मी सत्तावीस वर्षांचा तरुण आहे. घरच्या काही इश्यूजमुळे गेल्या नऊ वर्षांपासून मी पाच सरकारी नोकऱ्या केल्या आहेत. मी अ‍ॅकॅडेमिकली चांगला स्टुडण्ट होतो, बऱ्याच सरकारी परीक्षा मी पास झालो आहे. मला MPSC/UPSC करायची खूप इच्छा होती, पण नोकरीमुळे जमलं नाही. आता मात्र मी सीरियसली त्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं आहे. माझ्या घरी आता माझ्या लग्नाची चर्चा चालू झाली आहे. मलाही हे वय लग्नासाठी योग्य वाटतंय. घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मला आता तीन फ्रंट्सवर लढायचं आहे. जॉब, अभ्यास आणि लग्न व त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या. या सगळ्यातच यशस्वी व्हावं, अशी माझी इच्छा आहे. मला काही प्रश्न पडले आहेत. लग्नानंतर अभ्यास करणं शक्य आहे का? वर सांगितलेल्या तीन प्रकारच्या फ्रंट्सचा बॅलन्स कसा सांभाळायचा? की आता मी परीक्षेचा वगैरे विचार सोडून द्यावा आणि आताचा जॉबच शांतपणे करावा? मी खूप कन्फ्यूज झालोय.    
मनोज

हाय मनोज,
खूप लहान वयापासून तू स्वत:च्या पायावर उभा राहिलायस. अनेक वेगवेगळे अनुभव तुला आले असतील नाही? तुझ्याबरोबरच्या लोकांना आलेल्या अडचणी, पडलेले प्रश्न तू जवळून पाहिले असशील. परीक्षेतल्या यशापयशाचा, लग्नाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा तू त्यामुळेच इतका विचार करतोयस असं वाटतं आणि बरोबरच आहे ते.
तू आता २७ वर्षांचा आहेस. घरची परिस्थिती कितीही चांगली असली तरी आता या स्टेजला तुला त्यांच्याकडून पैसे मागणं बरोबर वाटणार नाही. त्यामुळे नोकरी करीत राहणं याला सध्या तरी पर्याय दिसत नाही. तुला काही पगारी किंवा अर्धपगारी रजा घेता येण्यासारखी आहे का? दुसरा प्रश्न परीक्षेचा. ही परीक्षा दिल्याने तुझे जॉब प्रॉस्पेक्ट्स नक्कीच सुधारतील. भविष्यात प्रगती करण्याच्या संधीची दारं यामुळे तुझ्यासाठी उघडतील.
ही वाट खडतर आहे हे तू जाणतोसच. खूप सारी जिद्द, मानसिक कणखरता आणि न कंटाळता प्रयत्न करीत राहणं या सगळ्या गोष्टी तुला लागतील, पण तुझी मनापासून इच्छा असेल, तर मला वाटतं तू प्रयत्न सोडू नयेस. तुझा जीवनस्तर उंचावण्यासाठी काही करण्याची आताच वेळ आहे, नंतर पश्चात्ताप करण्यात अर्थ नाही. परीक्षेच्या तयारीसाठी साधारण किती वेळ लागेल, असा तुझा अंदाज आहे? त्यासाठी तू काही एक ठरावीक टाइम लिमिट ठरवू शकतोस. उदाहरणार्थ तीन र्वष. त्यानंतर मात्र प्रयत्न करणं बंद करायचं. तुझ्या अभ्यासालाही त्यामुळे एक डेफिनेट पुश मिळेल. शिवाय जेव्हा लग्न ठरेल तेव्हा होणाऱ्या बायकोला आणि तिच्या घरच्यांना तुला काही तरी पक्की वेळ देता येईल.
लग्न करण्यासाठी तुझं वय योग्य आहे, पण ते फार उलटूनही चाललेलं नाही. तू प्रेमात पडला आहेस का कुणाच्या? नसशील, तर इन द मीनटाइम, तुला लग्न ठरवायच्या प्रोसेसला सुरुवात करता येऊ शकेल. कारण लग्न काही लगेच ठरत नाही, वेळ लागतो त्यासाठी. लग्न केल्यानंतर अभ्यासाला वेळ मिळेल का, ही तुला वाटणारी भीती खरीच आहे. जनरली, लग्न केल्यावर आपोआपच काही जबाबदाऱ्या येतात ज्या टाळणं शक्य नसतं.
तू ऑलरेडी वेळेशी स्ट्रगल करीत असशील तर लग्नानंतर हे सारं जगल करणं जरा ओढाताणीचं होईल, असं वाटतं, धड कशालाच तू जस्टीस देऊ शकणार नाहीस कदाचित. होणाऱ्या बायकोला विश्वासात घेऊन एक्स्प्लेन केलंस तर ती तुला को-ऑपरेट करायला नक्कीच तयार होईल, कारण मुलींनाही आजकाल धडपडणारी, पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणारी मुलं आवडतात. तिचा मानसिक आधारही तुला मिळू शकेल. तिच्यासाठी सध्या फारसा वेळ देता येणार नाही हे मात्र तू तिला वेळीच ठामपणे सांगायला हवंस.
त्यामुळे मनोज, शिक्षण, नोकरी आणि नातेसंबंध या सगळ्यांचा साक्षेपानं विचार करून निर्णय घे. तुझ्या प्रायॉरिटीज निश्चित कर. तुला असणारी कष्टाची आणि धडपडण्याची सवय तुझ्या नक्कीच उपयोगाला येईल.
Think not of yourself as the architect of your career but as the sculptor. Expect to have to do a lot of hard hammering and chiselling and scraping and polishing. – B.C. FORBES    

विचारा तर खरं..
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.