधांबद्दल बोलणे, शिवराळ, थेट आक्रमक भाषा वापरणे, नैतिक-अनैतिक सामाजिक संकेतांबद्दल बेफिकीर असणे, इतकेच काय ते बंडखोरीचे रूप लेखिकांबाबत वाचकांप्रति दखलपात्र होते. भारतातील इतर भाषिक लेखिकांबाबतही हे असेच सारख्या प्रमाणात झालेले वाटते. उर्दूतल्या इस्मत चुगताई, हिंदीतील मन्नू भंडारी, मृणाल पांडे आणि इंग्रजीतील शोभा डे आदी नावे प्रकर्षांने समोर येतात.

भाऊ पाध्ये यांनी ‘अग्रेसर’ कादंबरीमध्ये रेखाटलेली मुक्त विचारांची मध्यमवर्गीय नायिका ही त्या काळातील बंडखोर स्त्रीचे हुबेहूब वर्णन मानावे लागेल. या काळात सिनेमा माध्यमाचा समाजावरील प्रभाव, समांतर चित्रपटांची चळवळ आणि शहरीकरणाचा वाढता पसारा पाहता जितक्या मुक्तविचारी नायिका गौरी देशपांडे यांनी तयार केल्या त्याहून फॉरवर्ड नायिका भाऊ पाध्येंनी ‘अग्रेसर’मध्ये रचली. सुमेध वडावाला रिसबुड यांच्या ‘ब्रह्मकमळ’  ते ‘सफाई’ कादंबरीपर्यंत आणि काही कथांमध्ये डोकावणारा स्त्रीवाद किंवा स्त्री दु:खपट लेखिकांनाही न जमावा इतका टोकदार आहे. भारत सासणेंच्या ‘लग्न’ दीर्घकथेत किंवा ‘राहीच्या स्वप्नांचा उलगडा’ या लघुकादंबरीत आलेल्या निवेदक नायिका म्हणजे स्त्रीच्या आदिम आणि आधुनिक प्रेरणांचे सरस मिश्रण आहे.

स्त्री-बंडखोरीच्या सगळ्या संकल्पना ‘बोल्ड’तेच्या पातळीवर तोलताना जागतिकीकरणानंतर ज्या कैक क्रांतींनी वाचक वर्गातही आमूलाग्र बदल केले, त्यावर चर्चा महत्त्वाची आहे. या क्रांतिपर्वात केवळ महिला अंगप्रदर्शन होते म्हणून ‘मिस वर्ल्ड’सारख्या स्पर्धाविरोधात मोर्चे काढण्यात किंवा सिनेमातील अश्लीलतेविरोधात निदर्शने करीत आणि हे थोपवणे किती अशक्य याची जाणीव होत गेल्याने स्त्री-संघटना क्षीण होत गेल्या. केबलक्रांतीने पेहराव आणि मोबाइल क्रांतीने आचरणात, विचारसरणीत मोठा बदल केला. पंजाबी ड्रेसातून टीशर्ट-जीन्स वेशात प्रवेश केल्यानंतर आणि कानाला मोबाइल नावाचा दुसरा अवयव आल्यावर ‘मेट्रो सेक्शुअल स्त्री’ पूर्वसुरींच्या स्त्री-साहित्यातील बंडखोरीला अतिबाळबोध समजण्याइतपत पुढे निघून गेली. गेल्या पिढीचे बंडखोर स्त्री-साहित्य आणि आजच्या स्त्रीचे बंडखोर जगणे यात कमालीची दरी निर्माण झाली. त्यामुळे स्त्री-दु:खांच्या पारंपरिक वाटा, लग्न-विचारभेद-घटस्फोट या तीन अवस्थांवर रचले जाणारे पुरुषविरोधी मतांचा ठोस प्रसार करणारे साहित्य मोठय़ा प्रमाणावर पसरले गेले. चार-दोन महत्त्वाच्या मासिकांमध्ये आणि दहा-पंधरा प्रमुख दिवाळी अंकांत लेखन करणाऱ्या निवडक लेखिकांव्यतिरिक्त स्त्री-लेखनाचा विभावरी शिरुरकररूपी साचा वा ‘गौरी देशपांडे इफेक्ट’मधून पाझरलेली रूपरेषा यांत मराठी स्त्री-कथा अजूनही काही प्रमाणात अडकल्यासारखी भासते.

बंडखोरीचा आजचा टप्पा

सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातींमुळे जणू काही जागतिकीकरणानंतरच भारतीय नारीला स्त्रीधर्म सुरू झाल्यासारखे केबलक्रांतीत घुसळण झालेल्या पिढीला वाटायला लावणारा १९९३ नंतरचा विचित्र काळ होता. मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड या स्पर्धामध्ये भारताची दखल घेतली गेल्यानंतर ‘भारतीय बाजारपेठ आणि स्त्री जगण्याच्या व्याख्या’ फुलत गेल्या. चित्रपट, टीव्ही मालिका आदींतून गल्लोगल्ली ब्युटी पार्लर तयार झाले. गल्लोगल्ली बदलत्या पेहरावातून धीट झालेल्या स्त्रीची सुख-दु:खांची रूपेही बदलली. एमटीव्हीने, वारेमाप जाहिरातींच्या प्रभावाने जीन्साळलेली आणि चित्रपटांतील परदेशात जाऊन भारतीय संस्कार वगैरे जपणाऱ्या कथा आवडीने पाहात करवाचौथ वगैरेही मानणारी मिश्राळलेली मुक्त स्त्री तयार झाली. या पुढारलेल्या स्त्रीला पारंपरिक स्त्री साहित्यातून सतत येणारे स्त्री-दु:ख, स्त्री-दैन्य आणि स्त्रियांच्या वेदनांची कहाणी मागास परग्रहावरील वाटू शकण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवस्थेत गेल्या पिढीत लिहीत राहणाऱ्या लेखिकांना चटकन बदललेल्या या पिढीचे वाचक गळून गेल्याचीच चिंता वाटायला हवी. मात्र या पिढीला आवाक्यात घेणारी लेखिका मनस्विनी लता रवीन्द्र ‘ब्लॉगच्या आरशापल्याड’ या कथासंग्रहाद्वारे साहित्य पटलावर आली आहे, हे आजच्या तथाकथित आक्रसत चाललेल्या मराठी कथेसाठी आश्वासक आहे.

कादंबऱ्यांवर मराठी समीक्षेत लेखमाला लिहिली जाते, उरबडवी किंवा कुरघोडीयुक्त चर्चा घडविली किंवा केली जाते. कथांबाबत बोलताना मात्र समीक्षकांमधील कंजुषीचा अवयव सतत जागा असतो. राज्याच्या आडभागापासून मुंबई, पुण्यासारख्या शहरांतील मासिकांमधून दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या कथांचा आकडा शंभरी पार करणारा असावा. दिवाळी अंकांच्या कालावधीत तो हजारांच्यावर जाणारा आहे. गुणात्मकदृष्टय़ा त्यातील १० ते २० कथा निवडून ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरी’सारखा उपक्रम राबवाव्या इतक्या कथा दरवर्षी असू शकतात. मागे ‘अक्षर दिवाळी’सारखा उपक्रम त्यावरून प्रेरित होऊन आपल्याकडे राबविण्यात आला. पण आर्थिक पाठबळाअभावी तो संपुष्टात आला. शिवाय त्यासाठी राबण्यात प्रकाशकांना रस नसल्यामुळे चटर-पटर कथा या साप्ताहिक-मासिकांत आणि उत्तम कथा दिवाळी अंकांत असा मामला लेखक आणि वाचक या दोहोंसाठी मान्य बनला.

या पाश्र्वभूमीत गेल्या काही वर्षांत मनस्विनी लता रवीन्द्र हिच्या कथा दिवाळी अंकात येत होत्या आणि कुठल्याही महिन्याच्या मासिकांमध्येही. मात्र दर्जाबाबत कोणतीही कथा साधारण गटात मोडणारी निपजली नाही, हे त्यांचे विशेष होते.  आजच्या भवतालाला घेता येईल तितके कवेत घेणाऱ्या आणि फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपने संपृक्त असलेल्या स्त्रीच्या अन् पुरुषाच्याही जगण्याचा आराखडा मांडणाऱ्या या कथा आहेत. त्यांच्यावर पूर्णपणे स्त्री-वादी  शिक्का मांडता येणेही अवघड व्हावे, इतके त्यांच्या कथेचे रूपडे मानवी आहे.

‘स्त्री मनाची, स्त्री व्यथांची जाणीव करून देणारे’ असले काही अडाणपुनरावृत्तीचे लिहिता येणार नाही, म्हणूनच कदाचित वर्षभरापूर्वी आलेल्या या कथासंग्रहाची आपल्याकडच्या समीक्षा व्यवहारात दखल घेतली गेली नाही (इथेही लिहायला उशीर झालाच असला तरी). ‘सिगारेट्स’, ‘अलविदा’ने नाटय़क्षेत्रात परिचित आणि दुर्बुद्ध टीव्हीच्या जगात टीआरपीश्रेष्ठ मालिकांची लेखिका म्हणून समोर येणाऱ्या मनस्विनीच्या कथा आजच्या जगण्यातील प्रखर संवेदनांनी भरलेल्या आहेत. त्यांच्या कथांमधील पात्रे कधी अतिआधुनिक विचारसरणीच्या बनतात, तर कधी सुसंस्कारी बनत पारंपरिक वागतात. वेगवान सिनेमासारखी दृश्यात्मकता घेऊन कधी ती फिल्मी वळणे घेतात, भाषिक प्रयोग करतात, वैचारिक उंची गाठतात, अध्यात्मिक होतात, राजकीय विचारसरणी मांडतात, हळवेपणा सांडतात, इतिहासात डोकावतात, वर्तमान परिस्थितीशी झगडा करतात आणि सर्वात महत्त्वाचे यांतील वैविध्यामुळे वाचणाऱ्याला अचंबित करतात. आपल्याच भवतालात घडत असलेल्या या साऱ्या घटनांना मनस्विनीच्या चष्म्यातून अन् लेखणीतून उतरलेले पाहताना मराठी कथा संपत असलेले आरोप छिन्नविच्छिन्न झालेले दिसतात.

संग्रहातील पहिलीच कथा आहे ‘मळक्या पायांची मुलगी’ नावाची. मळके पाय न आवडणाऱ्या स्वच्छ पायांच्या निवेदकाची. ट्रेनच्या अंमळ प्रवासाच्या तुकडय़ात घडणारी. स्वप्नात मारुतीच्या देवळात मुतणे सारखे येणारा हा झंगड निवेदक पोरी गटविण्यातला वस्ताद शोभावा असा. प्रवासातील आदीम वर्णनांना टाळून तो रसाळ निवेदनाची टकळीच सुरू करतो. समोर सुंदर चेहऱ्याची, पण मळक्या पायांची तरुणी पाहून हळहळतो. आता अंमळशा प्रवासात त्याचे मळक्या पायाच्या मुलीला पाहून नातेसंबंधी, मुलींसंबंधी, जोडीदारांसंबंधी विचार स्पष्ट होतात आणि अचानक घडणाऱ्या एका माँटुकल्या घटनेने कथा आणि त्यातील प्रवास कलाटणी घेतो. निवेदक नायक अशक्य गोष्टीला शक्य करण्याच्या स्थितीत पोहोचतो.

‘हातात सुकाणू घेऊन भुर्र’ नावाची संग्रहातील सर्वात मोठी कथा ही ग्लोबलोत्तर तरुणीच्या जडणघडणीची आहे. नववीतल्या जागतिक इतिहास-भूगोलाने प्रभावित झालेल्या निवेदिकेची दिवास्वप्ने नकळतपणे दोन दशकांपूर्वीच्या एका विशिष्ट  काळाच्या सूक्ष्म संदर्भाचे तुकडे विणत आजच्या स्थितीपर्यंत आणून सोडतात. यात केबल वाहिन्यांच्या आगमनानंतर स्टार मूव्हीजवर अ‍ॅडल्ट फिल्म लागण्याचा संदर्भ येतो, तसाच सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातींनी तयार केलेल्या देशव्यापी संभ्रमाचा धागाही येतो. तयार होणाऱ्या वृत्तवाहिन्या, त्यांची वृत्तचर्चाची धडपड आणि निवेदिकेवर पगडा असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या फोलपणाची विस्तृत गोष्टही रंगते. स्थानिक राजकारणाचा तुकडाही येतो आणि डोके ताळ्यावर असलेल्या आजच्या तरुणीच्या वैचारिक खदखदीचे स्पष्ट रूप समोर येते. पारंपरिक स्त्री-दु:खाने माखलेल्या कथा खोऱ्याने लादल्या जाणाऱ्या पाश्र्वभूमीमध्ये ‘हातात सुकाणू घेऊन भुर्र’चे महत्त्व वाचणाऱ्यालाच उमजू शकेल.

‘..आणि तो नायक ठरला’ ही कथा उतारवयात घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केलेल्या नायकावर भीषण थट्टेद्वारे सूड उगविणाऱ्या निवेदिकेची आहे. डब्ल्यू. बी. गॅली या समाज शास्त्रज्ञाने मांडलेल्या ‘वादग्रस्त संकल्पने’चा त्यात पुसटसा संदर्भ आहे. पण कथा सूक्ष्मरीत्या पहिल्या पत्नीच्या बाजूने उभे राहून नायकाच्या एकूण वैचारिक आणि लौकिक पातळीवरील दांभिकतेचा समाचार घेणारी क्रूर विनोदबुद्धीचा साक्षात्कार देणारी आहे. घटस्फोटित, परितक्त्यांच्या मुक्तपणा मांडणाऱ्या कथांच्या तुलनेत मनस्विनीची ही कथा कैक प्रकाशवर्षे पुढे आहे. कथेच्या वैचारिक बैठकीमुळे आणि रचनेच्या श्रीमंतीमुळेदेखील. शहरातून गावात गेल्यानंतर भावुक कढ काढणाऱ्या कथांचा, शहरापेक्षा गाव, गावातील भोळी माणसे यांच्यावर आयुष्यभर लिहीत राहणाऱ्या कवी-लेखकांची मराठीला कधीच कमतरता नव्हती. ‘ओझ्याविना’ या कथेतील निवेदिका या सर्व पूर्वसुरींच्या वर्णन भावुकतेला झुगारून देत शहरी मनातले आत्ताचे खरेखुरे गाव उलगडून दाखविते.

‘काळ्याकुट्ट वेळी’ कथेला गोंधळात टाकणारा काळ आहे. पण भाऊ पाध्ये आणि श्री. दा. पानवलकर यांच्या कथांच्या पंगतीतच बसवावी इतकी एकाच वेळी सुंदर आणि अघोरी अशी या कथेची रचना आहे. मूलतत्त्ववादी भगव्या राजकारणाच्या, दांभिक मानसिकतेच्या पोटी चिरडल्या गेलेल्या निवेदकाची ही या संग्रहातील सर्वात धारदार गोष्ट आहे.

मनस्विनीच्या कथांमध्ये असलेली खेचक दृश्यात्मकता, नाटय़मयी वळणे, पात्रांवर असलेला वैचारिक पगडा, पुन्हा यातल्या नायकांची तंतोतंत पुरुषवादी विचारसरणी आणि अनेकदा झालेली फिल्मी रचना तिच्या कथांची प्रमुख बलस्थाने आहेत. आजच्या स्त्री कथाकारांमध्ये तिच्यातील ही बलस्थानेच तिला उजवी बनवतात. ‘मधुबाला आणि लोडशेडिंग’, ‘माझ्या जन्माची गोष्ट’, ‘सुसाइडवाला लव्ह’, ‘बाईकबिना हीरो’ या कथांतून ते स्पष्ट होऊ शकते.

मोबाइल, समाजमाध्यमांचा मारा यांतून घडणाऱ्या सुदृढ विचारी आणि अमुक्ततेची संकल्पनाच हरविलेल्या आजच्या स्त्रीची ‘ब्लॉगच्या आरशापल्याड’ ही गोष्ट आहे. कुण्या एका आंतरराष्ट्रीय ब्लॉग लिहिणाऱ्या तरुणीचे लेखन वाचण्याचा छंद जडलेली निवेदिका यात आहे. ब्लॉग वाचता-वाचता ती त्यातील संदर्भाना भवतालाशी जोडते आणि जागतिक मंदीपासून बदलत्या कुटुंबव्यवस्थेपर्यंत अनेक घटनांचे तुकडे सांधते. शिवाय आयुष्यातील तत्कालीन समस्येच्या ताणाची गोष्ट सांगते. संग्रहाची शीर्षक कथाही यातील सर्वच कथांइतकी तगडी ठरलेली आहे.

यातील काही कथांच्या निवेदकांना नावे नाहीत. पाश्र्वभूमी संपूर्ण वेगळी आणि भाषा कमालीची लवचीक आहे. कधी ती फिल्मीदेखील होते. ‘बाईकबिना हिरो’, ‘सुसाइडवाला लव्ह’, ‘लोडशेडिंग’ आणि ‘मधुबाला किंवा काळ्याकुट्ट वेळी’मधील भाषेचे नमुने सर्वार्थाने भिन्न आणि युनिक आहेत.

मनस्विनीच्या कथेमध्ये ओढून ताणून ‘बोल्ड’ मानल्या गेलेल्या तथाकथित सेक्सचित्रणांचा त्रोटक उल्लेखही येत नाही. स्त्री-दु:खांची पारंपरिक गिरविलेली कथामाला नाही. बेगडी अन्यायाच्या व्यथा नाहीत, की तुपट सुखद वातावरणात स्त्री मानसिक कुतरओढीच्या गाथा नाहीत. पण आजच्या स्त्री लेखनासंदर्भात उगाच वापरला जातो, तो बंडखोरपणा खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहे. तिच्या नाटकांमधून, सध्या सुरू असलेल्या भलत्याच लोकप्रिय मालिकेच्या लेखनामधून तो जसा सच्चा आहे, तसाच या कथा लेखनामधूनही पूर्णपणे डोकावला आहे. पुढल्या काळातील तिच्या कथांबाबत म्हणूनच प्रचंड उत्सुकता तिने या धारदार संग्रहाद्वारे निर्माण करून ठेवली आहे.

वाचकांची बंडखोरी

मुळात वाचन संस्कृतीच्या अस्ताच्या वगैरे चर्चा शंभरेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या आपल्या राज्यात वाचनव्यवहार टिकवून ठेवणारी त्रोटक मानवी जमात टिकून राहिलेलीच आहे. माध्यमांच्या ओझ्यात आणि वाढलेल्या जगण्याच्या वेगातही ती वाचत राहिलेली आहे. फडक्यांच्या कादंबऱ्यांमधील पुढारलेल्या स्त्रिया म्हणजे बापावरचा राग काढण्यासाठी परजातीत लग्न करणाऱ्या, त्यानंतरच्या लेखकांनी कॉलेजात सायकलवरून जाणाऱ्या आणि नंतर नोकरी वगैरे करणाऱ्या स्त्रियांना फॉरवर्ड रूप दिले. त्यात य. गो. जोशी, द. र. कवठेकरांनी पुढारलेल्या स्त्रियांमध्येही सुसभ्य, कौटुंबिकपणाचा गुण बसविला. पु. भा. भावे यांच्या किंवा त्यांच्या समकालीन तत्कालीन कथा-कादंबऱ्यांतील अग्रेसर स्त्रिया थेट अभिजात इंग्रजी साहित्यावर चर्चा करताना दिसतात. भाऊ पाध्ये किंवा अरुण साधू यांच्या समकालीनांच्या कथासाहित्यातील स्त्रिया आत्मभानाची भाषा करताना दिसतात. त्या पुढच्या कथन साहित्यांमध्ये स्त्रियांच्या वाचनाची दिशा अस्पष्ट होताना दिसते. व्हर्जिनिया वुल्फ, अ‍ॅन रॅण्ड यांचा साधारणपणे आलेला जागतिक प्रभाव आणि जागतिक स्त्रीमुक्ती चळवळीचा प्रभाव यांनी स्त्री लेखन आधीपेक्षा वरच्या पायरीवर गेलेले दिसते.

आजच्या दोन हजारोत्तर स्त्री वाचक पिढीला मराठी स्त्री-वादी, स्त्री-दु:ख कथा आणि पारंपरिक स्त्री साहित्यात कितपत रस आहे, याचा शोध वाचणाऱ्या आजच्या स्त्री घटकांतून घेतला असताना हाती येणारी माहिती कुतूहलपूर्ण होती. शाळा, कॉलेजातील वाचन वातावरणामध्ये वाचलेल्या खूप भावलेल्या स्त्री-वादी लेखनाला आणि त्यातील विचारांना आज वाचले जात नसल्याची बहुतांश वाचकांकडून कबुली होती. जितक्या वेगामध्ये गेले दीड दशक बदलले, तितक्या वेगात येणारी वाचकपिढी बंडखोर म्हणून नावाजल्या गेलेल्या सर्वच लेखिकांना आऊटडेटेड ठरवू लागली आहे. एके काळी लायब्रऱ्यांमधून शोभा डे यांच्या अनुवादित मराठी पुस्तकांची मागणी मोठी होती. आताचे स्त्री वाचक परभाषिक, परदेशी लेखिकांचे अनुवादित मराठी साहित्य मोठय़ा प्रमाणात वाचतात. अनुवादासोबत मूळ इंग्रजी कादंबऱ्यांकडेही आजच्या स्त्री वाचकांचा कल खूप आहे. त्या एलिझाबेथ गिल्बर्टचे ‘इट प्रे लव्ह’ वाचतात, स्टेफनी मायरचे ‘ट्वायलाईट’, ई. एल. जेम्सचे ‘ममी पोर्न’, ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’, जॉन ग्रे याचे ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’, फॅन फिक्शन, अद्वैता कालापासून स्वाती कुशलपर्यंत भारतीय लेखिकांच्या चिक लिट्स आदी वाचण्यात आजच्या स्त्रिया गर्क आहेत.  या मराठीपासून आक्रसत जाणाऱ्या बंडखोर स्त्री वाचकांना पुन्हा स्वभाषेकडे ओढण्याची गरज आहे. त्याचसोबत मराठीत नवा वाचकवर्ग तयार होईल, असे ताकदीचे साहित्य तयार होण्याची गरज आहे. उरल्यासुरल्या मासिकांची आणि दिवाळी अंकांची शक्ती त्यासाठी अपुरी पडणारी आहे.

एक संपूर्ण पिढीच इंग्रजी वाचनाकडे सरकेल, अशी शासकीय आणि कौटुंबिक व्यवस्था तयार असलेल्या आजच्या काळात पारंपरिक मराठी स्त्री बंडखोर कथन साहित्याचे नकारात्मक भाकीत करणे सोपे आहे. ते बदलणे नव्या लेखिकांच्या वकुबावर अवलंबून आहे.
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com