दुसऱ्याला सुगंध भेट देणं ही कल्पनाच खूप भारी आहे. म्हणून आजही पर्फ्यूम्स ही आप्तेष्टांना द्यायला आयडियल गिफ्ट मानली जाते. सुगंधी बाजारात फेरफटका मारून गोळा केलेली ही सुगंधी कुपी.अत्तराचं महत्त्व तसं अगदी राजेरजवाडय़ांच्या काळापासून. आताच्या काळात सेलिब्रिटींचे आवडते पर्फ्यूम्स हादेखील चर्चेचा विषय असतो. आताच्या काळात कशाला, अगदी बालगंधर्वाच्या काळापासून हे दिसतं. स्वत: बालगंधर्वही अत्तराचे शौकीन होते. बालगंधर्वाच्या नाटकातही अत्तराचे फवारे असायचे. देवघरात लावल्या जाणाऱ्या सुगंधी द्रव्यांपासून बनवल्या जाणाऱ्या उदबत्तीनेही वातावरण प्रसन्न होतं. अगदी लग्नसराईपासून ते हळदी-कुंकवासारख्या घरगुती तसेच इतर सार्वजनिक समारंभांना अत्तराची परंपरा आहे. अत्तराचा नाद पूर्वीपासूनच इतका होता की, ‘अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’ अशी लावणीही रचली गेली. कालांतराने ही सुगंधी द्रव्ये डीयो आणि सेंटच्या रूपात प्रसिद्ध झाली आणि उपयोगात आणली जाऊ लागली. लहानथोर सगळेच जण त्याचा आवडीने वापर करतात. मुळात अत्तरं किंवा पर्फ्यूम्ससाठी सुगंधाची निर्मिती कशी केली जाते?

लोअर परेलच्या ‘अमेय प्रॉडक्शन्स’च्या श्री. लेले यांनी याविषयी माहिती दिली. खरं तर दोन प्रकारे सुगंधाची निर्मिती करता येते. ‘‘नसíगक वनस्पतींचा अर्क काढून आणि वेगवेगळी रसायनं वापरून अशा दोन्ही प्रकारे सुगंध तयार करता येतो. उत्तम प्रकारच्या सुगंधाची निर्मिती करण्यासाठी नसíगक वनस्पतींचे अर्क आणि रसायनं या दोहोंचा एकत्रितपणे वापर केला जातो.’’ लेले यांनी सांगितलं.  ‘अत्तराचे दिवे’ हाही एक वेगळा प्रकार त्यांनी केल्याचं ते म्हणाले. हे अत्तराचे दिवे समई आणि पणत्यांच्या आकाराचे असतात. त्या दिव्यांमध्ये सुगंधित बìनग ऑइल वापरलं जातं. दिवे प्रज्वलित केल्यानंतर सुगंध सगळीकडे पसरतो. ‘वॉिशग मशीन पर्फ्यूम’ हादेखील असाच एक प्रकार. आपल्या इकडच्या उष्ण हवामानात बराच काळ कपडे कपाटात ठेवल्यानंतर कपडय़ांना एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. तो वास घालवण्याच्या उद्देशाने त्यांनी वॉिशग मशीन पर्फ्यूम्स तयार केले आहेत. त्यासाठी त्यांनी वॉटर सोल्यूबल ऑइलची निर्मिती केली. वॉिशग मशीनमध्ये कपडे धुताना तिसऱ्या सायकलला जे पाणी येतं त्यात हे ऑइल घातलं जातं आणि त्याद्वारे कपडय़ांना येणारा वास घालवता येतो.
अत्तरं, पर्फ्यूम्स यांची मोठी बाजारपेठ दक्षिण मुंबईत आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेल्यावर अत्तरं, सेंट्स, डीयो, बॉडी स्प्रे, पर्फ्यूम यांचे अनेक प्रकार दिसतात. ‘‘यार्डले, फॉग, इिनग, सॉट, स्पायगर आणि पार्क अ‍ॅव्हेन्यू या विदेशी बॉडी स्प्रेजना सध्या प्रचंड मागणी आहे. ‘पार्क अ‍ॅव्हेन्यू’ जुन्यातला लोकप्रिय स्प्रे असून ‘पार्क अ‍ॅव्हेन्यू’ या ब्रॅण्डनेमवर तो खपतो आणि आजही प्रसिद्ध आहे. ‘सॉट’ हा बॉडी स्प्रे नव्याने बाजारात आलेला आहे. या बॉडी स्प्रेमध्ये गॅस नसून हा द्रवरूपात उपलब्ध आहे,’’ अशी माहिती क्रॉफर्ड मार्केटमधल्या नॅशनल ट्रेड या दुकानातून मिळाली. सध्या ब्रॅण्डेड पर्फ्यूम्सची चलती आहे. त्यातही विदेशातल्या ब्रॅण्ड्सची जास्त चलती आहे. ए. बी. स्पिरिट, लोमानी, अल् पसो, जोवन मस्क ही नावं सध्या चलतीत असल्याची माहिती बाजारपेठेतून मिळाली. भारतीय सेंट्समध्येही हल्ली ब्रॅण्डेड सेंट्सना प्रचंड मागणी असल्याचं दिसतं. ओ. एस. आर., विवा, आर. पी. जयविजय, राम सन्स हे त्यातलेच काही ब्रॅण्ड्स.

क्रॉफर्ड मार्केटमधील इ. एम. अत्तरवाला यांच्याकडे सध्या ‘ब्लू मून’, ‘ब्लू लोमानी’, ‘ब्लू लेडी’, ‘चॅरिएट’, ‘लंडन लाइट’ या विदेशी अत्तरांना सर्वाधिक मागणी आहे. भारतीय अत्तरांमध्ये ‘जन्नतन’, ‘फिर्दोस’, ‘फॅन्सी बकेट’, ‘नागचंपा’ या अत्तरांना मागणी आहे. येत्या दिवाळीत हिना, गुलाब आणि मोगऱ्याच्या पारंपरिक अत्तराचा खप जास्त होत असल्याची माहिती इ. एम अत्तरवाले यांनी दिली. याशिवाय वर्षभर वेगवेगळ्या सणसमारंभांना ब्रूट, लंडन लाइट आणि आइसबर्ग या पर्फ्यूम्सना मागणी असते.
पर्फ्यूम्सबाबतच्या आवडीनिवडींविषयी तरुणाईशी चर्चा केल्यावर स्ट्राँग अ‍ॅरोमा, मीडियम रेंज अ‍ॅरोमा आणि माइल्ड अ‍ॅरोमा अशी वेगवेगळ्या प्रकारची आवड असलेले लोक दिसले. कल्याणच्या बिर्ला कॉलेजला शिकणारी रेचल डिकोस्टा म्हणाली, ‘‘पर्फ्यूमचा एक विशिष्ट ब्रॅण्ड आवडतो असं नाही; पण मला स्ट्राँग अ‍ॅरोमा असलेले पर्फ्यूम्स आवडतात, कारण ते लाँग लािस्टग इफेक्ट देतात.’’ गिरगावात राहणारी २५ वर्षांची फिजियोथेरपिस्ट धनश्री बोरवणकर म्हणाली, ‘‘मला पॅको रबाना आणि वर्साचेचा ‘यलो डायमंड्स’ हे पर्फ्यूम्स आवडतात. दोन्ही पर्फ्यूम्सचा अ‍ॅरोमा स्ट्राँग आहे आणि त्यामुळे बराच काळ तो सुगंध अनुभवता येतो. मला स्ट्रॉन्ग अ‍ॅरोमाचे जेन्ट्स पर्फ्यूम्सही आवडतात.’’
काही जण माइल्ड अ‍ॅरोमा असलेला पर्फ्यूम वापरणं प्रीफर करतात. अनुजा पटवर्धन हिने याविषयीचं तिचं मत सांगितलं. अनुजा रामनारायण रुईया महाविद्यालयाची विद्याíथनी आहे. अनुजा म्हणाली, ‘‘मला इवा आणि निविया हे सेंट्स आवडतात. त्यातही इवा मला अतिशय आवडतं. या दोन्ही सेंट्सचा सुगंध खूप माइल्ड असून त्यामुळे खूप रिलािक्सग वाटतं. मीडियम रेंजचा पर्फ्यूम वापरणाऱ्यांपकी गोरेगावची निकिता राजाध्यक्ष तिचं मत मांडते, ‘मला मीडियम रेंजचे पर्फ्यूम्स आवडतात. मीडियम रेंज इज द पर्फेक्ट रेंज. त्यामुळे खूप उत्साही वाटतं.’’ स्वीटहार्ट हा तिचा आवडता सेंट आहे.
पर्फ्यूमच्या या दुनियेत रमणाऱ्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या. जो तो आपापल्या आवडीनुसार पर्फ्यूमची निवड करतो. कुणी गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायला महागडा पर्फ्यूम मारून येतो, तर एखादी गर्लफ्रेंडही बॉयफ्रेंडचा जेन्ट्स पर्फ्यूम आनंदाने वापरते. शेवटी आवडीनिवडी जरी भिन्न असल्या तरी या नाना परिमळांचा आनंद लुटण्याची मजा काही औरच!
viva.loksatta@gmail.com