मोबाईल फोनपासून ते टीव्हीपर्यंत अनेक महागडय़ा गोष्टी ऑनलाइन खरेदी करणाऱ्या मुंबईकरांनी मध्य रेल्वेच्या ऑनलाइन पास सेवेकडे मात्र सपशेल पाठ फिरवली आहे. मध्य रेल्वेच्या ४० लाख प्रवाशांपैकी ७० टक्के म्हणजे २८ लाख प्रवासी हे मासिक किंवा त्रमासिक पासधारक आहेत. मात्र त्यापैकी अवघे शंभर प्रवासीच ऑनलाइन पास काढत असल्याचे समोर आले आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांची संख्या ४० ते ४५ लाखांच्या घरात आहे. या प्रचंड संख्येपैकी ७० टक्के प्रवासी हे मध्य रेल्वेचे मासिक किंवा त्रमासिक पासधारक आहेत. रांगेपासून वाचवण्यासाठी मध्य रेल्वेने आयआरसीटीसीच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन पासची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच एटीव्हीएम, जेटीबीएस या प्रणालीवरून पासचे नूतनीकरण करण्याची सुविधाही करून दिली. जेटीबीएस वगळता इतर कोणत्याही सुविधांना प्रतिसाद मिळालेला नाही. एटीव्हीएमवरून पास नूतनीकरण करणाऱ्यांचा आकडा हजारांच्या घरात असला, तरी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पास काढणाऱ्यांचे प्रमाण १०० ते १५० एवढेच असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे हा पास ऑनलाइन काढल्यानंतर घरी मोफत पोहोचवला जातो. या ऑनलाइन सेवेची प्रसिद्धी मध्य रेल्वे आणि आयआरसीटीसीने जास्त प्रभावीपणे न केल्याने हा आकडा कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पास संपण्याच्या मुदतीआधी नवीन पास न आल्यास काय, असे प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केले आहेत. पास संपण्याच्या दहा दिवस आधीच पास काढणे ऑनलाइन प्रक्रियेवर शक्य आहे. मोबाइलपासून टीव्हीपर्यंत अनेक गोष्टी ऑनलाइन मागवण्याची सवय असणाऱ्यांनी पासबाबतही निश्चिंत राहायला हवे, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
ऑनलाइन पास कसा काढाल?
ऑनलाइन पास काढण्यासाठी http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर प्रवाशांना आपले खाते उघडणे आवश्यक आहे. त्यानंतर या संकेतस्थळावरील उपनगरीय सेवेच्या विभागात पास नूतनीकरणाचा पर्याय आहे. त्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पर्यायही उपलब्ध आहे. हा पास मोफत घरी येतो.