पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहराच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जाणार असल्याने महापालिकेने शासनाकडे नव्याने ७३७ सफाई कामगार भरण्याची परवानगी मागितलेली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत बाल्मिकी मेघवाळ मेहतर समाजातील ३०० जणांना पालिका सेवेत सफाई कामगार म्हणून सामावून घेण्याविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य विजयकुमार यांनी दिली आहे.
कुंभमेळ्यानिमित्त देशासह विदेशातून लाखो भाविक शहरात येणार आहेत. या वाढत्या लोकसंख्येचा शहराच्या स्वच्छता व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणावर ताण पडून आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार होऊ शकतो. त्यामुळेच परंपरेने साफ-सफाईची कामे करणाऱ्या बाल्मिकी मेघवाळ मेहतर समाजातील ३०० बेरोजगारांना पालिकेने सेवेत सामावून घेण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करण्याची मागणी बाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दलोड व समितीचे सदस्य नेमिचंद चोरम यांनी विजयकुमार यांच्याकडे  केली होती.
विजयकुमार यांनी विश्रामगृहात उपजिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांचे प्रतिनिधी सहाय्यक आयुक्तांसह फुले महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांशी सफाई कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी डॉ. आंबेडकर कॉलनी, रेडक्रॉस, महालक्ष्मी चाळ, बाल्मिकी मंदिर, वडाळानाका येथील सफाई कर्मचारी वसाहतींना भेट देऊन त्यांचे प्रश्न समजावून घेतले. यावेळी सुरेश मारु, रणजीत कल्याणी, पंडित मारु, रामकिसन चव्हाण आदी उपस्थित होते.