शहर किंवा उपनगरातील बेस्टच्या कोणत्याही बस थांब्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करत आहात आणि खूप वेळ झाला तरी बस आली नाही, तर तुम्ही थेट मुंबईतील वाहतूक कोंडीच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहून मोकळे व्हाल. पण सध्या या वाहतूक कोंडीच्या बरोबरीनेच बेस्ट प्रशासनाला नादुरुस्त बसगाडय़ांमुळेही सतावले आहे. बसगाडय़ांमधील अत्यंत महत्त्वाचे असे एअर बेलो हे भाग खराब झाल्याने बेस्टच्या प्रत्येक आगारातील पाच ते सहा बसगाडय़ा बंद आहेत. याचा फटका मोठय़ा प्रमाणात बेस्टच्या प्रवाशांना बसत आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर लाखो प्रवासी घेऊन धावणाऱ्या बेस्टच्या बसमधील प्रवाशांचा प्रवास आरामदायक आणि अधिक हादरे न बसता व्हावा, यासाठी एअर बेलो हा भाग बसमध्ये अत्यावश्यक आहे. मात्र बेस्टच्या ताफ्यातील अनेक बसगाडय़ांमधील हा भाग तुटण्याच्या अथवा नादुरुस्त होण्याच्या घटना काही दिवसांत घडल्या आहेत. हा भागा बाजारात पाच हजार रुपये किमतीला मिळतो. मात्र अद्यापही या भागांची खरेदी झालेली नाही. त्याचप्रमाणे अनेकदा दुसऱ्या जुन्या गाडय़ांमधील एअर बेलो काढून नव्या गाडय़ांना बसवण्याची कामे सध्या बेस्टच्या आगारांत चालल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला.
इतर गाडय़ांचे एअर बेलो काढून ते नव्या गाडय़ांना लावले जात आहेत. मात्र एअर बेलो काढलेल्या गाडय़ा तशाच रस्त्यावर धावत आहेत. हा भाग नसल्यास रस्त्यातील खड्डे गाडीच्या सांगाडय़ाला अधिक प्रकर्षांने जाणवतात. त्यामुळे गाडी लवकर खराब होते. म्हणजेच या पाच हजार रुपये किमतीच्या भागांसाठी आपण २२ लाख रुपयांची बस खराब करत आहोत, असे गणाचार्य म्हणाले. प्रत्येक आगारात पाच ते सहा गाडय़ा केवळ एअर बेलो नसल्याने दर दिवशी आगारातच उभ्या राहतात. त्यामुळे प्रवाशांना योग्य सेवा देण्यात बेस्ट अपयशी ठरत आहे, असा आरोपही त्यांनी केला. गणाचार्य यांच्या मुद्दय़ाचे समर्थन करताना रंजन चौधरी यांनीही प्रशासनावर झोड उठवली. एकटय़ा बॅकबे आगारातील ११४ पैकी ४० गाडय़ा एअर बेलोच्या कमतरतेमुळे पडून आहेत. याच आगारातील मार्ग क्रमांक १ वरून जाणारी एक बस एअर बेलोशिवाय चालवण्यात आली होती. मात्र त्यामुळे या बसचे ‘शॉक अब्झोर्बर्स’ आणि सस्पेन्शन तुटले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. लाखो रुपयांची खरेदी बेस्टमध्ये होत असताना या पाच-पाच हजार रुपयांच्या सुटय़ा भागाच्या खरेदीसाठी एवढा वेळ का, अशी टीकाही त्यांनी केली.
एअर बेलोची कमतरता आहे, ही गोष्ट प्रशासनही मान्य करते. मात्र त्याची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या समस्येमुळे सध्या आगारात उभ्या असलेल्या बसगाडय़ा येत्या महिन्याभरात पुन्हा रस्त्यावर धावू लागतील, असे आश्वासन बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी दिले.
एअर बेलो?
अवजड वाहने रस्त्यावर धावताना त्या वाहनांना आणि त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमीत कमी हादरे बसावेत, यासाठी बस, ट्रक, रेल्वे गाडय़ा आणि काही छोटय़ा गाडय़ा यांत एअर सस्पेन्शन नावाचा भाग बसवलेला असतो. गाडीच्या चाकांजवळ बसवलेला हा भाग चाक आणि गाडीचा सांगाडा यात हवेचा छोटा दाब निर्माण करून रस्त्यांवरील हादऱ्यांपासून गाडीच्या सांगाडय़ाचे रक्षण करतो. या भागालाच एअर बेलो असेही म्हणतात.