एकीकडे चित्रपट, नाटय़ आणि टीव्ही कमर्शिअल्सच्या माध्यमातून आजच्या जमानातल्या आधुनिक स्त्रीशी नातं जोडण्याचा अधिकाधिक प्रयत्न होत असताना टीव्ही मालिका मात्र वेगळ्याच जमान्यात वावरताना दिसतात. सहनशील नायिका, मुळुमुळु सुना आणि तेच ते कौटुंबिक विषय यातून मालिकेतली स्त्री काही बाहेर पडायला तयार नाही.

घरकाम करणं, मुलांना सांभाळणं आणि एकमेकींच्या कुचाळक्या करण्यात धन्यता मानणाऱ्या स्त्रियांपेक्षा आजची स्त्री निश्चितच वेगळी आहे. आता प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. जिथे नाटकात काम करण्यासही घरातल्या स्त्रीला परवानगी नसायची तिथे आज मनोरंजनाचं कुठलंच क्षेत्र स्त्रियांना वज्र्य राहिलेलं नाही. सिने-नाटय़सृष्टीत अनेकींनी आपलं स्थान पक्कं केलं आहे. अशा कर्तबगार, स्वतंत्र आणि आधुनिक स्त्रीचं प्रतिबिंब मालिकांमध्ये कुठेच दिसत नाही.
स्त्री म्हणजे अबला, मुळुमुळु रडणारी नसून स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहे. प्रत्युत्तर देणारी आहे. पण ही बदललेली परिस्थिती टीव्ही मालिकांच्या कथानकांमधून मात्र अजिबात दिसत नाही. जाहिराती बदलल्या, सिनेमा बदलतोय पण बहुतेक घरेलू मालिकांचा ढाचा मात्र अजूनही तोच तो आहे. रडक्या सुना, जाच करणाऱ्या सासवा, केवळ दागदागिने आणि भरजरी वस्त्र घालून घरभर वावरणं हेच काम असणाऱ्या स्त्रिया आजच्या बहुतेक मालिकांमध्ये दिसतात. शहरी तरुणी या मालिकांमधल्या कॅरॅक्टरशी रिलेट होऊ शकते का.. ‘बीएमएम’ करणाऱ्या मुंबईच्या सारिका चितळे हिच्या मते, ‘मालिकांच्या या रडकथांना अंत नाही. एकीकडे स्त्रीला अन्यायाविरोधात आवाज उठवायला शिकवलं जातंय आणि काही मालिकांमध्ये मात्र सहनशीलता हाच परमोच्च गुण असणाऱ्या मुळुमुळु नायिका दाखवल्या जाताहेत. त्यांच्याशी रिलेट होणं शक्यच नाही.’
अ‍ॅनिमेटर म्हणून काम करणारी उमा परांजपे म्हणते, ‘स्त्रियांना आवडाव्यात म्हणून मालिकांचे विषय असे असतात, असं म्हटलं जातं. पण माझी आई किंवा आजी मालिकांमधल्या स्त्री पात्रांशी जितक्या रिलेट करतात त्या प्रकारे मी करूच शकत नाही. इतकं चकाचक आणि इतकं पोकळ, खोटं वाटतं त्या मालिकांमधलं सगळं. मालिकांमधली स्त्री पात्र आजच्या तरुण मुलीशी अजिबात रिलेट करत नाहीत, असं मला वाटतं.’
नावं वेगवेगळी पण स्त्रीची सहनशीलता सारखीच असंच बहुधा मालिकांमधून दाखवायचंय असं दिसतं. सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर झळकणाऱ्या ‘होणार सून मी हय़ा घरची’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘दुर्वा’, ‘का रे दुरावा’, ‘हॅलो प्रतिभा’, ‘डोली अरमानों की’ , ‘शास्त्री सिस्टर्स’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘बालिका वधू’ अशा मालिकांमध्ये स्त्रियांच्या सहनशक्तीला जणू अंतच नाही, असे समजून कथानक बनविण्यात आले आहे असे वाटते.
कॉमिक रिअ‍ॅलिटी शोजची तऱ्हा या सगळ्यापेक्षा वेगळीच म्हणावी लागेल. ‘चला हवा येऊ  द्या’ , ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ , ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ यांसारख्या कॉमेडी रिअ‍ॅलिटी शोजमधली स्त्री पाहिली की तिची विनोदाच्या नावाखाली केली जाणारी हसवणूक नकोशीच वाटते. ‘बीए’च्या शेवटच्या वर्षांला शिकणारी श्रेया हेजामाडी याविषयी तिचं मत सांगते, ‘मी हल्ली कॉमेडी नाइट्स विथ कपिल बघायचं सोडून दिलंय.
vn05आपल्या पत्नीचा कपिल ज्याप्रमाणे अनादर करतो, ते पाहून अगदी चीड येते. तसाच मानसी नाईकचा ‘चला हवा येऊ  द्या’मधला नाटकीपणा डोक्यात जातो.’ या मालिकांमध्ये काय काय होतं याची मालिका न बघणाऱ्यांना कल्पना येऊच शकत नाही. नवरा आपल्या बायकोला सगळ्यांसमोर मारझोड करू शकतो, आजच्या टेक्नोसॅव्ही जगात निरोप पोचण्यासाठी ४-५ दिवस लागतात, स्वत:वर होत असलेला अन्याय तोंड दाबून सहन करणाऱ्या नायिका तर सगळीकडेच दिसतात.
या सगळ्याविषयी मनोरंजनाच्या विश्वात काम करणारा तरुण निशांत कंदलकरशी संवाद साधला. ‘चित्रपटात वेगवेगळे प्रयोग होऊ शकतात. कारण तो एका ठरावीक वेळेसाठी असतो. आम्हाला सीरियल्समध्ये कौटुंबिक विषयांवर काम करावं लागतं,’ सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणारा निशांत सांगतो.
या सगळ्या जंजाळात ‘एव्हरेस्ट’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘अस्मिता’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’  अशा मालिका अपवाद वाटतात. वेगळ्या धाटणीच्या निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिका सास-बहूच्या कथानकांपासून दूर जाण्याची पर्वणीच म्हणावी लागेल.
प्राची परांजपे -viva.loksatta@gmail.com
    
vn06‘चित्रपटात वेगवेगळे प्रयोग होऊ शकतात. कारण तो एका ठरावीक वेळेसाठी असतो. आम्हाला सीरियल्समध्ये कौटुंबिक विषयांवर काम करावं लागतं. कारण या प्रकारच्या गोष्टींशी आमचा ऑडियन्स जोडला जातो. आमचा जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग गृहिणी आणि वृद्ध व्यक्ती असल्याने त्यांना काय आवडतंय, त्यानुसार आम्हाला कथानक बनवावं लागतं.’
– निशांत कंदलकर, सहायक दिग्दर्शक