‘सेल्फ गिफ्टिंग’च्या नव्या ट्रेण्डला साथ मिळतेय ती ई-कॉमर्सची! सेल्फ गिफ्टिंगच्या संकल्पनेला ऑनलाइन चालना देणारी मुंबईची तरुण उद्योजिका आणि तिच्या सरप्राइज गिफ्ट देणाऱ्या ‘शुगरबॉक्स’ याविषयी..

‘सरप्राइज.. सरप्राइज..’ म्हणून वाढदिवसाच्या रात्री दारात उभे राहणारे जीवलग नेहमीच हवेहवेसे वाटतात. ध्यानीमनी नसताना अचानक मिळणारी भेट कोणाला आवडणार नाही! आजकाल अशी छान गिफ्ट्स कुणाच्याही मदतीशिवाय मिळवणं आणि सरप्राइज गिफ्टची हौस भागवणं सहज शक्य झालंय. कारण सेल्फ गिफ्टिंगचा नवा फंडा आता उपलब्ध झालाय. स्वत:चे लाड पुरवण्यासाठी आणि त्यातून आनंद लुटण्यासाठी अनेक तरुण हा मार्ग निवडताना दिसतात. ‘सेल्फ पॅम्परिंग’ असंही याला म्हणता येईल. एका सबस्क्रिप्शनच्या साहाय्याने दर महिन्याला एक सरप्राइझ गिफ्ट बॉक्स तुमच्या दारात येत असेल तर.. गिफ्ट बॉक्समध्ये एका वैशिष्टय़पूर्ण थीमवर आधारित वेगवेगळी गिफ्ट्स असतात. ‘शुगरबॉक्स’ नावाप्रमाणेच एखाद्याच्या आयुष्यात गोडवा आणण्याचं काम ही सेवा करतेय.
निहारिका झुनझुनवाला या तरुणीच्या डोक्यातून ही ‘शुगरबॉक्स’ची संकल्पना आली. मूळची कोलकाताची निहारिका अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये गेली आणि तिथून आपलं शिक्षण पूर्ण केलं. लग्नानंतर ती मुंबईला शिफ्ट झाली. स्वत:चं काही तरी सुरू करण्याची निहारिकाची इच्छा होती. प्रथम तिने ‘बेबी स्किन केअर’ प्रॉडक्ट आणि सव्र्हिसेसचा विचार केला. पण काही तरी वेगळं. हटके काही करण्याचा तिचा विचार होता. वेगवेगळ्या आयडिया समोर येत असताना आपण असं काही तरी करावं जे करताना आपल्याला त्याबद्दल उत्सुकता असेलच पण आपल्या या व्यवसायातून इतरांना आनंद वाटेल असं काही तरी हवं.. या भावनेतूनच मग ‘गिफ्टिंग फॉर सेल्फ’च्या कल्पनेवर काम करण्याचं तिने निश्चित केलं. ‘मुलींना सरप्राइज मिळालं की त्यांना खूप आनंद होतो. कुठल्याही वयाच्या स्त्रीला सरप्राइजचं अप्रूप असतं. काही वेळा त्या स्वत:च त्यासाठी प्रयत्न करतात. आता यात आपल्याला काही करता येईल का या भावनेने ‘शुगरबॉक्स’ची सुरुवात केली’, निहारिकानं सांगितलं.
निहारिका म्हणते, ‘ई-कॉमर्स हे क्षेत्र सध्या तेजीत आहे. त्यातूनच काही तरी वेगळं करण्याच्या उद्देशाने सबस्क्रिप्शन बॉक्स सव्र्हिसेस देण्याचं मी ठरवलं. मला असं काही तरी करायची इच्छा होती जे यापूर्वी कुणीही केलेलं नसेल. आता मुलींना गिफ्ट देण्यासाठी कुणी तरी असण्याची किंवा कुणाकडे तरी मागण्याची किंवा वाढदिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही स्वत:च स्वत:ला गिफ्ट देऊ शकता.’
‘शुगरबॉक्स’च्या माध्यमातून दर महिन्याला ठरावीक भेटवस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. एका थीमला अनुसरून हा गिफ्ट बॉक्स तयार करण्यात येतो. जून महिन्याची थीम आहे.. मान्सून क्रश. मे महिन्यात ‘बोहो चिक’ या थीमवर आधारित फॅशन वेअर, अॅक्सेसरीज आणि खाद्यपदार्थ गिफ्ट बॉक्समध्ये होते. ‘महिन्यासाठी काही ठरावीक रक्कम भरल्यामुळे तुम्हाला गिफ्ट बॉक्स मिळणार हे जरी ठाऊक असलं तरी त्यात नक्की काय असणार हे माहीत नसतं. त्यामुळे त्या बॉक्समधल्या वस्तू या सरप्राइजच असतात. जेवढय़ा रकमेचं सबस्क्रिप्शन करता त्याहून जास्त किमतीच्या वस्तू तुम्हाला या बॉक्समधून मिळतात’, शुगरबॉक्सविषयी सांगताना निहारिका पुढे म्हणजे, ‘मुलींना काय आवडतं हे लक्षात घेऊन काय वस्तू द्याव्यात ते ठरवलं जातं. त्यात दुसरं वैशिष्टय़ असं की, ज्या वस्तू तुम्हाला सहज उपलब्ध होतील अशा वस्तू त्यात नसतात. कारण युनिक आणि पर्सनलाइज्ड गोष्टींना आणि ब्रॅण्डला शुगरबॉक्समध्ये प्राधान्य दिलं जातं. माझ्या ग्राहकांना काही तरी वेगळं आणि केवळ त्यांच्यासाठी असलेलं असं काही तरी देण्याचा माझा प्रयत्न असतो. लाइफस्टाइल आणि क्लोदिंग आम्ही स्वत: तयार करतो. आमचे डिझायनर आहेत. ते महिन्याच्या थीमनुसार डिझाइन करतात.’ नवीन, तरुण उद्यमी त्यांच्या स्पेसिफिक ब्रॅण्डवर काम करत असून त्यांचे ब्रॅण्डही पुढे आणू पाहत आहेत, असे ब्रॅण्ड लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचत आहेत.
नोव्हेंबर २०१४ ला सुरू झालेल्या ‘शुगरबॉक्स’ने (www.sugarbox.in) आज देशातल्या सगळ्या मोठय़ा शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. तुलनेने छोटय़ा शहरांतही आपला पसारा वाढवलाय. शुगरबॉक्सच्या माध्यमातून फॅशन, ब्युटी, लाइफस्टाइल आणि खाद्यपदार्थ याच्याशी निगडित भेटवस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. ज्यात टॉप्स, अॅक्सेसरीज, बॅग्ज, चप्पल, चॉकलेट्स, बॉटल्स, मेकअपचे सामान अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. तुम्ही काही ठरावीक रक्कम (प्रति महिना १५०० रुपये) भरून सबस्क्रिप्शन सुरू करू शकता. त्रमासिक, सहामाही आणि वार्षिक सबस्क्रिप्शनवर सूटदेखील मिळते. मुलींसाठी केल्या जाणाऱ्या पर्सनलाइज्ड आणि हटके गिफ्टमुळे मुलींसाठी एक गिफ्टिंग ऑप्शन म्हणूनदेखील याकडे आता पाहिलं जातंय. हे जरी असलं तरी आपण स्वत:लाच गिफ्ट देण्याचं आणि स्वत:चा आनंद स्वत:च निर्माण करायचा या कल्पनेनंच प्रत्यक्षात ‘शुगरबॉक्स’मध्ये झालेलं रूपांतर दाद देण्यासारखं आहे.