मुंबईत विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकटय़ा प्रवाशांची संख्या दरमहा लाखावर असताना आता मुंबईकर वाहन चालवण्याची शिस्तही पाळत नसल्याचे दिसून आले आहे. एकेकाळी मुंबईतील शिस्तप्रिय वाहतुकीचा दाखला पुणेकरांना दिला जात असे. मात्र वाहतूक पोलिसांनी रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत पंधरवडय़ात केलेल्या कारवाईत हा चेहरा किती खोटा आहे, हे स्पष्ट झाले. या पंधरवडय़ात तब्बल ७७ हजार वाहनचालकांना वाहतुकीचे नियम न पाळल्याबद्दल दंड ठोठावण्यात आले. म्हणजेच दर दिवशी मुंबापुरीत पाच हजारांहून अधिक वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचा भंग करत असल्याचे समोर आले आहे.
एखाद्या चौकात दुचाकीस्वार गाडी घेऊन आला की, त्याच्या गाडीचा वेग आपोआप कमी होतो. मग हळूच आरशाच्या दांडय़ाला लटकवलेले हेल्मेट परिधान केले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे चौकात एखाद्या झाडाआड उभे असलेले वाहतूक पोलीस! हे पोलीस झटकन वाहनचालकांना पकडून त्यांच्याकडून पावती फाडतात. मुंबईतील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण पाहता वाहतूक पोलिसांनी चालकांची ही मनोवृत्ती बदलण्यासाठी रस्ते सुरक्षा पंधरवडा राबवला होता. ११ ते २५ जानेवारी या दरम्यान झालेल्या या मोहिमेत वाहनचालकांना सुरक्षित प्रवासाचे धडे देण्याबरोबरच चुकार वाहनचालकांवर कारवाईही करण्यात आली.
मुंबईत या पंधरवडय़ात वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या आणि पोलिसांच्या कचाटय़ात सापडलेल्या चालकांची संख्या ७७ हजार एवढी भरली. या ७७ हजार बेशिस्त वाहनचालकांकडून तब्बल ५४ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक कारवाई हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर करण्यात आली. ही संख्या १६,७१२ एवढी आहे. त्याखालोखाल नो पार्किंगमध्ये गाडी उभी करणाऱ्यांची संख्या आहे. या पंधरवडय़ात भाडे नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांवरही कारवाई करण्यात आली. ही संख्या ५८६ एवढी आहे. तर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या २९२ चालकांना पोलिसांनी आपला इंगा दाखवला.या पंधरवडय़ाचे वैशिष्टय़ म्हणजे पोलिसांनी केवळ कारवाईवर लक्ष न देता जनजागृतीचा प्रयत्नही केला. या मोहिमेत ७७५ स्कूल बसचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कारवाई केलेल्या वाहनचालकांनाही वाहतुकीच्या नियमाचे धडे देण्यात आले.
वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई
गुन्हा            संख्या
हेल्मेट न घालणे        १६,७१२
नो पार्किंग            १६,६९२
सिग्नल तोडणे        ९५२६
धोकादायक मालवाहतूक    ३६५६
फुटपाथवर वाहने        २९१६
लेन तोडणे            २६४०
सेफ्टी बेल्ट            २६५०
काळ्या काचा        २२९८
चुकीचे नंबर प्लेट        २००९
बेदरकार वाहन        ७८७
भाडे नाकारणे        ५८६
मद्यपी वाहनचालक        २९२