महावितरणकडून नियमित वीज पुरवठय़ासाठी ३२ लाखांची निविदा काढणार
मागील वर्षभरापासून औद्योगिकदृष्टय़ा प्रगत असलेल्या व विजेच्या झगमगाटाने नटलेल्या उरण तालुक्यातील आदिवासींची वस्ती असलेल्या रानसई वाडीत वीजपुरवठा होत नसल्याने लाखो रुपये खर्च करूनही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न झाल्याने वाडीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात केलेल्या पाठपुराव्यानंतर महावितरण कंपनीकडून रानसई आदिवासी वाडीला वीजपुरवठा करण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबासाठी ३२ लाखाच्या खर्चाची निविदा काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे रानसई आदिवासी वाडीचा पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

रायगड जिल्ह्य़ातील सर्वाधिक औद्योगिकीकरण असलेल्या उरण तालुक्यात औद्योगिकीकरणापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या रानसई आदिवासी वाडीला नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रानसई ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठय़ासाठी भारत निर्माण योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या ८५ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेतील पाणी पोहचत नाही. त्यामुळे आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रानसई आदिवासी वाडी ही उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या काठावर वसलेली आहे. तरीही ही वाडी तहानलेलीच आहे. वाडीत वीज नाही, पाणी नाही. त्यामुळे विकास नाही, शिक्षणाची आबाळ होत आहे. आदिवासी वाडी उंचावर असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी विजेच्या पंपाची गरज भासते. या पंपांना नियमित व पुरेशी वीज मिळत नसल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडलेली आहे. त्यामुळे येथील विहिरीही कोरडय़ा पडल्या आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. या संदर्भात उरण महावितरण कंपनीचे साहाय्यक अभियंता उपेंद्र सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता रानसई आदिवासी वाडीला नियमित वीजपुरवठा करण्यासाठी २०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर तसेच १७ नवीन विजेचे खांब टाकण्यासाठी ३२ लाखांच्या खर्चाची निविदेचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.