vn14एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

आधुनिक लाइफस्टाइल स्वीकारायला उत्सुक आजची जेननेक्स्ट नव्या गोष्टी आवर्जून आजमावत असते. एकीकडे नवं ट्राय करू पाहणारी ही पिढी आहे, तर दुसरीकडे नव्या पिढीसोबत जुळवून घेऊ  पाहणारी, त्यांच्या सोबत पावलं टाकणारी थोडी आधीची एक पिढी आहे. या दोन्ही पिढय़ा पाश्चात्त्य जगातील संकल्पनांना सरावत आहेत. त्यात कॉफी हाऊस, तिथे जमणारा अड्डा आणि होणारं खानपान हा या आधुनिक जीवनशैलीचा अगदी महत्त्वाचा भाग म्हणता येईल. मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी, हँगआऊटसाठी सीसीडी किंवा बरिस्ता गाठणारी मंडळी नव्या व जुन्या दोन्ही पिढय़ांतली आहेत. काही जण या वातावरणाला पूर्णपणे परिचित तर काही जण ओळख करून घ्यायला उत्सुक.
अशा नवख्या मंडळींसमोरची सर्वात मोठी समस्या म्हणजे कॉफीच्या नावांचे उच्चार. कॉफी ऑर्डर करताना नेमका उच्चार काय आहे बुवा या चिंतेत मेन्यू कार्डमधल्या नावावर बोट ठेवून कॉफी ऑर्डर करणारे कमी नाहीत. खरं तर यात लाज वाटण्याचं काहीच कारण नाही. कॉफी हे पेयच आपल्या संस्कृतीमधलं नाही आणि त्यातही कॉफीची वंशावळ तर अगदी अलीकडे आपल्या परिचयाची झाली आहे. त्यामुळे त्या नावांच्या उच्चारात येणारी अडचण अगदी  सहज आहे. परदेशात एखाद्या भारतीय हॉटेलमध्ये शामी कबाब, रेशमी कबाब, पहाडी कबाब अशी नावं वाचताना एखाद्या परदेशी माणसाला जितकं गोंधळायला होईल अगदी तितकी सहज. त्या न्यायाने ही मोचा कॉफी का मोका कॉफी हा आपला गोंधळ उडणं अगदी स्वाभाविक ठरतं.
कॉफीची अगदी प्रसिद्ध कॅटेगरी म्हणजे मोका, लाट्टे, कॅपेचिनो, फ्रॅप्पे आणि एस्प्रेसो. यापैकी mocha मधल्या ch मुळे नवखा माणूस मोचा असा सरळ उच्चार करतो. आणि नंतर हा उच्चार मोका आहे हे कळल्यावर ओशाळतो. लाट्टेचा उच्चार इंग्रज वा अमेरिकन मंडळींच्या ओठी लाट्ठे असा आढळतो. तर एस्प्रेसो हा कॉफी प्रकार म्हणजे गंमतच आहे. बनवण्याच्या पद्धतीपासून उच्चारापर्यंत टोटल गोंधळ. एक तर कॉफी हाऊस व्यतिरिक्त सव्‍‌र्ह होताना ही कॉफी एक्स्प्रेसो होऊन जाते आणि हाच चुकीचा उच्चार आपल्या तोंडीही रुळतो. बनवण्याच्या पद्धतीत फरक असू शकतो, मात्र उच्चार १०० टक्के एस्प्रेसो हाच आहे. एक्स्प्रेसो नाही. या जोडीनेच कॅपेचिनो की कापूचिनो असा संभ्रम असतो. मात्र त्यातही कॅपेचिनो हाच उच्चार योग्य ठरावा.
सध्याचा काळ असा आहे की जग जवळ येतंय. देशोदेशीचं खाद्य वैभव आपल्यापुढे हजर आहे. आपण उच्चारात चुकलो म्हणून चवीत काहीच फरक पडणार नाही. पण आपण जेव्हा ऑफिस वा मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये असतो तेव्हा आपण स्वत:बद्दल आपल्या मनाशी काही कल्पना बाळगलेल्या असतात. अशा कल्पनांमध्ये आपला चुकीचा उच्चार आपल्याला उगाचच केविलवाणं वाटायला लावतो. आपल्यापैकी अनेकांनी हा अवघडलेपणाचा अनुभव घेतला असेल. या उच्चारांना सरावलेल्या मंडळींसाठी नाही पण या अवघडलेल्या मित्रांसाठी आजचा हा लेखन प्रपंच. का? म्हणाल तर कुणी तरी म्हटलंच आहे- A lot can happen over a cup of coffee.
रश्मी वारंग-viva.loksatta@gmail.com