पूर्ण वर्षांचा हिशोच चाळला.. तर खर्चच लक्षात राहतात ना ठळकपणे.. ‘जमा’ बाजूची नोंद करायची राहिलेलीच असते. पण ती नसतेच असं नाही. फक्त मांडलेली नसते आपण.
संपणार हे वर्ष दोन-तीन दिवसांत. तीनशे साठ दिवस कितीही चांगले गेले असले, तरी एखाद-दुसरी घटना घडते आणि बट्टा लागतो आख्ख्या वर्षांला. दिल्लीत चालत्या बसमध्ये एका तरुण मुलीवर झालेला बलात्कार आपल्याला दिङ्मूढ, नि:शब्द करून गेला आहे. कधी? कधी लैंगिक शिक्षणाचं महत्त्व पटणार आपल्या देशात? कधी आपण या विषयावर न संकोचता बोलणार? का माजावर आलेल्या बैलासारखे वागतात काही पुरुष? कधी आपण सेक्सला संवादाचा भाग मानणार? संभोग ही फक्त वखवख उत्सर्जित करणारी अमानुष क्रिया का आहे आजही? अजूनही बँकॉक, थायलंड असे शब्द ऐकले की शिकल्यासवरल्या पुरुषांचेसुद्धा कान अतिप्रचंड उत्सुकतेने का टवकारले जातात..
ज्यांनी हिडीसपणाबरोबर क्रौर्याचाही कळस गाठून दाखवला, अशा गुन्हेगारांना शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. सगळ्यात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. पण नुसतीच शिक्षेची मागणी करून निषेध नोंदवून मोकळं होऊन कसं चालेल? कुटुंब, मित्र, नागरिक म्हणून आपण आपल्या सहमानवांची जबाबदारी घेतलीच पाहिजे. एकमेकांना सजग करणं हे आपले कर्तव्य आहे. मुलींना स्वरक्षणाचे मार्ग शिकवताना वयात आलेल्या मुलग्यांचीही जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. कितीतरी शास्त्रीय गोष्टी स्पष्टपणे बोलून, समजावून सांगितल्या पाहिजेत. स्त्रीलिंगी माणसाचं शरीर म्हणजे खेळणं नसतं. ती बाहुली नाही. पहिल्यापासून ही चाड ठेवण्याचे संस्कार झालेच पाहिजेत.
एकीकडे या अशा घडणाऱ्या घटना, अपघात आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणारं फेसबुक, ट्विटर आणि मेसेजिंग! इतकं वाईट वाटतंय सोशल नेटवर्कवरचं अगाध वाङ्मय वाचून! एक मोठी लाट आली आहे. भारतीय पुरुषांच्या धिक्काराची. फेसबुकवर बरीच फॉरवर्ड झालेली एक लिंक म्हणजे ‘आयुष्यात एकदाही छेडछाड न झालेल्या एका तरी मुलीला मला भेटायचं आहे.’ यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. अक्षरश: तोही एकमतानी. सगळीकडे निंदानालस्ती चालू होती समस्त भारतीय पुरुषांची. आणखी एक विखारी जोक खूप सक्र्युलेट झाला- ‘एक कुत्री रात्रीच्या वेळी घराकडे पसरत होती. अंधारलेल्या रस्त्यावर एके ठिकाणी चार-पाच आडदांड कुत्रे टोळक्यांनी उभे होते. कुत्री धास्तावून घुटमळली. ते पाहून तिला दिलासा देत कुत्रे म्हणाले, घाबरू नकोस. आम्ही कुत्री आहोत; माणसं नाही.’ हे वाचल्यावर अंग पिळवटून टाकणारा, न फुटणारा एक हुंदका दाटून आला आतून. सिनेमातले व्हिलनही सज्जन वाटतील अशी घटना आपल्या देशाच्या राजधानीत घडली. निव्वळ मजेसाठी एका तरुण मुलीचं शरीर हाताळलं, वापरलं, भोसकलं आणि फेकलं गेलं- ही किती निर्लज्ज, निंदनीय गोष्ट आहे!
फेसबुकवर मी एक-दोघांना असं म्हणायचा प्रयत्न केला.. की आपण घडवू शकतो ना स्त्रियांचा मान ठेवणारे मानव.. आपण स्वत:ही एक असू शकतो असे सज्जन. पण माझी कॉमेंट धुडकावली गेली. मला वाटायला लागलंय की घटना घडल्यावर फारसा विचार न करता प्रतिक्रिया द्यायला लोक सरसावून पुढे येतात. त्यात फक्त एक म्हणून टाकणं असतं. स्वत:च्या मताची अनाऊन्समेन्टच जणू. फक्त चेव चढवून घ्यायचा असतो प्रत्येकाला. हर हर महादेव.. म्हणत दौडायला सज्ज झालेला समूह होतात हे फेसबुक- ट्विटरवर आग ओकणारे लोक. शिव्या, विजय, वाढदिवस किंवा श्रद्धांजली- इतकाच संदर्भ राहिला आहे अनेकांसाठी या सार्वजनिक संभाषणाचा.
बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हाही असंच झालं. उगीच त्या नवी मुंबईतल्या मुलींना अटक वगैरे झाली. त्यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी स्फोटक विधानं केली आहेत भल्याभल्यांनी. निधन आणि शोक राहिला बाजूला. चर्चा आणि प्रक्षोभक प्रतिक्रिया फक्त ‘बंद’बद्दलच झाल्या. या राज्याला, मराठी माणसाला- मराठी असण्याचा अभिमान देऊ करणारा एक मोठा नेता गेला. त्यांना श्रद्धांजली द्यायला कानाकोपऱ्य़ातून जो लाखोंचा जनसमुदाय आला.. तो काही पैसे देऊन बोलवला नव्हता. ती त्या नेत्याची ताकद होती. तो त्या लाखोंच्या मनापर्यंत भिडला होता. त्या नेत्याला अभिवादन करण्याची बूज तरी या टीका करणाऱ्या संतप्त रिअ‍ॅक्शनरी लोकांनी ठेवायला हवी होती. पण जमाना ‘ब्रेकिंग न्यूज’चा आहे. झळकण्याचे क्षण वसूल करून घेताना कुणाला आता वास्तवाची तमाच उरलेली नाही. एका मिनिटाचं मौन पाळण्याचा संयमही कोणात नाही. हाताच्या बोटांखाली की-पॅड असल्यामुळे प्रत्येक जण स्वतंत्र विचारवंत झालाय. टीव्ही आणि सोशल नेटवर्कवरचा तमाशा पाहून पाहून सद्गदित आणि विषण्ण व्हायला होतंय. बदलत चाललेल्या वस्तुस्थितीला आपण निरंतर सत्य मानतोय. एखाद्या माणसानं आयुष्य वेचून केलेले काम एका कॉमेंटसाठी पुसून टाकतोय.
या सगळ्यांनी साजरा होतोय टीव्हीवाल्यांचा वीकएण्ड! सनसनी खबर, सेलिब्रेटींची उठून दिसण्यासाठी चाललेली धडपड आणि लहानशा गोष्टीचा गवगवा करून त्याचं प्रकरण करणं- या खेळात खूप बरं असलेलं काहीतरी आपल्यातून निसटून चाललंय. शनिवार-रविवारसाठीगोष्टी प्लॅन केल्या जातायत. मायकल जॅक्सन वीकएण्डला गेला. दहशतवादी हल्ले वीकएण्डच्या मुहूर्तावर सुरू झाले. सुपरस्टार वीकएण्डलाच परलोक सिधरतात. वादळंसुद्धाहल्ली वीकएण्डलाच येतात. एका खूप मोठय़ा नाटय़ातलं आपण प्यादंसुद्धा नाही. पट आहोत कदाचित. भोवतालची हिंसा आणि विकृती पाहून भोवंडून जाताना गचकन ब्रेक लागतो कधीकधी. परवा ‘तलाश’ बघायला गेलो होतो तेव्हा थिएटरच्या स्क्रीनवर झळकलं- ..‘इन फॉण्ड मेमरी ऑफ पल्लवी पूरकायस्थ..’ तो सगळा एपिसोड आठवून गुदमरायला झालं.. तरीही भान ठेवून जगायचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी गहिवरून आलं. चांगली माणसं आहेत आजूबाजूला. मला आणि भेटलेल्या सर्व स्त्रियांना सन्मान्य वागणूक देऊ करणाऱ्यात माझे बाबा आहेत, माझा नवरा आहे, माझे भाऊ आहेत, चार मित्र आहेत, सहकारी आहेत. हो, ही माणसं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कमी आहेत. पण ती आहेत म्हणून आशा आहे.. आणि म्हणूनच अपेक्षाही.. नवीन वर्ष चांगलंच असेल. आपण ते घडवूया. शुभेच्छा..

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा