दादरच्या मधुरा उपाहारगृहाच्या चालकांनी पालिकेच्या प्लास्टिक पिशव्यांविरोधातील कार्यवाहीबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर वितरक तसेच उत्पादकांवर कारवाई करण्याचे आश्वासन महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी दिले आहे.
अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांकडील पातळ प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्यास असमर्थ ठरणारी पालिका दुकानांमधील पिशव्यांची जाडी मात्र तंतोतंत तपासून दंड आकारते. पन्नास मायक्रॉनची छापील ग्वाही देत असलेल्या पिशव्या वितरकांकडून खरेदी केल्यावर यात दुकानदाराला दोषी धरण्यात येऊ नये, यासाठी मधुरा उपाहारगृहाचे चालक शंकर वेलणकर यांनी अनुज्ञापन (लायसन्स) व विशेष उपायुक्तांच्या विभागात दाद मागणे सुरू केले. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची पिशवी बाळगल्याप्रकरणी अनुज्ञापन विभागाच्या दक्षता पथकाने त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड ठोठावला होता. यासंदर्भात ‘लोकसत्ता’कडून विचारणा करण्यात आल्यावर उपायुक्त (विशेष) राजेंद्र वळे यांनी या तक्रारीची दखल घेऊन वितरक व उत्पादकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. वितरकावर आधीच कारवाई झालेली आहे. मात्र केवळ ही कारवाई पुरेशी नाही. उत्पादकाचाही शोध घेऊन त्याविरोधातही कारवाई करावी, याबाबत मी संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. वितरकाकडून पिशव्या घेताना दुकानदारांनीही दक्ष राहणे गरजेचे आहे, असे वळे म्हणाले. मात्र ४५ मायक्रॉन आणि ५० मायक्रॉनचा फरक नजरेने किंवा स्पर्शाने समजणे कठीण असल्याचे त्यांनी मान्य केले. पातळ प्लास्टिक पिशव्यांविरोधातील मोहीम अधिक व्यापक केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दुकाने, मॉल, फेरीवाले यांच्याकडील पातळ प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्याचे अधिकार दुकाने व आस्थापना विभागाला आहेत. अनुज्ञापन विभाग केवळ दुकानांवर ही कारवाई करू शकते. पदपथावर बसलेल्या फेरीवाल्यांना हटवण्याचे अधिकार अतिक्रमण विरोधी पथकाला असले तरी प्लास्टिक पिशव्यांबाबत ते दंड आकारू शकत नाहीत. दुकाने व आस्थापना विभागातील कर्मचारी संख्या कमी असल्याने तसेच गेल्या वर्षांतील दोन निवडणुकांमुळे प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई थंडावली आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा दंड पाच हजार रुपयांपर्यंत वाढवला असल्याने फेरीवाले हा दंड भरण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे पुढे पोलीस ठाण्यात तक्रार वगैरे करेपर्यंत तीन ते चार तास जातात. एका फेरीवाल्यासाठी एवढा वेळ जात असल्याने इतर ठिकाणी कारवाई करण्यास वेळ अपुरा पडतो, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.