‘मी मराठी..’ असं अनेकदा म्हटलं-लिहिलं जातं. पण प्रत्यक्षात संवाद साधताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेचा किती आणि कसा वापर केला जातो? या अनुषंगानं काही प्रातिनिधिक विद्यार्थ्यांच्या मनाचा कानोसा घेण्याचा हा प्रयत्न.

आसावरी फडके
एस्.वाय.बी.ए.
रामनारायण रु ईया कॉलेज
मी मराठी माध्यामातून शिक्षण घेतल्येय. माझं घर आणि महाविद्यालयाचा परिसर मराठमोळा आहे. गरजेचा भाग म्हणून इंग्रजी बोलायला लागत नाही. महाविद्यालयामध्ये तसंच मित्र-मैत्रिणींमध्ये मराठीतून संवाद साधला जातो. अमराठी मित्र-मैत्रिणींना मराठीचं अप्रूप आहे. त्यांना मराठी कळतं नि बोलायलाही आवडतं. आपण कोणत्या भाषेत बोलतो, त्यावर समोरच्याचा प्रतिसाद अवलंबून असतो. संवादासाठी आधी मराठीला प्राधान्य द्यायला हवं. त्याला प्रतिसाद मिळाला नाही, तर अन्य भाषांचा आधार घ्यावा. मराठीला ग्लॅमर मिळवून द्यावं लागेल. त्यासाठी तिचा मूळ गाभा तोच ठेवून तिचं स्वरूप बदलावं लागेल.

निकिता देसाई
एफ.वाय.जे.सी. सायन्स,
कीर्ती कॉलेज
घरी अधिकांशी मराठी भाषेतून संवाद साधते. शाळेत असताना मित्र-मैत्रिणींशी मराठीच बोलत होते. आताही कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी मराठीतच बोलतो. क्लासमध्ये हिंदी आणि इंग्रजीचा वापर करावा लागतो. अभ्यासासाठी पूर्ण इंग्रजीचाच वापर होतो. मराठी तर मातृभाषा नि इंग्रजी व्यवहाराची भाषा होय.

अमृता लोखंडे
एमबीए (एमईटी )
मित्र-मैत्रिणीशी बोलताना मराठीचा वापर होतो. घरीही मराठीतूनच संवाद साधते. गरज असेल तिथं हिंदी आणि इंग्रजी वापरते. कॉलेजमध्ये मराठी मित्र-मैत्रिणींशी मराठी बोलते तर अमराठी मित्र-मैत्रिणींशी हिंदी आणि इंग्रजीतून संभाषण करते. एकूणच व्यवहारात समोरची व्यक्ती जी भाषा बोलेल तीच भाषा वापरते.

सिद्धेश भुर्के
एस्.वाय.बीएस्सी. रामनारायण रु ईया कॉलेज
आपण शक्य होईल तेवढं मराठी बोलावं, या मताचा मी आहे. माझे मित्र, प्राध्यापकही मराठी आहेत. शिकवणं इंग्रजीत असलं ती वैयिक्तकरीत्या एखादा न समजलेला भाग मराठीतून समजावून घेता येऊ शकतो, ते सोपं जातं. अर्थात मी इंग्रजी माध्यमात असल्यानं मला माध्यम कोणतंही असलं तरी फारसा फरक पडत नाही. पण काही संज्ञा इंग्रजीतून समजून घ्याव्या लागतात. उच्चभ्रू ठिकाणी गेल्यावर मी इंग्रजी येत असल्यानं इंग्रजीचाच वापर करतो. हिंदी भाषिकांशी गरजेनुसार हिंदीत बोलतो. जिथं जिथं जी जी भाषा आवश्यक असेल, तिचा वापर करतो.

कौस्तुभ गावडे
एस्.वाय.जे.सी. कॉमर्स,
डी.जी. रु पारेल कॉलेज
मी मराठीचा सर्वत्र वापर करतो. मराठीनंतर हिंदी भाषेला प्राधान्य देतो. इंग्रजी भाषेचा उपयोग फार कमी म्हणजे फक्त अभ्यासापुरता करतो. मित्रांशी मराठीच बोलतो. व्यवहारात आवश्यक असल्यास तसा इंग्रजीचा वापर करतो.