कल्याण-डोंबिवली महापालिकेतील डोंबिवली परिसराचे फेरीवाला पथकाचे प्रमुख दिलीप भंडारी ऊर्फ बुवा यांना पालिकेच्या सेवेतून निलंबित करण्याचा ठराव ग प्रभाग समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. भंडारी यांनी नगरसेविकेला धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. हा ठराव प्रभाग अधिकारी चंदूलाल पारचे यांच्यामार्फत आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच, भंडारी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाल्याने आयुक्त सोनवणे याबाबत काय भूमिका घेतात हे पाहून पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे ग प्रभाग समिती अध्यक्ष कोमल पाटील यांनी सांगितले. संगीतावाडीत फेरीवाला क्षेत्र असलेल्या भागात भंडारी हे फेरीवाल्यांना अनधिकृतपणे परवाना पावत्या देत असल्याची तक्रार होती. हे परवाने नगरसेविका निग्रे यांच्या आदेशावरून दिले जात असल्याचे चित्र फेरीवाल्यांमध्ये निर्माण केले जात आहे, अशी तक्रार संबंधित नगरसेविकेने केली होती. यातून निग्रे आणि भंडारी यांच्यात वाद झाला. दरम्यान, भंडारी यांनी आपणास ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नगरसेविकेने केली होती. याप्रकरणी त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.