दिवाळीसाठीच्या गिफ्ट आयडियाजमध्ये सध्या चॉकलेटचं स्थान मिठाईच्या वरचढ होऊ लागलं आहे. त्यातही क्रेझ आहे आकर्षक पॅकेजिंग केलेल्या होममेड चॉकलेट्सची. सुहृदांना देण्यासाठी घरी चॉकलेट करणं अवघड मुळीच नाही.

सण आणि फॅमिली- फ्रेंड्स या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की आनंद साजरा करण्यासाठी ‘कुछ मिठा हो जाये’ असे शब्द आपल्या ओठांवर सहज रेंगाळून जातात. हे म्हणतानाच लहानांपासून अगदी मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारं असं ‘चॉकलेट’ आपल्या डोळ्यासमोर येतंच. दिवाळीच्या भेटवस्तूंमध्ये चॉकलेट बॉक्सचा नंबर हल्ली अव्वल असतो. दिसायला छान, सगळ्यांना आवडणारं आणि टिकणारं असं चॉकलेट म्हणूनच द्यायला सोयीचं जातं. मिठाई आणि सुक्यामेव्याच्या बॉक्सच्या बरोबरीनं चॉकलेट बॉक्सचा खप दिवाळीत होतो, असं दुकानदार सांगतात. पण हल्ली जमाना आहे होम मेड चॉकलेटचा. स्वत: घरी बनवलेलं चॉकलेट सुंदर पॅक करून सुहृदांना देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्यालाही छान वाटतं आणि कष्टाचं सार्थक होतं. ‘हटके’ गिफ्ट दिल्याचं समाधान लाभतं ते वेगळंच.

हे वाचून चॉकलेट घरी बनवण्याचे कष्ट कोण घेणार? असा विचार करत असाल पण  घरी चॉकलेट बनवणं हे अजिबात अवघड काम नाहीय. चॉकलेट बनवायचा इझी फंडा म्हणजे बाजारातून रेडीमेड चॉकलेट स्लॅब विकत आणायचे. त्यामध्ये डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट आणि व्हाइट चॉकलेट असे प्रकार उपलब्ध असतात. आपल्याला हवाय तो स्लॅब घेऊन त्याचे लहान लहान तुकडे करून ते डबल बॉयलरवर मेल्ट करून घ्यायचं. (डबल बॉयलर म्हणजे जाड बुडाच्या पातेल्यात पाणी घ्यायचं ते उकळायचं आणि त्यात आणखी एक भांडं ठेवून त्यामध्ये चॉकलेट मेल्ट करायचं.)मेल्ट झालेलं  चॉकलेट मोल्ड्समध्ये भरून घ्यायचं. आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही ड्राय फ्रुट्स, चोको चिप्स याचंदेखील स्टफिंग करू शकता. बाजारात हव्या त्या मटेरिअसलचे मोल्ड्स उपलब्ध आहेत. प्लास्टिक मोल्ड्स, सिलिकॉन मोल्ड्स, रब्बर मोल्ड्स, मेटल मोल्ड्स असे या मोल्ड्सचे नातेवाइक बाजारात पाहायला मिळतात. मेल्ट करताना त्यामध्ये हवे ते इतर फ्लेवर मिक्स करून वेगवेगळ्या स्वादाची चॉकलेट्सही तयार करता येतील. त्यांनतर हे मोल्ड्स फ्रीजरमध्ये १० मिनिटं ठेवले की, आपली डीलिशीयस होम मेड चॉकलेट्स तयार होतात.

छंदासाठी किंवा पहिल्यांदाच ट्राय करायचं असेल तर प्लास्टिक मोल्ड्स हा उत्तम पर्याय असतो. पण हे मोल्ड्स स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडून चांगलीच कसरत करून घेतात. पण ‘बजेट मे समाए’ असच त्याचं स्वरूप असतं. मेटल मोल्ड्स हे सर्वात महाग असतात. परंतु फिनििशगसाठी त्यांचा हात मात्र कोणी धरू शकत नाही. त्यानंतर रबर मोल्ड्स हे सजावटीसाठी मोठय़ा प्रमाणावर वापरतात. सिलिकॉन मोल्ड्समधून चॉकलेट सोप्या आणि सहज काढता येतं आणि त्यांचा फिनििशग टचदेखील आकर्षक असतो. म्हणूनच त्यांची किंमत जास्त असते. शिवाय  ‘शोपीस एलिमेंट’ म्हणूनही यांना पसंती दिली जाते.
कार्टून्स, फळं, फुलं, गाड्या, प्राणी, वेगवेगळ्या नक्षी अशा विविध पद्धतींची मोल्ड्स आपल्या स्वागतासाठी मार्केट्समध्ये असतात. ‘sorry’, ‘congratulations’, ‘with love’ अशा भावनांचं लेटरिंग असलेले मोठे चॉकलेट बार मोल्ड्सही आपल्या मदतीला असतात.
चॉकलेट बनवण्यापेक्षा त्याचं आकर्षक पॅकिंग महत्त्वाचं आहे. कारण दिसताक्षणी स्पेशल गिफ्ट असल्याची भावना निर्माण करण्यासाठी असं पॅकेजिंग महत्त्वाचं असतं. रॅपिंगसाठी प्लास्टिक पेपर आणि सिल्वर किंवा कलरफूल अ‍ॅल्युमिनियम शीट्स वापरले जातात. शिवाय हँडमेड पेपर्स वापरून त्यावर कान, नाक, डोळे काढून कार्टून्स कडे झुकणारं लहान मुलांना आवडेल असं रॅपिंग बनवता येतं.
    
चॉकलेट फाउंटन
निसर्गाच्या सान्निध्यात असणारे झरे पाहून आपलं मन नेहमीच आल्हाददायक आणि प्रसन्न होतं. पण असा एक झरा आहे की, त्याच्या दर्शनाने आपल्या तोंडाला चक्क पाणी सुटतं. तो म्हणजे चॉकलेटचा झरा. अर्थात चॉकलेट फाउंटन. हल्ली विविध मॉल्समध्ये, पंचतारांकित हॉटेल्समध्ये आणि निरनिराळ्या प्रदर्शनांमध्ये हे चॉकलेट फाउंटन हमखास दिसतं. चॉकलेट फाउंटनचा शोध बेन ब्रिसमन यांनी लावला. १९९१ मध्ये हा प्रकार पहिल्यांदा युरोपीय देशांमध्ये प्रसिद्ध झाला आणि मग अमेरिकेत आणि भारतातही अधूनमधून मोठय़ा हॉटेल्समध्ये दिसायला लागला. फळांचे तुकडे, बिस्किटं हे मेल्टेड चॉकलेटमधून सव्‍‌र्ह करण्यासाठी चॉकलेट फाउंटनचा वापर केला जातो. काही जणांना हे मेल्टेड चॉकलेट तसंच खायलादेखील आवडतं. चॉकलेट सॉस म्हणूनही याचा वापर करता येतो. कमर्शिअल चॉकलेट फाउंटन आणि होम चॉकलेट फाउंटन असे याचे दोन प्रकार पाहायला मिळतात. कमर्शिअल फाउंटन २० ते ४० इंच उंच असून ते खास केटिरग व्यवसायाकरिता डिझाइन करण्यात आलेलं असतं. यात साधारण ३५ पाउंड चॉकलेट सामावण्याची क्षमता असते. घरीसुद्धा काही खास कार्यक्रमासाठी हल्ली चॉकलेट फाउंटन आणलेलं दिसतं. एखाद्या पार्टीसाठी, सणासाठी वापरलं जातं. घरातलं फाउंटर १९ इंच उंच असून ६ पाउंड चॉकलेट सामावण्याची क्षमता त्याच्यात असते. प्रामुख्याने ते प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टीलने बनलेलं असतं. बाजारामध्ये मिळणारं रेडीमेड चॉकलेट फाउंटन घेणं सोईचं. शॉपिंग वेबसाईट्सवरही चॉकलेट फाउंटनची ऑनलाइन खरेदी आपल्याला आता करता येते. साधारण १५०० रुपयांपासून याच्या किमती सुरू होतात.