मेक-अप करताना काय काळजी घ्यायची, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरायची, मेक-अप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं अशा अनेक शंका मनात असतात. त्यांचं समाधान करणारी लेखमालिका.
सौंदर्याच्या रहस्यातलं छुपं आयुध म्हणजे गालांवरची लाली. योग्य प्रकारे ब्लशचा वापर केला तर ही लाली नॅचरल दिसू शकते. नाहीतर सगळ्या चेहऱ्याचंच हसं होऊ शकतं.
साधारणपणे १९५० आणि १९६० च्या दशकापर्यंत मेकअपमध्ये ब्लशचा वापर आवर्जून मोठय़ा प्रमाणावर केला जायचा. त्या काळापेक्षा हल्ली मेकअपमध्ये ब्लश वापरण्याचे प्रमाण बरेच कमी झालेले दिसते. परंतु ब्लश हे सौंदर्याच्या रहस्यातले एक छुपे आयुध आहे. त्वचेचा रंग नसíगक तसेच निरोगी दिसण्यासाठी योग्य रंगाचे ब्लश उपयुक्त आहे. ब्लशचा जास्त वापर किंवा चुकीचा रंग मात्र सगळा चेहरा खराब करू शकतो. ब्लश वापरण्यासंदर्भातले अपुरे ज्ञान हेही ब्लश वापरणे कमी झाल्याचे एक कारण असू शकते. चुकीच्या रंगसंगतीने आणि लावण्याच्या चुकीच्या पद्धतीने तुमचा चेहरा मेकअपनंतर विदूषकासारखा किंवा बार्बी डॉलसारखा दिसतो. म्हणूनच आज ब्लश लावण्याची पद्धत आणि चेहऱ्याच्या आकारानुसार ब्लश कसा आणि कुठे लावावा याबद्दल जाणून घेऊया.
ब्लशचा रंग : ब्लशचा कलर निवडण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत. एकतर तुमच्या ‘स्किन टोन’शी मॅच करणारा ब्लश हवा. हा रंग शोधायची एक सोपी पद्धत- तुमच्या गालांना हलक्या हातांनी थोपटा. गालांवर येणाऱ्या रंगाशी ब्लशचा रंग मॅच झाला पाहिजे. (अर्थात हा प्रयोग घरात कुणी नसताना करून बघा). दुसरी पद्धत आहे ती ओठांच्या रंगाशी जुळणारा रंग निवडण्याची. साधारण गौर वर्णाला गुलाबी किंवा पीच कलर आणि सावळ्या रंगाला अ‍ॅप्रिकॉट किंवा रेड कलर उठून दिसतो.
स्वरूप : पावडर, क्रीम, लिक्विड किंवा जेल.. कुठल्या स्वरूपातील ब्लशची निवड करायाची हा तुमचा चॉइस आहे. पण त्यासाठी तुमचा स्किन टाइप आणि स्किन कंडिशनचा विचार करूनच निर्णय घ्या. तेलकट किंवा कॉम्बिनेशन त्वचेसाठी पावडर, लिक्विड किंवा जेलही वापरू शकता. चांगल्या रिझल्ट्सकरिता पावडर आणि क्रीमचे कॉम्बिनेशन वापरू शकता. कोरडय़ा त्वचेसाठी क्रीम ब्लश वापरावे.
ब्लश कधी लावायचा? : फाउंडेशन, डोळ्यांचा आणि ओठांचा मेकअप झाल्यावर ब्लशचा नंबर शेवटून दुसरा येतो, पावडर लावण्याआधी ब्लश लावावा.
ब्लश कसा लावायचा?
ब्लश लावण्यासाठी ब्लशर किटसोबत आलेला छोटासा ब्रश कृपया वापरू नका. ब्लशर ब्रशचाच वापर करा. आणि हो.. तोच ब्रश पुन्हा पावडर लावण्यासाठी वापरू नका.
ब्रशवर ब्लश घ्या आणि थोडीशी ब्रशला टिचकी मारा जेणेकरून जास्तीचे ब्लश झटकले जाईल. आरशात बघून चेहरा हसरा करा. त्यामुळे तुम्हाला गालांचा उंचवटा कोठे आहेत याची कल्पना येईल. आपल्या चेहऱ्याच्या ठेवणीनुसार नेमके ब्लश कोठे आणि कसे लावावे यासाठी खालील चौकटीत दिलेल्या चित्रांचा आधार घ्या.

चेहऱ्याच्या आकारानुसार ब्लश लावण्याची पद्धत
लांबट : गालांच्या उंचवटय़ाकडून कानापर्यंत ब्रश फिरवा जेणेकरून चेहरा पसरट दिसायला मदत होईल.
अंडाकृती : गालांच्या उंचवटय़ाकडून वरच्या दिशेला लावा, नॅचरल लुक येईल.
बदामी : हनुवटीचा टोकदार भाग थोडा सॉफ्ट करण्यासाठी गालांच्या उंचवटय़ाखाली लावून वरच्या दिशेने ब्रश फिरवा.
त्रिकोणी : हनुवटीचा निमुळता भाग थोडा सॉफ्ट करण्यासाठी गालांच्या उंचवटय़ाखाली लावून वरच्या दिशेने ब्रश फिरवा.
चौकोनी : गालांच्या उंचवटय़ावर गोलाकार पद्धतीने लावा, जेणेकरून चेहऱ्याचा कोन असलेला भाग थोडा सौम्य होतो.
गोल : जेथे गालांचे हाड आहे तेथून वरच्या दिशेने ब्रश फिरवा, त्याने चेहरा थोडा बारीक दिसेल.

स्मार्ट  टिप्स
* ब्लश जास्त झाले आहे असे वाटत असेल तर पावडर ब्लशवर पारदर्शक पावडर लावून सेट करावे आणि जर क्रीम ब्लश असेल तर ब्लॉटिंग पेपरने टिपून घ्यावे. लिक्विड किंवा जेल ब्लशचा पॅच तयार होतो. ते जास्त झाल्यास काढून टाकता येत नाही.
* ग्लॅमरस लुकसाठी चिक बोनवर डोळ्यांच्या जवळ शिमर ब्लश लावा.
* पावडर ब्लश लावताना एकाच दिशेने व हलक्या हाताने ब्रश फिरवावा, नाहीतर रेषा रेषा दिसतात.
* ज्यांची त्वचा सुरकुतलेली किंवा प्रौढत्वाकडे झुकलेली आहे त्यांनी क्रीम ब्लशला प्राधान्य द्यावे. क्रीम ब्लश ब्लेंड व्यवस्थित होते, त्यामुळे नॅचरल लुक मिळतो.
* लिक्विड किंवा जेल ब्लश लावताना एक डॉट चिकवर आणि दोन छोटे डॉट चिकबोनवर ठेवून नंतर व्यवस्थित ब्लेंड करावे व केसांपर्यंत पसरवावे.
* ब्लश लावण्यासाठी ब्लशर किटबरोबर आलेला छोटासा ब्रश वापरू नका. ब्लशर ब्रशचाच वापर करा.